कल्लाकारांच्या आठवणीतील ‘दहीहंडी’

    07-Sep-2023
Total Views |
 
dahihandi
 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
सर्वत्र सणांचे वारे वाहू लागले असून एक वेगळचं आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. आजचा दिवस देखील तसा खास आहे. आज दहीहंडी... बाल गोपाळांचा आनंदाने बागडण्याचा दिवस म्हणजे गोपाळकाला. देशभरात हा सण अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. श्री कृष्णाचाच्या जन्मानंतर देशात विविध राज्यांमध्ये दहीहंडी फोडली जाते. गोपाळकालेचे स्वरुप शहर, गाव येथे वेगळ्या रुपात अनुभवण्यास मिळते. सामान्य माणसांपासून ते आबालवृद्ध आणि कलाकारांपर्यंत सगळ्यांसाठी दहीहंडीचा दिवस हा कल्ला करण्याचा असतो. अशाच काही मराठी कलाकारांनी त्यांच्या बालपणीच्या दहीहंडीच्या आठवणी ‘दै. मुंबई तरुण भारत’ला सांगितल्या आहेत. याशिवाय बदलत्या सणांचे स्वरुप त्यांच्या लेखी कसे आहे हे देखील त्यांनी सांगितले आहे.
 
“लहानपणापासून बिल्डिंगमध्ये मित्रांसोबत खेळलेली दहीहंडी आजही लक्षात आहे. कारण आम्ही सर्व गोपाळ वर्गणी काढून त्यातून हंडी विकत घ्यायचो. आता दहीहंडीचं स्वरुप बदललं आहे. आता जशी ३ लाखांची हंडी असते, ८-१० थर असतात, तर ज्या स्पर्धा असतात त्या पुर्वी नव्हत्या. माझ्या लहानपणी किंवा मी अभिनय क्षेत्रात येईपर्यंत सण हे सण होते, त्यांना स्पर्धेचं स्वरुप नव्हतं. त्यामुळे माझ्या बालपणी छोटेखानी साजरी करणारी दहीहंडी ही फार उत्साह देणारी होती. कोणत्याही राजकीय नेत्यांचा किंवा मोठ्या हस्तींचा हस्तक्षेप नसायचा आणि त्यात खरी मौज असायची. मोरया चित्रपटात दहीहंडीचं गाणं होतं आणि त्यात हंडी फोडण्याचा प्रसंग होता. तर त्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बालपणीची दहीहंडी फोडण्याचा आणि ती मजा पुन्हा अनुभवण्याचा योग आला होता जो कायम स्मरणात आहे”.
 
संतोष जुवेकर, अभिनेता
 


santosh
 
“लहानपणी नक्कीच मी देखील हंडी फोडली आहे. आणि आता माझ्या लहान मुलाला आपले भारतीय सण, संस्कृती समजावून सांगताना पुन्हा एकदा मी माझं बालपण जगत आहे. त्याच्यासाठी मी घरच्याघरीच हंडी बांधून ती फोडणार आहे. कल्याणमध्ये माझं बालपण गेलं. आणि त्यावेळी दहीहंडी हा सण म्हणून पाहिला जायचा, त्यात कोणतीही जीवघेणी स्पर्धा नव्हती. मुलींची अशी वेगळी दहीहंडी नव्हती. पण आता मुलींच्याही ८-१० थरांच्या मोठ्या हंड्या लागतात हे काळानुरुप बदलत गेलेली सणांची व्याख्या आहे असंच खरं तर म्हणावं लागेल. पण आम्ही गल्लीतील मित्र-मैत्रिणी आणि काही पथकं आजूबाजूच्या भागांत फिरायचो आणि हंड्या फोडायचो. आता मुंबईतील हंड्यांना एक वेगळंच रुप मिळालं आहे. कलाकारांना मोठ्या-मोठ्या हंड्या असतात तिथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलावतात. तशी माझी वादळवाट मालिकेच्या वेळी सेलिब्रिटी म्हणून दादर मधील आयडिलच्या गल्लातील हंडी फार स्पेशल होती. माझ्यामते माध्यमांमुळे दहीहंडी किंवा अन्य कोणत्याही सणांना वैश्विक स्वरुप मिळाले आहे. जगभरात आपले भारतीय सण माध्यमांमुळे पोहोचतात, पण त्यांचे महत्व देखील पोहोचणे हे तितकेच गरजेचे आहे”.
 
अदिती सारंगधर, अभिनेत्री
 

aditi sarangdhar
 
“माझं बालपण हे नाशिकमध्ये गेलं. तिथे मुंबईत जशा मोठ्या हंड्या असतात तशा नसायच्या. अगदी छोट्या पद्धतीने पण मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा केला जायचा. फार उंच हंडी न उभारता सर्व वयोगटातील गोपाळांना त्या सणाचा आनंद घेता यावा अशी लहानशी हंडी बांधायचे. “माझ्या शाळेची खास आठवण सांगायची झाली तर, मी शाळेच हंडी फोडली होती. आमची मुलींची शाळा होती. राधा जशी नटायची, श्रृंगार करायची तश्याच पद्धतीने छान तयार होऊन आम्ही मुली शाळेत जायचो. आमच्यापैकीच कुणीतरी कृष्ण झालेली असयाची, पण आम्ही द्विधा मनस्थितीत असायचो. एकीकडे कृष्ण म्हणून आम्हाला दही चोरण्याची मजा करण्याची इच्छा असायची तर दुसरीकडे राधा सारखे नटुन थटून जायचे असायचे. राधा जशी कानापासून नाकापर्यंत नथ किंवा गोल नथ घालायची तो अट्टहास आम्ही मुली पालकांकडून पुर्म करुन घ्यायचो”.
 
अनिता दाते, अभिनेत्री
 

anita date 
 
 
 
“बालपण डोंबिवलीत गेल्यामुळे सणांचं वेगळं कौतुक आणि महत्व मला लहानपणापासून होतं. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये १९९८-९९ साली पहिली मुलींची दहीहंडी मी सुरु केली होती. कारण कायम असं वाटायचं की फक्त मुलचं का थरांवर उभे राहणार आणि हंडी फोडणार, तर तशी मुलींची दहीहंडी मी केली होती. इतकंच नाही तर प्रत्येक सणाला मुलींनी काहीतरी वेगळं करायवं असा माझा कायमच अट्टहास असायचा”.
 
तेजश्री प्रधान, अभिनेत्री
 

tejashree pradhan