मुंबई : दरवर्षी महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षीही राज्यात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होत आहे. अशात राजकीय नेत्यांनी दहिहंडी कार्यक्रमांची जोरदार तयारी केली आहे. तर दुसरीकडे, ऐन उत्सवात ठाकरे गटाला दहीहंडीची परवानगी नाकारली आहे. ठाकरे गटाचे लालबाग परिसरातील माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांना भारतमाता परिसरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यास भोईवाडा पोलीस ठाण्याने परवानगी नाकारली असून यामुळे लालबाग परिसरातील उत्सवप्रेमींमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करीत या उत्सवाला परवानगी नाकारण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील परळ परिसरातील भारतमाता चित्रपटगृहासमोर दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा मानस व्यक्त करीत अनिल कोकीळ आणि शाखा क्रमांक २०४ च्या वतीने भोईवाडा पोलीस ठाण्याकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. येथे गुरुवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार होता. मात्र, चेहलम सणानिमित्त ७ सप्टेंबर रोजी या भागातून मिरवणूक काढण्यात येते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. म्हणुन, दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारण्यात आली आहे.
यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी उशिरा अर्ज नाकारल्याचे कोकीळ यांचे म्हणणे आहे. कार्यक्रमासाठी व्यासपीठ, चषक, सहभागी होणाऱ्या गोविंदांसाठी जेवण अशी सर्व तयारी झालेली असताना परवानगी नाकारल्याचे कोकीळ यांनी सांगितले.