सायबर सुरक्षेची विस्तारणारी कक्षा

    01-Jan-2024   
Total Views |
Article on DSCI Report on Cyber Security

‘डाटा सिक्युरिटी काऊंसिल ऑफ इंडिया’ (डीएससीआय) तर्फे भारतातील सायबर सुरक्षा बाजारपेठेचा सर्वंकष आढावा घेणारा, एक अहवाल नुकताच जारी करण्यात आला. या अहवालावर नजर टाकली असता, २०२३ मधील सायबर सुरक्षा क्षेत्रात भारताने घेतलेली डिजिटल भरारी अधोरेखित व्हावी. त्याचेच हे आकलन...

एखादे नवीन तंत्रज्ञान जनतेच्या वापरासाठी खुले झाले की, त्या तंत्रज्ञानासंबंधी उत्पादने, सेवा यांच्याही बाजारपेठा आपसूकच विकसित होत जातात. उदा. मोबाईलचा वापर जसजसा वाढत गेला, तसतशा नेटवर्क-इंटरनेटची सेवा देणार्‍या कंपन्यांपासून ते अगदी नाक्या नाक्यावर मोबाईल दुरुस्तीची दुकाने थाटली गेली. त्यामुळे लाखो हातांना रोजगार मिळाला. एवढेच नाही तर यासंबंधी शिक्षण-प्रशिक्षण देणारे मोबाईल इंजिनिअरिंगसारखे कोर्सेस, अभ्यासक्रमही नव्याने विकसित झाले. म्हणजे एकूणच काय तर तंत्रज्ञानाच्या दिवसागणिक विकासानुसार, त्या-त्या तंत्रज्ञानाची एक स्वतंत्र इंडस्ट्रीच आकार घेत असते. इन्फॉर्मेशन-टेक्नोलॉजी (आयटी) सेक्टरही भारतात ७०-८०च्या दशकात विकसित होत गेले आणि आज या क्षेत्राचा भारताच्या एकूण ‘जीडीपी’तील वाटा (२०२२ आर्थिक वर्षानुसार) हा ७.४ टक्के इतका होता. त्यामुळे तंत्रज्ञान हे केवळ वैज्ञानिक प्रगतीचा आधार नसून, अर्थव्यवस्थेच्या बहुध्रुवीय विस्तारातही योगदान देणारा एक महत्त्वाचा घटक आहे. हीच बाब लक्षात घेता, मोदी सरकारने मागील दहा वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्राला सर्वांगीण चालना दिली. ‘डिजिटल इंडिया’ अभियान, गावोगावी फायबर ऑप्टिक्सच्या माध्यमातून इंटरनेट कनेक्शन, ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ यांसारख्या अनेकविध मोहिमांमधून भारताची तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती मोदी सरकारने एका नव्या उंचीवर येऊन पोहोचली.

जसजसे डिजिटायझेशनचे वारे भारतात वाहत गेले, तसतसे सायबर सुरक्षेचा प्रश्नही कालपरत्वे गंभीर स्वरूप धारण करीत गेला. सर्व सेवासुविधा एका क्लिकवर मोबाईलमध्येच उपलब्ध होत असल्याने, सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले. अगदी विदेशातूनही भारतीय संकेतस्थळे, ई-मेल्स हॅक होऊ लागले. ई-मेल, संगणकांवरील संवेदनशील माहितीच्या सुरक्षिततेचा, गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आला. अशा या सायबर धोक्यांपासून बचावासाठी सायबर सुरक्षा यंत्रणा, सेवा आणि उत्पादने यांच्या स्वतंत्र बाजारपेठेनेही भारतात चांगलाच जम बसवलेला दिसतो. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, सायबर सुरक्षा म्हणजे केवळ संगणक-लॅपटॉमधील ‘अ‍ॅण्टिव्हायरस’ पुरता हा विषय मर्यादित नाही. यामध्ये सायबर सुरक्षा प्रदान करणार्‍या हरतर्‍हेच्या सेवा, उत्पादने यांचाही समावेश होतो. म्हणजे बघा, अ‍ॅप्लिकेशन सिक्युरिटी, क्लाऊड सिक्युरिटी, डाटा सिक्युरिटी, नेटवर्क सिक्युरिट वगैरे. या प्रत्येक प्रकारात पुन्हा विविध सेवा आणि तशीच असंख्य उत्पादने. यावरून सायबर सुरक्षेचा एक इंडस्ट्री म्हणून पसारा किती विस्तारलेला आहे, त्याची केवळ वरकरणी कल्पना यावी. काही वर्षांपूर्वी अशा उत्पादन आणि सेवांसाठी विदेशी कंपन्यांवरच आपण अवलंबून होतो. परंतु, आता भारतीय कंपन्यांनीही या क्षेत्रात पुढाकार घेतल्याने, सायबर सुरक्षा हीच मुळात एक स्वतंत्र इंडस्ट्री आणि बाजारपेठ म्हणून देश-विदेशात नावारुपास आलेली दिसते.

‘डाटा सिक्युरिटी काऊंसिल ऑफ इंडिया’ (डीएससीआय)तर्फे भारतातील सायबर सुरक्षा बाजारपेठेचा समग्र आढावा घेणारा, एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या अहवालात या क्षेत्रातील अनेक बारकावे आणि ट्रेंड्स यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने या क्षेत्रातील आर्थिक उलाढाल, खर्चाचे विश्लेषण, मनुष्यबळ उपलब्धता, कायदे आणि नियम, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा वेग इत्यादी बाबींचा समावेश आहे. सदर अहवालातील काही प्रमुख निष्कर्षांवर नजर टाकली असता, या क्षेत्रातील देशांतर्गत प्रगतीचा अंदाज यावा. गेल्या वर्षी भारतातील सायबर सुरक्षा बाजारपेठेने सहा अब्ज युएस डॉलर्सचा पल्ला गाठला. २०१९-२३ या कालावधीत ही बाजारपेठ ३० टक्के वेगाने वाढल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. सायबर सुरक्षेअंतर्गत असलेल्या एकट्या उत्पादनांच्या विभागामध्येही साडेतीन पटीने वाढ नोंदण्यात आली. त्यामुळे या बाजारपेठेची २०१९ साली एक अब्ज युएस डॉलरवर असलेली उलाढाल २०२३ साली ३.७ अब्ज युएस डॉलर्सपर्यंत झेपावली. या अहवालात सायबर सुरक्षेबरोबरच सायबर धोक्यांबाबतही प्रकर्षाने इशारा देण्यात आला.

त्यानुसार, या क्षेत्रात कार्यरत संस्थांनी ९० टक्के सायबर हल्ल्यांचा धोका हा ई-मेलच्या, ८४ टक्के ‘फिशिंग’च्या (विविध इलेक्ट्रॉनिक/ऑनलाईन माध्यमातून प्रलोभने दाखवून होणारी फसवणूक) स्वरुपात होत असल्याचेही अधोरेखित केले आहे. आधी म्हटल्याप्रमाणे, या बाजारपेठेचा वेगाने विस्तार होत असल्यामुळे, या क्षेत्रात मनुष्यबळाच्या समस्येनेही तितकेच गंभीर स्वरूप धारण केल्याचे दिसते. या अहवालानुसार, ७५ टक्के सर्वेक्षण केलेल्या संस्थांनी त्यांच्याकडे कुशल मनुष्यबळाची टंचाई असल्याचे कबूल केले. यावरून या क्षेत्राला भेडसावणार्‍या कुशल मनुष्यबळ संबंधीच्या आव्हानांचा अंदाज यावा. आता सायबर सुरक्षेचा सर्वाधिक वापर हा सामान्य नागरिकांतर्फे म्हणावा तितक्या प्रमाणात अजूनही होताना दिसत नाही. त्यामुळे या क्षेत्रातील अग्रगण्य ग्राहक म्हणजे (बी टू बी) म्हणजे बँका, आर्थिक व्यवहार करणार्‍या संस्था, इन्शुरन्स कंपन्या. त्याखालोखाल आयटी क्षेत्रातील कंपन्यांनाही सायबर सुरक्षा सेवासुविधांचा लाभ घेण्यासाठी गत्यंतर नाहीच. तसेच सायबर सुरक्षा जगतातील कंपन्यांनी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूूक केली आहे, असा प्रश्न केला असता, यापैकी ९७ टक्के कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, तर ८४ टक्के कंपन्यांनी क्लाऊड तंत्रज्ञानात गुंतवणूक केल्याचे स्पष्ट केले. यावरून या क्षेत्रातील कंपन्यांचा गुंतवणूक कलही नवतंत्रज्ञानाकडे असल्याची बाब अधोरेखित होते.

तेव्हा एकूणच काय तर, या अहवालावरुन सायबर सुरक्षा क्षेत्रातील भारताच्या विकासाभिमुख वाटचालीची प्रचिती येते. तसेच सायबर सुरक्षा क्षेत्राचे सरकारी, खासगी संस्थांमधील डिजिटल सुरक्षेच्या दृष्टीने अमूल्य योगदानही ध्वनित होते. भारताची या क्षेत्रातील वाटचाल निश्चितच आशादायी असून, भविष्यात या क्षेत्राचा आणखीन वेगाने विस्तार होईल, यात शंका नाही. त्यासाठी केंद्र सरकारचे डिजिटल धोरण, त्यासंबंधीचे कायदे, एकूणच सायबर सुरक्षेला वैश्विक पातळीवर प्राप्त झालेले महत्त्व हे दखलपात्र ठरावे. एवढेच नाही, तर ज्याप्रमाणे शस्त्रास्त्रांची एक मोठी जागतिक बाजारपेठ आज विकसित झालेली दिसते, त्याच धर्तीवर सायबर हल्ले, अगदी सायबर युद्धापासून बचावासाठीही सायबर सुरक्षा क्षेत्रातील तांत्रिक प्रगती मोलाची ठरणार आहे, यात यत्किंचितही शंका नाही!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची