रसिका शिंदे-पॉल
मनोरंजनसृष्टीतील विविध माध्यमांवर सत्य घटनांवर आधारित चित्रपट आणि वेब मालिकांची रांग लागलेली पाहायला मिळते. अशात अलीकडच्या काळात ओटीटीवर अनेक वेब मालिका या वास्तविक मांडणीतून आकारास येत असून प्रेक्षकांनाही त्या आवडत असल्याचे दिसून येते. यात 'स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी' या सीरिजचं नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. १९९२ साली शेअर बाजार घोटाळा प्रकरणातील आरोपी हर्षद मेहतावर ही मालिका आधारित होती. आता याच मालिकेच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी देशातील अजून एक मोठा घोटाळा वेब मालिकेच्या माध्यमातून समोर आणला आहे. हा घोटाळा म्हणजे स्टॅम्प घोटाळा. कोट्यवधी रुपयांच्या स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी ही वेब मालिका सोनी लिव्ह या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाली आहे. या मालिकेत अनेक मराठी कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यापैकी एक चेहरा म्हणजे अभिनेता शशांक केतकर याचा. शशांकने स्कॅम २००३ या वेब मालिकेच्या माध्यमातून हिंदी ओटीटी वाहिनीवर पदार्पण केले आहे. याच निमित्ताने 'महाएमटीबी'शी शशांकने संवाद साधला...
ओटीटी वाहिनीचा प्रेक्षक हा जगभरातून विविध आशय पाहात असतात आणि आपले सकारात्मक अथवा नकारात्मक मते समाज माध्यमांतून व्यक्त करतात. त्यामुळे अशा एका मोठ्या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या आणि देशातील सर्वात मोठा स्टॅम्पचा घोटाळा झाला होता त्या सत्य घटनेचा वेब मालिकेच्या माध्यमातून भाग होणे ही एक कलाकार म्हणून मोठी जबाबदारी होती असे शशांक म्हणाला. तसेच, अलीकडे ओटीटीवर किंवा चित्रपटगृहांमध्ये देखील एकामागून एक येणाऱ्या आशयांमध्ये काही चांगले विषय हे हरवून जातात अशी खंत देखील शशांकने व्यक्त केली. परंतु, देशातील घोटाळे जितके वाटकांना वृत्तपत्रांत वाचायला आणि बातम्यांमध्ये पाहायला आवडतात तितकीच पसंती जर का त्या स्कॅम्सवर आधारित वेब मालिकेतून मांडली तर प्रेक्षक अधिक उत्सुकतेने पाहतात, त्यामुळेच स्कॅम या श्रृंखलेचा सर्व वयोगटातील प्रेक्षक असल्याचेही शशांक म्हणाला.
ऑडिशन देऊन ५-६ महिने उलटून गेले होते आणि मी अपेक्षाच सोडली होती, पण....
स्कॅम २००३ या वेब मालिकेचा भाग कसा झालास असा प्रश्न विचारला असता शशांक म्हणाला, "एका मालिकेचं चित्रिकरण मी करत होतो, त्यावेळी मला हिंदी वेब मालिकेत एका रोल साठी ऑडिशन आहे असा फोन आला. नाशिकची गोष्ट असल्यामुळे मराठी व्यक्तिरेखा साकारयची आहे असे मला सांगण्यात आले. पण त्यावेळी माझ्या भूमिकेपेक्षा मला हिंदीसाठी काहीतरी करण्याची संधी मिळत असल्याने आनंदी होतो. मी ऑडिशन दिली आणि त्यानंतर ५-६ महिने उलटून गेले तरी मला प्रत्युत्तर आले नाही. मग मी पुन्हा दुसरी मालिका स्वीकारली आणि त्यात गुंतलो. काही महिन्यांनी पुन्हा फोन आला आणि माझं त्या वेब मालिकेसाठी निवड झाल्याची बातमी मला दिली आणि दिग्दर्शक म्हणजे कोण तर तुषार हिरानंदानी यांना माझं काम आवडलं आहे हे ऐकून मी स्तब्ध झालो. त्यानंतर मला अब्दुल करिम तेलगी याच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर आधारित वेब मालिका असल्याचे सांगितले आणि मग मी याचा भाग झालो", अशी वेब मालिकेत एन्ट्री मिळण्याचा अविस्मरणीय अनुभव शशांकने सांगितला. पुढे तो असं देखील म्हणाला की, "दिग्दर्शकांनी माझ्या पात्राची इतकीट ओळख मला करुन दिली की, या स्कॅमचा तर तेलगी बाप असेल तर तु त्या स्कॅमची आई आहे. कारण नाशिकला जर तेलगीला जे.के याने बोलावले नसते तर पुढचा घोटाळा झालाच नसता. त्यामुळे माझ्या पात्राची इतक्या कमी मात्र ताकदीची ओळख करुन दिल्याने काम करण्याचा हुरुप अधिक वाढले", असे शशांक यावेळी म्हणाला.
जेव्हा समोरासमोर मी खऱ्या अब्दुल करिम तेलगीला पाहिले होते
देशातील सर्वात मोठा घोटाळा करणाऱ्या अब्दुल करिम तेलगीला अगदी डोळ्यांसमोर पाहिल्याचा किस्सा शशांकने यावेळी महाएमटीबीशी बोलताना सांगितला. “एका डॉक्युमेंट्रीचा शुटसाठी पुण्याच्या कारागृहात जाण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी तेथील पोलिस अधिकारी आम्हाला लांबून तेथील गुन्हेगारांबद्दल माहिती देत होते. तिथेच अगदी ५० मीटरच्या अंतरावर एक व्यक्ती पांढरे शुभ्र कपडे परिधान करुन सावलीत आराम खुर्चीत पेपर वाटत बसला होता. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला सांगितलं की, तो समोर बसला आहे तो अब्दुल करिम तेलगी, ज्याने स्टॅम्प पेपरचा घोटाळा केला होता. त्यावेळी तेलगी आणि त्या स्कॅंची भीषणता काय होती हे मला ठाऊकच नव्हतं. मात्र, ज्यावेळी ही वेब मालिका माझ्याकडे आली आणि त्यात तेलगीच्या इतक्या जवळच्या माणसाची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली त्यावेळी खरंच भारावून गेलो आणि या घोटाळ्याची तीव्रता खऱ्या अर्थाने जाणवली", असा तेलगीबद्दलचा किस्सा शशांकने सांगितला. त्यामुळे जीवनात घडून गेलेल्या गोष्टींचा कुठेतरी संदर्भ हा लागतोच आणि त्याची प्रचिती अनेक वेळा आल्याचेही शशांकने म्हटले.
मराठी कलाकारांच्या चेहऱ्यांना सेलिब्रेट करणे गरजेचे
आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक चेहरे हे हिंदी अथवा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारताना दिसतात. तसेच, काही दाक्षिणात्य दिग्गज कलाकार देखील हिंदीत काम करत असून ज्यावेळी साऊथमधील कोणताही कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो त्यावेळी तो क्षण हा सेलिब्रेट केला जातो. उदाहरणार्थ, ज्यावेळी अभिनेते विजय सेतुपतींनी हिंदीत पदार्पण केले, तो क्षण हिंदी आणि दाक्षिणात्य या दोन्ही चित्रपटसृष्टीत साजरा केला गेला. तसाच सोहळा हा आपले मराठी कलाकार ज्यावेळी इतर भाषिक चित्रपटांमध्ये काम करतात त्यावेळी साजरा केला पाहिजे, असा अट्टहास व्यक्त करत शशांकने खंत देखील व्यक्त केली. महाराष्ट्रात मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेतील आशय पाहिला जातो आणि यात मराठी भाषेतील आशय इतर भाषांमध्ये हरवून जातो असेही शशांक म्हणाला.
मराठी कलाकारांच्या मागण्या आणि गरजा फार कमी असतात
हिंदीत अनेक ऐतिहासिक चित्रपट हे महाराष्ट्राच्या इतिहासाचा आधार घेत तयार केले गेले. त्याचेच उदाहरण देताना शशांक म्हणाला, "दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी १०० कोटींचा बाजीराव मस्तानी हा मराठमोळ्या योद्ध्याच्या जीवनावरील चित्रपट मराठीत तयार करण्यात खरं तर हरकत नव्हती. मराठीत एका मोठ्या कलाकाराला घेऊन जर हा चित्रपट केला असता आणि त्याचे डबिंग हिंदी, तेलुगु, मल्याळम या भाषांमध्ये केले असते तर खऱ्या अर्थाने मराठी कलाकार देखील इतर चित्रपटसृष्टीचे आकर्षण बनले असते आणि त्यांच्या अभिनयाला झळाळी मिळाली असती. गेली अनेक वर्ष मराठी कलाकार इतर भाषांतील चित्रपटांमध्ये काम करत आहेत. परंतु, जोवर मराठी कलाकारांना आपलीच चित्रपटसृष्टी कौतुकाची थाप देत नाही तोवर हा फरक राहणारच", असेही शशांकने ठामपणे म्हटले. आणि याच कारणामुळे मराठी चित्रपटसृष्टी आजही मागे पडली असून अनेक कलाकार आपापले मार्ग शोधत असल्याची सत्य परिस्थिती देखील त्याने बोलून दाखवली. शिवाय मराठी कलाकारांच्या गरजा आणि मागण्या या फार नसतात, त्यांना रंगभूमीचा कणा असतो आणि याचमुळे मराठी कलाकार इतर सर्व कलाकारांपेक्षा अभिनयाच्या बाबतील वरचढ असतात असेही तो म्हणाला.