मिनिकॉय बेटावर नवे लष्करी आणि नागरी विमानतळ उभारणार!

    10-Jan-2024
Total Views |
Centre to build airport at Lakshadweep's Minicoy Island for military, civilian aircraft

नवी दिल्ली: भारत लक्षद्वीप बेटांना पर्यटनासाठी प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहे. या पार्श्वभूमीनर लक्षद्वीपमधील मिनिकॉय बेटांवर एक नवीन विमानतळ विकसित करण्याची योजना आखत असून त्याचा वापर व्यावसायिक विमानांसह लष्करी विमानांनाही करता येणार आहे.

मिनिकॉय बेटांमध्ये हे नवीन विमानतळ विकसित करण्यासाठी सरकारकडे यापूर्वीही प्रस्ताव पाठवण्यात आले होते. मात्र, संयुक्त वापराच्या संरक्षण विमानतळाची ही योजना अलीकडच्या काळात

पुनरुज्जीवित झाली आहे आणि त्यामध्ये सक्रियपणे प्रगती केली जात आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. लष्करी दृष्टिकोनातून हे विमानतळ भारताचे स्थान मजबुत करणार आहे, कारण, याचा वापर अरबी समुद्र आणि हिंदी महासागर क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठीचा तळ म्हणून करता येणार आहे.

भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले पहिले दल होते, ज्यांनी मिनिकॉय बेटांवर विमानतळ विकसित करण्याची सूचना केली. सध्याच्या प्रस्तावानुसार, भारतीय वायुसेना मिनीकॉय मधून ऑपरेशन्स चालवण्यासाठी आघाडीवर असेल. मिनिकॉय येथील विमानतळामुळे संरक्षण दलांना अरबी समुद्रात त्यांच्या निगराणी क्षेत्राचा विस्तार करण्याची क्षमताही मिळेल.

सध्या लक्षद्वीपमध्ये अगाटी येथे एकच विमानतळ आहे. या विमानतळाचा वापर मर्यादित विमानांना करता येतो. त्यासाठी नवीन विमानतळाचा विकास आणि सध्याच्या सुविधांचा विस्तार करण्याचा प्रस्ताव नुकताच मांडण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात भेट दिल्यापासून हा बेटाचा प्रदेश चर्चेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.