आर्थिक निर्भरतेसाठी ‘घे भरारी’

    01-Jan-2024   
Total Views |
Article on Neelam Edlabadkar

परिस्थिती माणसाला बदलते. मात्र, काही व्यक्ती बदल घडवणार्‍या परिस्थितीलाच बदलतात. त्यामुळेच यश त्यांच्यासाठीच आहे, असेच म्हणावे लागते. अशीच एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे नीलम राजेश एदलाबादकर.

वस्ती पातळीवरच्या लाखो होतकरू लघु व्यावसायिकांना उद्योग क्षेत्रात यश मिळवून देणार्‍या, ’घे भरारी’ ग्रुपच्या सहसंस्थापिका नीलम एदलाबादकर. या ग्रुपमध्ये अडीच लाख व्यावसायिक ऑनलाईन पद्धतीने सहभागी आहेत, तर जवळ जवळ साडे सहा हजार व्यावसायिक प्रत्यक्ष सहभागी आहेत. लाखो लघु व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी, कलाकौशल्य सुविधांना योग्य ते मूल्य मिळवण्यासाठी ’घे भरारी’ ग्रुपचे औचित्य खूप मोठे आहे.

नीलम एदलाबादकर यांचे माहेर पुण्याचेच. वडील प्रभाकर हे संरक्षण खात्यात कामाला, तर आई रजनी या खासगी शिकवणी घेत. रजनी म्हणत की, ’‘पत्नीनेही कुटुंबासाठी नाही, तर स्वतःच्या आत्मनिर्भरतेसाठी अर्थार्जन करायला हवे.” उमराणी दाम्पत्याला दोन मुली, त्यापैकी एक नीलम. नीलम यांच्या आजी शांताबाई या समाजसेवकच. नीलम यांच्यात आत्मनिर्भर स्त्रीशक्तीचे बीज त्यातूनच रूजले असावे. पुढे ’एमएससी’ केल्यावर, त्यांचा विवाह राजेश एदलाबादकर यांच्याशी झाला. विवाहाला दहा वर्षे उलटल्यावरही नीलम यांना बाळ झाले नाही. तेव्हा एदलाबादकर कुटुंबातले नाहीत; पण बाहेर काही लोक होतेच, जे नीलम यांना विचारत की, ”कधी आई होशील, तुझ्या पाठून अमकीची कूस उजवली, तमकी गरोदर आहे.” हा काळ नीलम यांच्यासाठी प्रचंड तणावाचा होता.

या सर्व काळात नीलम आणि राजेश यांनी एकमेकांना खूप साथ दिली. दोघांनी ठरवले की, बाळासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे उपचार करायचे. पण, उपचापरासाठी तेवढे पैसे नव्हते. मग नीलम यांनी खासगी शिकवणी घ्यायला सुरुवात केली. उपचार सुरू केला आणि त्यांना आई होण्याची चाहूल लागली. बाळ झाल्यानंतर पुढे आठ वर्षं नीलम यांनी संपूर्ण वेळ बाळाच्या संगोपनासाठी दिला. त्यानंतर त्यांना दुसर्‍या बाळाची चाहूल लागली. दुसरे बाळ दोन वर्षांचे झाले. सगळे स्थिर झाले. नीलम यांना आईचे म्हणणे आठवे की, ‘पत्नीनेही संसारासाठी नसले तरीसुद्धा स्वतःच्या आत्मनिर्भरतेसाठी तरी अर्थार्जन करावे.’

त्याचवेळी राहुल कुलकर्णी यांनी प्रदर्शनासंदर्भात जाहिरात एका ऑनलाईन ग्रुपवर टाकली. राहुल हे नीलम यांच्या शाळेतले सहाध्यायी. एका शाळेत एका वर्गात शिकत होतो, इतकीच काय ती ओळख. पण, नीलम यांना वाटले की, घर-संसार सगळं सांभाळून आपणही हे काम करू शकतो. पती राजेश यांच्याशी विचारविनिमय करून, नीलम यांनी राहुल यांच्याशी संपर्क साधला. व्यावसायिकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी प्रदर्शन आयोजित करायचे आणि त्यासाठी स्टॉल जमवायचे आहेत, ही माहिती नीलम यांना मिळाली. प्रदर्शनासाठी स्टॉल कुठून मिळणार? नीलम यांनी गूगल, फेसबुकच्या माध्यमातून प्रदर्शनामध्ये सहभागी होऊ शकतील, अशा व्यावसायिकांची यादी गोळा केली. जवळ जवळ २१० स्टॉलधारक तेव्हा प्रदर्शनामध्ये सहभागी झाले. ’घे भरारी’ ग्रुपच्या माध्यमातून मुंबई, पुणे, नाशिक व कोल्हापूर आदी शहरांमध्ये प्रदर्शने भरू लागले. अशाच एका मोठ्या प्रदर्शनाची तयारी झाली आणि कोरोना आला.

कोरोना ही महामारीही होती आणि कर्तृत्ववान, संवेदनशील माणसाच्या कर्तृत्वासाठीचे आव्हानही होते. कोरोनामुळे ’घे भरारी’ ग्रुपने आयोजित केलेले प्रदर्शनही रद्द करावे लागले. मात्र, त्यात सहभागी होणार्‍या व्यावसायिकांंनी तर प्रदर्शनासाठी वस्तूंचे उत्पादन केले होते, वस्तू निर्माण केल्या होत्या किंवा विकत घेतल्या होत्या. एका मुलाखती निमित्ताने नीलम यांनी प्रदर्शनामध्ये साडी आणि कपड्यांचा स्टॉल लावू इच्छिणार्‍या एका महिलेची परिस्थिती पाहिली. ’घे भरारी’च्या प्रदर्शनामध्ये विकण्यासाठी त्यांनी साड्या आणि कपडे विकत घेतले होते. त्यावर डिझाईन करून घेतली होती. त्यासाठी पैसे मोजले होते. कर्ज काढले होते. कोरोनामुळे प्रदर्शन होणार नाही. मग हे साड्या, कपडे कुठे विकणार? कोरोना काळात घराबाहेरही पडता येत नव्हते. ही महिला स्वतःचे गार्‍हाणे मांडताना, धाय मोकलून रडली. ही व्यथा त्या एकट्या महिलेची नव्हती, तर सर्वच छोट्या-मोठ्या उत्पादकांची होती. याच काळात नीलम यांनी प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या व्यावसायिकांचा ऑनलाईन ग्रुप बनवला.

या सगळ्या व्यावसायिकांनी त्यांच्या उत्पादित वस्तू, कल्पना, सेवासंदर्भातली माहिती या ग्रुपवर टाकायची, यातून कुणाला काही विकत हवे असेल तर ते तत्काळ संबंधित विक्रेत्याशी संपर्क साधू शकत होते. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ’घे भरारी’ ऑनलाईन ग्रुपच्या माध्यमातूनच सर्व विक्रेत्यांच्या वस्तू विकल्या गेल्या आणि मागणीही वाढली. या काळात नीलम यांना जाणवले की, व्यावसायिकांना फेसबुक आणि इतरही ऑनलाईन माध्यम हाताळण्याचे तंत्र माहिती नाही. त्यामुळे पहिल्यांदा नीलम यांनी ते तंत्र पूर्णतः शिकून घेतले. उत्पादनांची जाहिरात कशी आणि कोणत्या वेळी केली तर ती फायदेशीर होईल, त्यासाठी हॅशटॅग कसा वापरायला हवा? कमीत कमी शब्दांत आपले म्हणणे कसे मांडायला हवे, याचा अभ्यास केला. हे सगळे शिकलेले त्यांनी ’घे भरारी’ ग्रुपच्या लाखो सदस्यांना शिकवले.

वस्ती पातळीवरच्या लाखो महिलांना नीलम यांनी विनामूल्य व्यवसाय प्रशिक्षण दिले आहे. नीलम म्हणतात की, ”कोणतेही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, झपाटून कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. आत्मनिर्भर समाज हाच आत्मनिर्भर भारताचा पाया आहे. आर्थिक आत्मनिर्भर समाजाच्या पूर्णत्वासाठी ’घे भरारी’ ग्रुपच्या माध्यमातून मला खारीचा वाटा उचलायचा आहे, हेच माझे ध्येय आहे.” नीलम यांचे लक्ष्य येणार्‍या काळात नक्कीच पूर्ण होईल, त्यासाठी त्यांना शुभेच्छा!

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.