चीनच्या चिंतेने हातात हात

    08-Sep-2023   
Total Views |
Vietnam needs more than an upgraded U.S. partnership

अमेरिका आणि व्हिएतनाम यांचे शत्रुत्व किती टोकाचे आहे, हे तसे जगजाहीरच. पाच ते सहा दशकांपूर्वी दोन्ही देशांमध्ये तब्बल २० वर्षं युद्ध चालले. यात सोव्हिएत संघ आणि अमेरिकेतही शीतयुद्ध सुरू होते. अशात व्हिएतनामने अमेरिकेला युद्धातमात दिल्याने जगभरात अमेरिकेची नाचक्की झाली. युद्धाची ठिणगी पडूनही पुढे दोन्ही देशांमध्ये संवाद कायम राहिला. १९९४-९५ नंतर दोन्ही देशांचे संबंध सुधारत गेले. आता अमेरिका आणि व्हिएतनाम संबंध आणखी दृढ करण्यासाठी आग्रही असून, याच महिन्यात दोन्ही देशांत अनेक महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता आहे. यात ‘सेमीकंडक्टर’ उत्पादन, ‘एआय’ प्रणाली आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास या मुद्द्यांचा समावेश आहे.

मागील काही महिन्यांपासून बायडन सरकार व्हिएतनामसोबत संबंध मजबूत करण्यावर भर देताना दिसते. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉर्ड ऑस्टिन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी नुकताच व्हिएतनामचा दौराही केला होता. त्यावेळी व्हिएतनामसोबत दोन्ही देशांतील संबंध आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानिमित्ताने अमेरिका-व्हिएतनाममधील शत्रुत्वाचे कारण आणि आता या दोन देशांना नेमकी एकमेकांची आवश्यकता का आहे, हे जाणून घेऊया.

व्हिएतनाम हा आग्नेय आशियातील एक देश असून उत्तरेस चीन, पश्चिमेस लाओस व कंबोडिया हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चीन समुद्र आहे. २०२०च्या जनगणनेनुसार, व्हिएतनामची लोकसंख्या सुमारे ९.७८ कोटी इतकी. दुसर्‍या महायुद्धादरम्यान अमेरिका आणि सोव्हिएत संघ अशा दोन्ही बाजूंनी युद्धाची ठिणगी पडली. संपूर्ण जग शीतयुद्धाचा सामना करीत होते. वर्चस्वासाठी दोन्ही देश एकमेकांशी लढत होते. त्यावेळी अन्य देश त्यांच्यासाठी एक आखाडा बनले होते. त्यात दक्षिण आणि उत्तर व्हिएतनाम यांचाही समावेश. दोन्ही देशांत युद्ध झाले; परंतु यात अमेरिका आणि रशियाने शक्तिप्रदर्शन केले.

इंडो-चीनवर फ्रान्सच्या नियंत्रणानंतर १९४६ मध्ये पहिले इंडो-चीन युद्ध झाले. १९५०चे वर्ष येईपर्यंत ही लढाई शीतयुद्धासोबत जोडली गेली. दि. ७ मे १९५४ साली फ्रान्स सैन्याने शरणागती पत्करल्यानंतर हे युद्ध संपले. त्यानंतर १९५४ मध्ये एप्रिल ते जुलैदरम्यान एक परिषद झाली. यात फ्रान्सच्या ताब्यातील सर्व भागांना स्वातंत्र्य घोषित करण्यात आले. कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनामला वेगळे करण्यात आले. यातही व्हिएतनामला तात्पुरत्या स्वरुपात उत्तर आणि दक्षिण, अशा दोन भागांत विभागण्यात आले. एकीकृत व्हिएतनामसाठी जुलै १९५६ पर्यंत सार्वत्रिक निवडणूक घेतली जाईल, अशी अट घातली गेली होती. मात्र, दक्षिण व्हिएतनाम आणि अमेरिकेने ही अट मानण्यास विरोध केला. दक्षिण व्हिएतनामने तर निवडणूक घेण्यासही नकार दिला आणि हेच नंतर व्हिएतनाम युद्धाचे मुख्य कारण बनले.

दि. १ नोव्हेंबर १९५५ साली या युद्धाला सुरूवात झाली, जे पुढे दि. ३० एप्रिल १९७५ साली संपले. यानंतर व्हिएतनामने आर्थिक सुधारणांवर भर दिला. त्यामुळे सोव्हिएत संघावरील अवलंबित्व कमी झाली. अमेरिकेचे तत्कालीन ०ाष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनीही कंबोडियात शांतता करार आणून दोन्ही सरकारमध्ये समेट घडवला. संयुक्त राष्ट्रातही व्हिएतनामच्या राजदूतांवरील प्रतिबंध हटवले गेले. अमेरिकन नागरिकांच्या व्हिएतनाम जाण्यावरील निर्बंधही शिथील करण्यात आले. १९९३ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष क्लिटंन यांनीही हनोई येथे पहिला अमेरिकन परराष्ट्र विभाग सुरू केला. तेव्हापासून दोन्ही देशांतील संबंध पुन्हा दृढ झाले.

आताही दोन्ही देशांच्या एकत्र येण्याचे प्रमुख कारण चीन हेच आहे. चीन दक्षिण चीन समुद्रात वर्चस्व वाढवत असल्याने अमेरिका आणि व्हिएतनाम चिंतेत आहे. २०००च्या सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये नियमित चर्चेला सुरुवात झाली. हिंद-प्रशांत भागातही अमेरिका चीनच्या वाढत्या वर्चस्वाने चिंतेत आहे. त्यामुळे या भागात चीनच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी अमेरिकेला व्हिएतनामसारख्या सहकार्‍याची गरज आहे. ज्यांचे चीनशी वाकडे आहे, त्यांनाही अमेरिका आपल्या जाळ्यात ओढत आहे. तिकडे व्हिएतनामलाही चीनचा सामना करण्यासाठी एक भक्कम मित्र हवा आहे. तो मित्र म्हणजेच अमेरिका. दोन्ही देशांचा शत्रू एकच असल्याने व्हिएतनाम आणि अमेरिकेत आता मैत्रीचे वारे वाहू लागले आहेत.

७०५८५८९७६७


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.