‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने महाराष्ट्रातील पाच शिक्षक सन्मानित !

    06-Sep-2023
Total Views |

mrunal ganjale


नवी दिल्ली :
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त ५ सप्टेंबर, २०२३ रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले. शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

शैक्षणिक मोबाईल ॲप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवाणी, यू-ट्यूब, आकाशवाणी, सॉफ्टवेअर, हार्डवेअर अशा नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह आदी उपस्थित होते.
शालेय विभागात आंबेगाव, पुणे येथील, जिल्हा परिषद शाळेच्या मृणाल नंदकिशोर गांजाळे, उच्च शिक्षण विभागात व्हीजेटीआय, मुंबईचे केशव काशिनाथ सांगळे, धुळेमधील शिरपूर तालुक्यातील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेतील डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील, आयआयटी मुंबईतील डॉ. राघवन सुनोज तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात सरकारी आयटीआय लोअर परेलच्या स्वाती देशमुख या शिक्षकांचा समावेश आहे.

जाणून घेऊया या शिक्षकांबद्दल सविस्तर : 

मृणाल गांजाळे
पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पिंपळगाव महाळुंगे येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांना २०२३ या वर्षाचा शालेय विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National Teachers’ Award 2023) प्रदान करण्यात आला. भारतातून 50 शिक्षकांची तर महाराष्ट्रातून एका शिक्षिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना यापूर्वी २०१९ मधील राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार व २०२२ मधील राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

raghvan sunoj

 राघवन बी. सुनोज
प्रा. राघवन बी. सुनोज मूळचे तिरुवनंतपूरमचे आणि आयआयटी मुंबईचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांना अध्यापन आणि संशोधनासाठी सन २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. रसायनशास्त्रामध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले असून 2001 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरकडून त्यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला आहे. वर्ष 2012 पासून ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.


keshav sangle

केशव सांगळे
केशव सांगळे यांना उच्चशिक्षणातील स्थापत्य अभियांत्रिकीमधील शैक्षणिक योगदान, संशोधन, शोधनिबंध, विद्यार्थी मार्गदर्शन, शैक्षणिक प्रशासन, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संस्था, राज्य व राष्ट्रीयस्तरावर केलेली मदत, राज्य व देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम केल्याबद्दल सन 2023 या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

patil

चंद्रगौडा रावसाहेब पाटील
चंद्रगौडा रावसाहेब पाटील यांना उच्च शिक्षणातील तंत्रज्ञान वापर, समाज उपयोगी संशोधन तसेच नाविन्यपूर्ण व विद्यार्थीभिमुख शिक्षण पध्दतीचा विकास व वापरासाठी २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.


swati

स्वाती योगेश देशमुख
अत्यंत समर्पित आणि कुशल संगणक कौशल्य प्रशिक्षणात उल्लेखनीय कारकीर्दीची दखल घेत, स्वाती योगेश देशमुख यांना वर्ष 2023 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांना 22 वर्षांच्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अनुभवासह, विद्यार्थ्यांना संगणक-संबंधित विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या कौशल्याचा गौरव केला गेला. त्यांनी आजपर्यंत 500+ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण आणि मदत करून सर्वसमावेशकता आणि समर्पण दर्शविले आहे.