पोटनिवडणूक निकाल जाहीर; त्रिपुरा, उत्तराखंडमध्ये भाजपाची मुसंडी!

    08-Sep-2023
Total Views |
 PM Modi
 
मुंबई : सहा राज्यांतील ७ विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. उत्तर प्रदेशातील घोसी, उत्तराखंडमधील बागेश्वर, पश्चिम बंगालमधील धुपगुरी, त्रिपुरातील धनपूर आणि बॉक्सनगर, केरळमधील पुथुपल्ली आणि झारखंडमधील डुमरी येथे पोटनिवडणूक झाली.
 
त्रिपुरातील दोन्ही जागा भाजपने जिंकल्या आहेत. उत्तराखंडमधील बागेश्वरची जागाही भाजपला राखण्यात यश आले. केरळमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. यूपीच्या घोसी जागेवर भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये लढत आहे. घोसी मतदारसंघात सपाचे सुधाकर सिंह हे आघाडीवर आहेत.
 
बागेश्वर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) बाजी मारली. त्यांच्या उमेदवार पार्वती दास २,००० मतांनी विजयी झाल्या. काँग्रेसचे बसंत कुमार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्रिपुरातील बॉक्सनगर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. येथून भाजपचे तफजल हुसेन ३० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. तर सीपीएमच्या मिझान हुसेन यांना केवळ ३,००० मते मिळाली.
 
त्रिपुरातील धनपूर विधानसभेची जागा भाजपने जिंकली आहे. येथून भाजपच्या बिंदू देबनाथ यांनी सीपीएमच्या कौशिक देबनाथ यांचा १८,८७१ मतांनी पराभव केला. केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांनी धानपूरच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या जागेवर पोटनिवडणूक झाली होती.