राम मंदिरावरुन काँग्रेसची संभ्रमावस्था

    01-Jan-2024   
Total Views |
Congress Leaders Confused on Ram Mandir

राम मंदिराच्या लोकार्पणाला निमंत्रण प्राप्त झाले असतानाही अयोध्येला दर्शनासाठी जावे अथवा नाही, अशी काँग्रेसश्रेष्ठींची द्विधा परिस्थिती. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदांनी राम मंदिर लोकार्पणावरुन केलेली शेरेबाजी आणि दुसरीकडे कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आम्ही राम मंदिराच्याच बाजूने असल्याचा केलेला दावा, यावरुन काँग्रेसची संभ्रमावस्थाच अधोरेखित व्हावी.

काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी अलीकडेच राम मंदिरासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली होती. ’खरा मुद्दा राम मंदिराचा आहे की, बेकारी दूर करण्याचा,’ अशा आशयाचे विधान पित्रोदा यांनी केले होते. पित्रोदा हे तसे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे मित्र. राहुल गांधी यांच्या अलीकडील विदेश दौर्‍यांमध्ये त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यातही पित्रोदा यांचा पुढाकार असायचा. एकीकडे येत्या दि. २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणार्‍या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना पाठविण्यात आले. या समारंभास उपस्थित राहण्याबाबतचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. याचदरम्यान पित्रोदा यांचे वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध झाले. पण, पित्रोदा यांचे वक्तव्य हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत वक्तव्य नसल्याचे, जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. पित्रोदा यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले होते. पित्रोदा हे काँग्रेस पक्षाच्यावतीने बोलू शकत नाहीत, असेही जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

पित्रोदा यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, “मला कोणत्याही धर्माचे वावडे नाही. कधी तरी मंदिरास भेट दिल्याचे चालू शकते; पण तुम्ही हा मुख्य मुद्दा करता कामा नये. पंतप्रधान हे सर्वांचे आहेत, ते काही पक्षाचे पंतप्रधान नाहीत. भारतीय जनतेला हाच संदेश पंतप्रधानांकडून हवा आहे. तुम्ही बेकारी, चलनवाढ, विज्ञान-तंत्रज्ञान आणि देशापुढील आव्हानांसंदर्भात बोलायला हवे. खरा मुद्दा कोणता, हे ठरवायला हवे. राम मंदिर हा खरा मुद्दा आहे का? बेकारी हा मुख्य मुद्दा आहे? राम मंदिर हा मुख्य मुद्दा आहे की, चलनवाढ हा मुख्य मुद्दा आहे,” असे प्रश्न पित्रोदा यांनी उपस्थित केले होते.

पित्रोदा यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, ज्येष्ठ नेते सुशील मोदी, कैलास विजयवर्गीय यांच्यासह अन्य नेत्यांनी टीका केली. राम मंदिरावरून पित्रोदा यांच्या मनातील मळमळ बाहेर पडत आहे. राम मंदिर आणि हिंदू समाजाबद्दल काँग्रेसला जो आकस आहे, तो अशा वक्तव्यातून बाहेर पडत आहे, तर पित्रोदा यांच्यासारख्या व्यक्तींचा या देशाशी काही संबंध नसल्याचे, भाजप नेते सुशील मोदी यांनी म्हटले आहे. भगवान राम आणि आपल्या प्रथा-परंपरा या बेकारीच्या इतक्याच महत्त्वाच्या आहेत. पित्रोदा यांच्यासारख्या व्यक्तीस आपल्या संस्कृतीची काही माहिती नाही, अशी टीका त्यांनी केली. ‘इंडी’ आघाडीचे नेते अशीच बाष्कळ विधाने करून, सनातन धर्माची बदनामी करत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. देशातील आणि जगातील रामभक्तांचे लक्ष दि. २२ जानेवारी रोजी होणार्‍या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाकडे लागले असताना, पित्रोदा यांच्यासारखे लोक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न कसा करत आहेत, ते यावरून लक्षात यावे!

गोवा ः ’सनबर्न फेस्टिवल’मध्ये भगवान शंकराचा अवमान

गोव्यामध्ये दि. २८ डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ’सनबर्न फेस्टिवल’मध्ये हिंदूंच्या देवतांचा अपमान करण्यात आल्याचे आढळून आले आहे. हा ’सनबर्न फेस्टिवल’ उत्तर गोव्यातील वागातोर येथे आयोजित करण्यात आला होता. या ’सनबर्न फेस्टिवल’मध्ये एलईडी स्क्रीनवर भगवान शंकराचे चित्र प्रदर्शित करण्यात आले होते आणि त्या स्क्रीनसमोर उपस्थित लोकांचे अचकट विचकट नृत्य सुरू होते. तसेच मद्यपानही केले जात होते. या कार्यक्रमात हिंदू देवतेसमोर जो धांगडधिंगा सुरू होता, तो लक्षात घेऊन, काँग्रेस नेते विजय भिके आणि अन्य काही हिंदुत्ववादी संघटनांनी म्हापसा पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदविली आहे. ’सनबर्न फेस्टिवल’च्या आयोजकांकडून सनातन धर्माचा अवमान झाला असल्याचे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. भगवान शंकराच्या प्रतिमेपुढे जाणूनबुजून असे नृत्य करून आणि मद्यपान करून हिंदू समाजाच्या भावना दुखवण्यात आल्या आहेत, असा आरोप हिंदू संघटनांनी आयोजकांवर केला आहे. एका हिंदू देवतेचे असे प्रदर्शन करून जातीय तणावाला खतपाणी घातले जात आहे. तसेच यामुळे कायदा-व्यवस्थेची स्थितीही निर्माण होऊ शकते, असा आरोप या संघटनांनी केला आहे. असे ‘सनबर्न फेस्टिवल’ हे ‘ड्रग्ज संस्कृती’ला प्रोत्साहन देत असल्याने त्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या पूर्वीच करण्यात आली होती. या प्रकरणी जी तक्रार करण्यात आली आहे, त्याची शहानिशा पोलिसांकडून केली जात आहे. ध्वनी प्रदूषण होऊ नये, म्हणून जे नियम पाळायला हवे होते, त्यांचे पालन न केल्याबद्दल आयोजकांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. भगवान शंकराचा अवमान करण्याची घटना या ’सनबर्न फेस्टिवल’मध्ये घडली असताना, हिंदू समाजाच्या भावना दुखाविणार्‍या या कृत्याबद्दल आयोजकांवर कडक कारवाई केली जायलाच हवी!

३१ डिसेंबरच्या रात्री श्रीनगरच्या लाल चौकात झगमगाट!

श्रीनगरच्या लाल चौकातील वातावरण गेल्या काही काळापासून एकदमच बदलून गेले आहे. ’कलम ३७०’ रद्द करण्यापूर्वी या लाल चौकात पाकिस्तानचे झेंडे फडकविले जात होते. लाल चौकात भारताचा राष्ट्रध्वज फडकला जात नसे. तसेच गोकुळाष्टमी, राम नवमी सणांच्या मिरवणुकाही तेथून जात नसत. किंबहुना, अशा मिरवणुकाच काढल्या जात नसत. श्रीनगरमधील लाल चौक म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा, असे या लाल चौकाबद्दल म्हटले जात असे. पण, आता चित्र पालटले आहे. स्वातंत्र्य दिनी लाल चौकामध्ये राष्ट्रध्वज फडकला आहे. जन्माष्टमीनिमित्त निघालेली मिरवणूक वाजतगाजत लाल चौकातून गेली आहे. यामध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे गेल्या दि. ३१ डिसेंबर रोजी ग्रेगेरियन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाल चौकात मोठ्या संख्येने स्थानिक जनतेने गर्दी केली होती. नववर्षाच्या निमित्ताने लाल चौकात काही कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. श्रीनगरच्या लाल चौकात असे दृश्य यापूर्वी कधीच दिसले नव्हते, असे श्रीनगर महापालिकेचे आयुक्त आणि ’श्रीनगर स्मार्ट सिटी लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अथर आमीर खान यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ‘श्रीनगर स्मार्ट सिटी’चा आपणास अभिमान वाटत आहे, असेही आयुक्तांनी म्हटले आहे. दि. ३१ डिसेंबरच्या रात्री दिव्यांची रोषणाई आणि झगमगाट यात न्हाऊन निघालेला लाल चौक स्थानिक जनतेने प्रथमच अनुभवला असेल!

केरळ ः ऑर्थोडॉक्स चर्चचे धर्मगुरू आणि ख्रिस्ती कुटुंबांचा भाजपमध्ये प्रवेश

केरळमधील ऑर्थोडॉक्स चर्चचे धर्मगुरू फादर शायजू कुरियन आणि अन्य ४७ ख्रिस्ती कुटुंबानी, भाजपने ख्रिसमस समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. फादर शायजू कुरियन हे निल्क्कल ऑर्थोडॉक्स चर्चचे सचिव आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दि. ३० डिसेंबर रोजी ’ख्रिसमस स्नेहसंगम’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी केले. या समारंभाच्या निमित्ताने केरळमधील ख्रिस्ती समाज मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळत असल्याचे दिसून आले. भाजप हा जातियवादी असून, तो अल्पसंख्याक समाजाच्या विरुद्ध आहे, असा जो अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे, त्या पार्श्वभूमीवर एका ख्रिस्ती धर्मगुरूने ४७ ख्रिस्ती कुटुंबांसह भाजपमध्ये केलेल्या प्रवेशास महत्त्वाचे मानले जात आहे. ख्रिस्ती समाजाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या हेतूने भाजपने दि. २१ डिसेंबर रोजी स्नेहयात्रेचे आयोजन केले होते. यादरम्यान ख्रिस्ती धर्मगुरू, ख्रिस्ती समाज आणि ख्रिस्ती संस्था यांच्या भेटीगाठी यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी घेतल्या होत्या. भाजपविषयीचे गैरसमज दूर होत असल्याने ख्रिस्ती समाज भाजपकडे वळू लागल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

९८६९०२०७३२


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.