नरसिंह अवतार

    10-Jan-2024   
Total Views |
article on Hiranyakashipu

 हिरण्यकश्यपू हा दैत्य क्रूर, दुष्ट, महापापी होता. त्याला कशाचीही भीती वाटत नसे. त्याने तपस्या करून वर मिळवला होता की त्याला मनुष्य अथवा हिंस्त्रपशू मारू शकणार नाही. त्याला शस्त्राने मरण येणार नाही. त्याला घरात किंवा घराबाहेर मृत्यू येणार नाही. त्याला दिवसा किंवा रात्री मृत्यू येणार नाही. त्याला जमिनीवर किंवा पलंगावर मृत्यू येणार नाही! असा वर मिळाल्याने तो उन्मत्त झाला होता. आपण अजरामर आहोत या कल्पनेने तो देवाचा द्वेष करीत असे. त्याने भक्त प्रल्हादाला अनेक कष्ट दिले, त्याचा छळ केला. भक्ताचे कष्ट पाहून भगवंताला नरसिंह अवतार घेऊन दुराचारी हिरण्यकश्यपूचा शेवट करावा लागला.
भगवंताचे अवतार कार्य या जगाला वाचविण्यासाठी आहे.

विविधतेने नटलेले हे विश्व व त्यातील ज्ञानसाधनांचा सदुपयोग यासाठी देव सदैव मानवाला मदतकरीत आला आहे. स्वामींनी देवाच्या मत्स्य, कर्म, वराह या अवतारांच्या प्रचलित कथा सांगून जगाच्या रक्षणासाठी परमेश्वर प्रचंड शक्ती धारण करतो व दृष्टांचा संहार करतो हे दाखवून दिले आहे. या तीनही पुराण कथांत वेद चोरून पळवणारा हयग्रीव दैत्य, पृथ्वीला ओढून नेऊन बुडवून टाकण्यासाठी निघालेले हिरण्याक्ष व इतर दैत्य यांना भगवंतांनी अवतार घेऊन ठार केले. तसेच पृथ्वी व त्यावरील जीव सृष्टीचे रक्षण केले. भक्ताच्या रक्षणासाठी दुष्ट दुर्जनांचा नाश करणे हे भगवंताचे कार्य असल्याने स्वामींनी यापुढे भक्त प्रल्हादाची कथा निवेदनासाठी घेतली आहे. भक्त प्रल्हादाच्या कथेत प्रल्हादाचा अविचारी दुष्ट मदोन्मत्त अहंकारी बाप हिरण्यकश्यप, प्रल्हाद देवाची भक्ती करतो. या कारणास्तव प्रल्हादाला छळत होता. भक्ताच्या रक्षणासाठी भगवंतांनी सिंहाचे मुख असलेल्या व अंगातून ज्वाळा निघत असलेल्या भयावह नरसिंहांचा अवतार घेऊन दुराचारी, अहंकारी हिरण्यकश्यपूला संपवले आहे.

दैत्य कुळात जन्मलेल्या या भक्त प्रल्हादाची कथा मागे श्लोक क्र. 96 मध्ये आली आहे. परंतु, ती प्रल्हाद घेत असलेल्या नामस्मरणाच्या संदर्भात आली आहे. प्रस्तुत श्लोक क्र. 121 मध्ये प्रल्हादाला कष्ट देणार्‍या छळणार्‍या दैत्याच्या नाशासाठी ’नरसिंह’ अवतार घेऊन भगवंताने भक्ताचे रक्षण केले. देवाला भक्ताचा अभिमान असतो, भक्ताला तो वाचवतो हे सांगण्यासाठी पुन्हा प्रल्हादाच्या कथेचा उल्लेख येतो.
 
महां भक्त प्रल्हाद हा कष्टवीला ।
म्हणोनी तयाकारणे सिंद्ध जाला ।
न थे. ज्वाळ वीषाळ संनीध कोण्ही ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥121॥
प्रल्हादाचा जन्म राक्षसकुळात झाला होता. तरी जन्मापासून त्याला भगवंताच्या भक्तीने प्रेम होते. तो मनोभावे आवडीने नारायणाची भक्ती करीत असे. परंतु त्याचा पिता हिरण्यकश्यपू भगवंताचा द्वेष करीत असे. त्यामुळे प्रल्हाद देवाची भक्ती करतो हे हिरण्यकश्यपूला आवडत नसे. प्रल्हाद व हिरण्यकश्यपू विचाराने व स्वभावाने भिन्न होते. हिरण्यकश्यपू अत्यंत अहंकारी तर प्रल्हाद नम्र, हिरण्यकश्यपूला मद अहंकार असल्याने तो देवाचा तिरस्कार करी, तर प्रल्हाद प्रेमळ, असल्याने तो भगवंताचा अनन्य भक्त होता. प्रल्हादाची देवाप्रती असलेली एकनिष्ठ भक्ती हिरण्यकश्यपूला आवडत नसे त्याने प्रल्हादाला सांगून पाहिले, पण प्रल्हादाच्या भक्तीत काही फरक पडला नाही. त्यामुळे चिडून त्याने प्रल्हादाचा छळ करायला सुरुवात केली. एकदा त्याला डोंगराच्या कड्यावरून खाली ढकलले, एकदा उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. परंतु, भगवंतांनी त्याला वाचवले. त्यामुळे प्रल्हादाची भक्ती आणखी दृढ झाली.

हिरण्यकश्यपू हा दैत्य क्रूर, दुष्ट, महापापी होता. त्याला कशाचीही भीती वाटत नसे, त्याला कारणही तसेच होते. पूर्वी त्याने तपस्या करून वर मिळवला होता की त्याला मनुष्य अथवा हिंस्त्रपशू मारू शकणार नाही. त्याला शस्त्राने मरण येणार नाही. त्याला घरात किंवा घराबाहेर मृत्यू येणार नाही. त्याला दिवसा किंवा रात्री मृत्यू येणार नाही. त्याला जमिनीवर किंवा पलंगावर मृत्यू येणार नाही! असा वर मिळाल्याने तो उन्मत्त झाला होता. आपण अजरामर आहोत या कल्पनेने तो देवाचा द्वेष करीत असे. तो सर्वांना सांगत असे की, देवाची भक्ती सोडून माझी भक्ती करा. तरीही प्रल्हाद भगवंताचा एकनिष्ठ भक्त होता, याची त्याला विलक्षण चीड होती. त्याने प्रल्हादाला अनेक कष्ट दिले, त्याचा छळ केला. भक्ताचे कष्ट पाहून भगवंताला नरसिंह अवतार घेऊन दुराचारी हिरण्यकश्यपूचा शेवट करावा लागला.
 
वर मिळाल्याने हिरण्यकश्यपूला आत्यंतिक गर्व ताठा झाला होता. त्या गुर्मीत एक दिवस सायंकाळच्या वेळी त्याने प्रल्हादाला विचारले, कोठे आहे तुझा तो देव, त्याला माझ्या समोर येऊ दे. मी त्याचा नायनाट करतो. त्यावर प्रल्हाद नम्रपणे म्हणाला, ’माझा भगवंत चराचर सृष्टीत सर्वत्र व्यापून उरला आहे. त्याचे अस्तित्व सर्वकाळी सर्व ठिकाणी आहे.’ त्यावर हिरायकश्यपूने, म्हणजे तो या खांबातही आहे’ असे म्हणून खांबाला जोरदार लाथ मारली. खांब दुभंगून त्यातून सिंहांचे मुख असलेला, सर्वांगातून, ज्वाळा निघत असलेला भगवंताचा नरसिंह अवतार प्रगट झाला. त्याचे शरीर मानवी पण मुख भयावह सिंहांचे होते. नरसिंहाने उंबर्‍यावर बसून हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवरआडवा करून तीक्ष्ण नखांनी त्याचे पोट फाडले व त्याला संपवला. अशावेळीही देवाला नमस्कारासाठी हात उचलण्याऐवजी त्याचा हात तलवारीकडे गेला. त्याच्या अंगी किती मद अहंकार होता, हे त्यातून दिसून येते. भगवंतांनी हिरण्यकश्यपूच्या वराच्या सर्व अटी सांभाळून त्याचा वध केला.

त्याला सायंकाळी मारले म्हणजे ना दिवसा ना रात्री- नरसिंहांचे रूप घेऊन मारले म्हणजे ना मनुष्य ना हिंस्त्र प्राणी, उंबर्‍यावर बसून मारले. म्हणजे ना जमिनीवर ना पलंगावर. शस्त्राऐवजी तीक्ष्ण नखांनी पोट फाडून मारले, भगवंत अफाट शक्तिवान तसाच अफाट बुद्धिवानही आहे हे यातून दिसते.
 
स्वामींनी या श्लेकात म्हटले आहे की, प्रल्हाद हा भगवंताचा महान भक्त होता. दुर्जनाने त्याचा अतोनात कष्ट दिले. तेव्हा सिंहाचे मुख धारण केलेला नरसिंह अवतार भक्ताच्या रक्षणासाठी भगवंताला घ्यावा लागला. नरसिंहांचे रूप एवढे भयानक होते की त्याच्या शरीरातून ज्वाळांचे लोट निघत होते. कुणीही त्याच्या जवळ जाऊ शकत नव्हते. सारे भयभीत झाले होते, पण प्रल्हाद मात्र हात जोडून भक्तिभावाने तेथे उभा होता. देवाला आपल्या भक्ताचा अभिमान असतो, भक्तासाठी तो अवतार घेऊन दुष्ट दुर्जनांचा शेवट करतो. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे परिभाणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम् । हे वचन भगवंत सांभाळतो. हे या प्रल्हादाच्या कथेतून सिद्ध होते.
 
सुरेश जाखडी
7738778322
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..