न हिन्दू पतितो भवेत्।

    09-Sep-2023   
Total Views |
Vishwa Hindu Parishad Programme in Dadar

विश्व हिंदू परिषदेच्या षष्ठपूर्तीचा शुभारंभ कार्यक्रम बी. एन, वैद्य सभागृह, दादर येथे दि. ३ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्य आणि उद्दिष्टांची गाथा सांगणारी स्मरणिकाही प्रकाशित करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी होते- विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री स्वामी विज्ञानानंदजी आणि ‘चिन्मय मिशन’चे स्वामी स्वातमानंदजी. यावेळी साधुसंतानी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम म्हणजे हिंदू एकटा नाही, हे दाखवून देणारी एक विलक्षण अनुभूती होती. ‘न हिन्दू पतितो भवेत्’चा जागर करणारा हा कार्यक्रम. विश्व हिंदू परिषदेच्या या कार्यक्रमाचे शब्दचित्रण करणारा हा लेख...

“हिंदू जे बोलतो तेच करतो, बनायेंगे मंदिर असे म्हणाला आणि अयोध्या प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीवरचे स्वप्न साकार झाले. आता काशी-मथुरा बाकी आहे. तेही स्वप्न पूर्ण होईल,“ असे विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री विज्ञानानंदजी यांनी म्हटले आणि सभागृह ‘जय श्रीराम’, ‘बोलो सियावर रामचंद्र की जय’, ‘जय श्रीकृष्ण’,‘जयकारा वीर बजरंगी‘, ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दुमदुमले. काय नव्हते या घोषणांमध्ये, हिंदू धर्मासाठीचा उत्साह, आनंद आणि संकल्प. विश्व हिंदू परिषद षष्ठपूर्ती वर्षाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात स्वामी विज्ञानानंदजी बोलत होते. विश्व हिंदू परिषदेला ६० वर्षं पूर्ण होत आहेत. हिंदूंची विश्व व्यापी परिषद, असे नाम धारण केलेली ही संघटना. खरेच गोळवलकर गुरुजी, या सगळ्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली, ही संघटना विश्वातल्या हिंदूच्या श्रद्धाशील, धर्मशील जीवनाच्या सुरक्षिततेचे जणू पालकत्वच करत आहे, तर अशा विश्व हिंदू परिषदेने हिंदू समाजाच्या उत्थानासाठी आणि देशाच्या कल्याणासाठी किती आणि कसे मोठे कार्य उभे केले, याची माहिती स्वामी विज्ञानानंद यांनी दिली.

ते म्हणाले की, “रामजन्मभूमी आंदोलन असू दे की, रामसेतू आंदोलन असू दे, वनवासी क्षेत्रात उभारलेले लोकपयोगी प्रकल्प असू देत की, सेवावस्तीमध्ये चालणारे संस्कार केंद्र असू देत की, ज्येष्ठांच्या काळजीसाठी उभारलेली वृद्धाश्रमे, विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, वसतिगृहे या सगळ्याच परिक्षेपात विश्व हिंदू परिषद नि:स्वार्थी वृत्तीने काम करते. ‘न हिन्दू पतितो भवेत्’ हा एकच उद्देश विश्व हिंदू परिषदेचा आहे.“ स्वामी विज्ञानानंद सांगत होते आणि मला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात तसेच छत्तीसगढ, प. बंगाल, झारखंड येथे भेटलेले ते ‘जयकारा वीर बजरंगी’ म्हणत अत्यंत प्रतिकूल आणि असुरक्षित वातावरणातही जीवाची बाजी लावत काम करणारे विश्व हिंदू परिषदेचे, बजरंग दलाचे कार्यकर्ते आठवले. तसेच, सगळ्या जगाला त्रासदायक असलेले ‘लव्ह जिहाद’ समस्या. ‘लव्ह जिहाद’ची घटना घडली की, कसलीही तमा न बाळगता ‘लव्ह जिहाद’ घडवणार्‍या दुष्टांच्या विरोधात आवाज उठवणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आठवले. अर्थात रा. स्व. संघाच्या विचारांनी प्रेरित असलेल्या सर्वच संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते, असेच जीवन जगतात म्हणा!

असो. याच कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेच्या कार्याचा आणि ध्येयाचा उहापोह करणार्‍या स्मरणिकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. रा. स्व. संघ कोकण प्रांत संघचालक सतीश मोढ तसेच विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत अध्यक्ष जोगसिंह आणि प्रांताचे मंत्री मोहन सालेकर यांनीही या कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त केले. अर्थातच, कार्यक्रमाचे यजमानपद त्यांच्याकडे असल्याने त्यांनी या कार्यक्रमामध्ये केवळ हिंदू संघटन आणि कार्य यावर मत व्यक्त केले, तर मोहन सालेकर यांनी येणार्‍या काळात विश्व हिंदू परिषदेच्या संकल्पित कार्याबद्दल माहिती दिली. वस्ती स्तरावर विश्व हिंदू परिषदेची संघटनात्मक बांधणी होईल. तसेच, येत्या दिवाळीच्या दरम्यान विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून साधुसंत वस्ती पातळीवर समाजबांधवांच्या घरी जातील, असेही त्यांनी सांगितले. मला वाटते की, आपले साधुसंत वस्ती पातळीवर बांधवांच्या घरी जातील, हे अत्यंत महत्त्वाचे आणि स्तुत्य कार्य. कारण, तुम्ही धर्म-धर्म, देव-देव करता तुमचे साधू कधीतरी तुमच्या घरी येतात का? तुमची विचारपूस करतात का? बघ, मी येशूचा संदेश घेऊन किवा पैगंबरांचा संदेश घेऊन स्वतः तुझ्याकडे आलोय, असे म्हणत देशभरात वस्ती पातळीवर हिंदूचे धर्मांतरण करण्याच्या घटना सर्रास घडतात. या पार्श्वभूमीवर साधुसंतांचे जनसामान्यांच्या घरी होणारे आगमन, खूप मोठा बदल घडवू शकते.

या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. विश्व हिंदू परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी, शुभेच्छुक आणि मुख्यतः परिसरातील हिंदू समाज मोठ्या प्रमाणात एकवटला होता. त्यापैकी एक जैन मुनी शुक्रध्यानजी विजयजी महाराज. हिंदू-जैन-बौद्ध-शीख आपण सगळे एकच. याची प्रखर प्रचिती देणारे जैन मुनी शुक्रध्यानजी विजयजी महाराज यांचे मार्गदर्शन. ते म्हणाले की, “लोक काय करतात, हा काय करतो, तो काय करतो, यापेक्षा मी काय करू शकतो, हे माणसाने ठरवणे महत्त्वाचे. मी काय करू शकतो? रामायणामध्ये राणी कैकयीने प्रभू श्रीरामासाठी वनवास मागितला. त्यावेळी राजा दशरथ द्विधा मनस्थितीमध्ये असतात. रामाला कसे सांगावे? मात्र, प्रभू श्रीराम स्वतःठरवतात की, यावेळी काय केले पाहिजे. ते वनवास स्वीकारतात. त्यावेळी माता सीताला ते म्हणत नाहीत की, माझ्याबरोबर चल. मात्र, सीता स्वतः ठरवते की, प्रभू श्रीराम वनवास स्वीकारत आहेत, तर मलाही त्यांच्यासोबत गेले पाहिजे.

मोठा भाऊ आणि मातेसमान वहिनी वनवास स्वीकारून त्यांचा धर्म पालन करीत आहेत, तर भ्राता लक्ष्मणही स्वतःहून ठरवतो की, मी काय करू शकतो आणि तोही वनवास स्वीकारतो. मात्र, त्यावेळी राणी उर्मिला पती लक्ष्णासोबत जात नाही. सगळेच जर वनवासाला गेले, तर घर कोण पाहणार? ती तिचे कर्तव्य धर्मपालन करून स्वतः ठरवते. ती काय करू शकते आणि ती अयोध्येतच राहते. प्रभू श्रीरामचंद्र आणि भ्राता लक्ष्मण वनवासाला गेले. आपण काय केले पाहिजे, हे भरत ठरवतो. तो विचार करतो. दोन्ही भ्राता वनवासाला गेले, तर राजसत्ता प्रभू श्रीरामाचंद्राच्या नावाने सांभाळायला कुणी तरी हवे. मी काय करू शकतो, तर प्रभूंची पादुका ठेवून राज्याकडे लक्ष ठेवतो. बघा या सगळ्या आदर्शांनी ठरवले की, कोण काय करतो, ते न पाहता मी काय करू शकतो? मी जिथे आहे. तिथे नीतीमान, धर्मशील समाजोत्थानासाठी कुटंबाच्या प्रगतीसाठी मी काय करू शकतो, हा विचार, हा संकल्प आज आपण करूया. तुम्ही सगळ्यांनी ठरवा की, मी काय करू शकतो.

तसेच, आज आपण सर्वजण मिळून संकल्प करूया की धर्मविरोधी, समाजविरोधी आणि देशविरोधी व्यक्तींच्या लग्नाच्या वरातीतच काय, त्याच्या अंतयात्रेलाही जाणार नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचे समर्थन देणार नाही.“ जैन मुनी शुक्रध्यानजी विजयजी महाराज म्हणाले आणि श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. जैन मुनींचे म्हणणे महत्त्वाचे होते. कारण, ‘मी काय करू शकतो?’ हा प्रश्न नकारात्मकरित्या उपस्थित केला जातो. याउलट कोणत्याही परिस्थितीत सहभागी होण्यासाठी ‘मी काय करू शकतो’ हा विचार माणसाने अंगीकारला, तर बरेच कौटुंबिक, सामाजिक प्रश्न सुटू शकतात. कुठेही घडलेला अत्याचार आणि अन्यायाविरोधात उभे ठाकण्याची शक्ती ‘मी काय करू शकतो’ हा प्रश्न आपल्याला देऊ शकतो. तसेच, कुठे चांगले काही घडत असेल, तर ते अजून कसे चांगले होईल, यासाठी ‘मी काय करू शकतो’ हा विचार महत्त्वाचा!

जैन मुनींचे मार्गदर्शन ऐकताना विचार आला की, ‘मी काय करू शकतो?’ याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले आहे. महाविकास आघाडीने कारस्थान करत महाराष्ट्रात अडीच वर्षे सत्तेच्या नावाने गहजबच केला. कशाचा कशाला पायपोस नव्हता. त्यावेळी सगळा महाराष्ट्र हतबलच झाला होता. मात्र, त्यावेळी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी कार्यरत होते. महाराष्ट्राला दुष्टचक्रातून सोडवण्यासाठी ‘मी काय करू शकतो’ हा विचार त्यांनी केला असावा. त्यामुळेच तर आज महाराष्ट्रात सत्तापालट झाले. सत्तापालट झाल्यानंतर सरकारमध्ये बरेच फेरबदल झाले. मात्र, महाराष्ट्राच्या प्रगतीचे ध्येय साकारण्यासाठी त्यांनी सगळा बदल मनाने स्वीकारला. मनात हा विचार सुरू असतानाच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. श्रोत्यांना जैन मुनींचे म्हणणे मनोमन पटले होते. मोठ्या सभागृहात, नामांकित संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमातही जैन मुनींनी धर्मप्रथा पाळल्या होत्या.ठरवलेल्या नियमानुसार, जैन मुनी सूर्योदयानंतर भाषण करणार नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्वात आधी प्रबोधन केले. तुडुंब भरलेल्या सभागृहात माईक न घेता ते बोलत होते. जैन मुनींचे विचार सर्वार्थाने प्रबोधन करणारे होते.

जैन मुनींनंतर उपस्थितांना ‘इस्कॉन’चे स्वामी गौरांगजी महाराज यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “भारताची कुटुंबपद्धती ही परिपूर्ण आहे. जगभरात घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. पाश्चात्य देशात घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याने तिथे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. माणूस माणसाला पारखा झाला आहे. माणुसकी, नीतिमत्ता आणि धर्म शिकवणारी आपली कुटुंबव्यवस्था आहे. आपण भारतात जन्मलो आणि भारतीय कुटुंब पद्धतीमध्ये जगत आहोत, हे आपले अहोभाग्य. आपल्या कुटुंबात संवाद सौख्य कसे राहील, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.“ प्रभू गौरांग यांनी केलेल्या आवाहनाला उपस्थित माता भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर हभप वर्पे महाराजांनी ‘धर्मो रक्षति रक्षित:’चे जागरण केले. ते म्हणाले की, “आपण धर्माचे रक्षण केले, धर्म जगलो, तर धर्म आपले रक्षण करेल. संत ज्ञानोबा महाराजांनीही हेच सांगितले, सकल संतानी हाच मंत्र आपल्याला दिला आहे. धर्म टिकला तर आपण टिकू.“

कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी ‘चिन्मय मिशन’चे स्वामी स्वातमानंद यांनी ‘चिन्मय मिशन’चे ध्येय, उद्दिष्ट त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेची स्थापना कशी झाली, याची उजळणी केली. “देश प्रगतिपथावर आहे. मात्र, देशासमोर आजही अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी हिंदूंनी एकत्र यायला हवे. एकत्र यायचे म्हणजे केवळ ईश्वराचे नाव घ्यायचे का? तर ईश्वराचे कामही केले पाहिजे. ईश्वराचे काम म्हणजे धर्म, समाज, न्याय, नीतीचे काम,” असे म्हणून स्वामी स्वातमानंदांनी रामायणातील एक घटना सांगितली. ते म्हणाले की,”हनुमान लंकेकडे प्रस्थान करतात. रात्र झालेली असते. लंकेतील प्रत्येक घरातून राक्षसी वृत्तीचे प्रदर्शन सुरू असते. मात्र, एका घरातून प्रभू श्रीरामाचे नामस्मरण चालल्याचे ऐकू येते. हनुमान त्या घरात जातात. तर ते घर रावणाचा भाऊ विभीषण याचे असते. हनुमानज म्हणतात, “हे विभीषण, तू ईश्वराचे नाम घेतोस; पण ईश्वराचे काम करतोस का? अधर्माविरोधात उभा राहतोस का? किंवा जे अत्याचाराविरोधात उभे आहेत, त्यांना मदत करतोस का? नुसते ईश्वराचे नामस्मरण करून उपयोगाचे नाही, तर ईश्वराचे कामही करणे गरजेचे आहे.” हनुमानाचे म्हणणे एकून विभीषण रावणाच्या अत्याचाराविरोधात प्रभू श्रीराचंद्राच्या सोबत येतो. पुढे काय झाले, ते सगळ्यांनाच माहिती आहे. रावणाचा वध आणि विभीषण लंकाधिश होतो, तर हिंदूंनीही नुसते ईश्वराचे नामस्मरण न करता, ईश्वराच्या कार्यातही एकत्रितपणे सामील व्हायला हवे.”

स्वातमानंद महाराजांचे म्हणणे ऐकून मला बाबरी ढाँचा पाडल्याचा तो दिवस आठवला. शेकडो वर्षं हिंदू प्रभू श्रीरामचंद्रांचे नामस्मरण करत होता. प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्या जन्मभूमीसाठी रडत होता. मात्र, हिंदू एकत्रित झाला. ईश्वराच्या नामस्मरणासोबतच त्याने ईश्वरी कार्यातही एकजूटीने सहभाग घेतला आणि परिणाम अयोध्यमध्ये रामललांचे मंदिर उभे राहिले. दुसरे असेही वाटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीही देवधर्म मानतात. अगदी सार्वजनिकरित्या पूजतातही, श्रद्धा जपतात. देव-धर्म नामस्मरण करतात. मात्र, त्या नामस्मरणासोबतच ते हिंदू धर्माच्या अस्मितेसाठीचे ईश्वरी कार्य करतात. म्हणूनच तर आज देशातच नव्हे, तर जगात त्यांचा डंका वाजतोय, नाहीतर हिंदूंच्या मतांसाठी देव-देव करणारे आणि मंदिरात पूजाअर्चा करणारे अगदी जानवं घालून मी कसा ब्राह्मण आहे, असे सांगणारे नेतेही आहेत. पण, त्यांची डाळ काही शिजत नाही. मनात विचारांची मालिका सुरू होती. समोर एकापेक्षा एक विचारप्रर्वतक उद्बोधन सुरूच होते. धर्मविचारांचा जागर करणार्‍या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन मनात एक विचारज्योत जागृत झाली-ती म्हणजे हिंदू एकटा नाही. तो तसा हो नये, यासाठी मी काय करू शकते? ‘न हिन्दू पतितो भवेत्।’

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.