नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची आपल्या ७, लोककल्याण मार्ग या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली.
जी२० शिखर परिषदेसाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे शुक्रवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे दाखल झाले. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरच्या बायडेन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. जी२० शिखर परिषदेपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि अमेरिकेच्या आर्थिक आणि सामरिक हितांसह विविध जागतिक प्रश्नांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे द्विपक्षीय चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे ७, लोककल्याण मार्ग येथे स्वागत केले. त्यांच्यासोबतची बैठक अतिशय फलदायी ठरली असून त्याद्वारे भारत आणि अमेरिकेदरम्यानचे आर्थिक आणि नागरी संबंध अधिक दृढ होणार आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रांमधील मैत्री अधिक घट्ट होण्यासाठीदेखील ही बैठक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
अमेरिकेच्या ट्रेझरी सचिव जेनेट येलेन, परराष्ट्र सचिव अँथनी ब्लिंकन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) जेक सुलिव्हन हे अमेरिकेकडून तर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व एनएसए अजित डोवाल भारताकडून चर्चेवेळी उपस्थित होते.