मुंबई : उध्दव ठाकरेंना राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा नसल्याने पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पक्षातून बाहेर करण्याचा निर्णय नियमबाह्य आहे. तसेच, पक्षप्रमुख म्हणून नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे, असेही विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी निकाल देताना नमूद केले. दरम्यान, पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम असतो हा दावाही नार्वेकरांनी निकालात खोडून काढला आहे.
१९९९ च्या घटनेनुसार शिवसेना पक्ष नेमका कुणाचा हे ठरणार आहे. विधानसभाध्यक्षांनी निकालाचे वाचन करताना पक्ष नेमका कुणाचा हेदेखील पक्षघटनेनुसार ठरणार असल्याचे सांगितले. तसेच, नेतृत्वाची रचना तपासण्यापुरतेचं घटनेचा आधार असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे. त्याचबरोबर, पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत तर राष्ट्रीय कार्यकारिणी हीच सर्वोच्च असल्याचे निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी विधानसभाध्यक्षांनी यावेळी केली.
त्याचबरोबर, घटना, पक्ष आणि विधीमंडळ हे महत्त्वाचे घटक असल्याचे महत्त्वपूर्ण विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी केले. निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार घेत निर्णय देण्यात येणार आहे. निकालाचे वाचन दोन्ही गटांसमोर करण्यात येत आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सदर निकालाचे वाचन करण्यात येत आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाचे आमदार यावेळी विधानभवन, सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित आहेत.
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालपत्राचे वाचन करताना सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. तसेच, दोन्ही गटांचे वकील आणि आमदारांचेदेखील आभार मानतानाच प्रत्येकाला निकालाची प्रत देण्यात येईल, असेही विधानसभाध्यक्षांनी यावेळी स्पष्ट केले.