संगीत ते समाधी

    06-Sep-2023
Total Views |
Article On Humankind Should Understand Yoga Bhasha

योगभाषेत मानवांना ‘क्षिप्त’ असे म्हटले आहे. सर्वांत खालची ज्ञानावस्था म्हणजे मूढ अवस्था होय. नंतरची ‘क्षिप्त’ म्हणजे मर्यादित शक्तीची. त्यानंतर साधकांची अवस्था म्हणजे ‘विक्षिप्त’ अवस्था होय. म्हणूनच आमच्यासारखा जो वागत नाही, त्याला आम्ही ‘विक्षिप्तात’ काढीत असतो. मात्र, आम्ही असतो त्या विक्षिप्ताच्यापेक्षा खालच्याच अवस्थेत! त्यानंतरची अवस्था म्हणजे एकाग्र अवस्था होय. गंधार ग्राम वा गंधर्वांची अवस्था ही होय. ही एकाग्र अवस्था सतत टिकविता आल्यास साधक स्वरांचे पंचगुणात्मक अनुभव घेऊ शकतो व स्वर सामर्थ्याने श्रोत्यांना देऊ शकतो, पण ही अवस्था फार थोड्यांच्या वाट्यास येते.

विक्षिप्त अवस्थाच तर फार थोडे अनुभवू शकतात. वस्तुलाभ या गंधार अवस्थेतील गंधर्व नगरीत होऊ शकतात. ती गंधर्व अवस्था म्हणजे एकाग्र अवस्था होय. शेवटची अवस्था म्हणजे चित्ताची निरोध अवस्था होय. चित्ताची ही निरोध अवस्था साधकाला देवता बनविते. याच निरोध अवस्थेतील ग्रामदेवतांसह स्वर्गात जाऊन लोप पावला असल्यास नवल नाही. चित्रपटात वैज्ञानिकांना अजून गंधगुण आणता आला नाही. कारण, चित्रपटात सारा व्यवहार प्रकाशाद्वारे चालतो. प्रकाशाच्या लहरींना गंधगुणांच्या लहरी इतके जड करता येत नाही म्हणून आजपर्यंत चित्रपटसृष्टीत गंध दरवळू शकला नाही.

गायनातील व्यवहार आकाशाच्या शब्द गुणांच्याद्वारे चालतो. आकाशाचा शब्दगुण पृथ्वी तत्वाच्या गंध गुणापर्यंत जड करणे आणखीच कठीण आहे. पण, आकाश व पृथ्वी तत्व ही तत्व वर्तुळातील दोन विरुद्ध टोके असल्याने निकटच आहेत, म्हणून शब्द गुणांच्याद्वारे गंधगुणाला प्रकट करता येते. म्हणून भारतीय संगीतातील गानरचनेत शब्दाला स्पर्श अनुभवता येतो. श्रीकृष्णाची रासक्रीडा, देवदेवतांचे व रागरागिण्यांचे स्पर्शसान्निध्य हा त्यातीलच एक प्रत्यय होय. या कविकल्पना नसून प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यायोग्य आचार उच्चार मात्र हवेत. या दिव्य स्पर्श अवस्थेचा आजही अनुभव घेता येईल.

पाश्चात्त्यांनी स्वतःच्या श्रमचिकाटीने स्वरांना त्रिगुणात्मक मात्रा अवस्थेत आणून सोडले आहे, तर आम्ही भारतीयांनी स्वतःच्या प्राचीन संगीताला पंचगुणात्मक अवस्थेतून घसरवीत-घसरवीत त्रिगुणात्मक नव्हे, तर केवळ श्रवणगुणापर्यंत आणून सोडले आहे. केवढा हा पराक्रम! योग्य प्रयत्न केल्यास स्वराचे पंचगुणात्मक स्वरुप व अनुभव आजही प्राप्त होऊ शकतात. पण, प्रकाशवेगाच्या वर जाणारी व पृथ्वीतत्वाच्या अतिजड कंपनापर्यंत स्थिर होऊ शकणारी उपकरणे अस्तित्वात येईपर्यंत आम्हाला पाश्चात्त्यांच्या तोंडाकडे पाहात बसावे लागेल किंवा भारतीय योगशास्त्राने सुलभ केलेले मार्ग आचरावे लागतील. भारतीय संगीत आवर्जून सांगते की, स्वरांमध्ये पंचगुणात्मक सामर्थ्य असल्याने योग्य पद्धतीने गायनवादनाचा अभ्यास केल्यास सर्व प्राप्त होऊ शकते. पण, त्याकरिता साधने करावी लागतील किंवा तत्सम उपकरणे तयार करावी लागतील. आमच्या पूर्वजांनी साधना करून सर्व प्राप्त करून घेतले आहे. रावण एक महान गानयोगी होता. त्याने गानयोगाने भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले होते. गायनकुशल गंधर्व तर स्वतःची अद्भुत गंधर्वनगरीच उत्पन्न करीत असत.

स्वरशास्त्र आणि स्वरोदयशास्त्र

स्वर म्हटले की, आमच्यासमोर साधारणतः ‘सा, रे, ग, म, प, ध, नी’ हेच स्वर येतात. त्यातील चित्रविचित्र स्वररचना म्हणजे आमचे स्वरशास्त्र होय. परंतु, आमच्या असल्या स्वरशास्त्राचा विलास आज तरी केवळ षड्जग्रामापुरताच मर्यादित आहे. गंधारग्राम गंधर्वांसह आणि मध्यमग्राम देवांसह लोप पावला आहे. त्यातील स्वरशास्त्रांचे आम्हाला आज तरी मुळीच ज्ञान नाही. राजा विक्रमादित्याच्या दीपक रागाबद्दल आम्ही बरेच ऐकतो. अकबर बादशहाच्या दरबारात स्वतःलासेवा रुजू करण्याकरिता मुसलमानत्व पत्करून मोठा झालेला लाडका गायक मियाँ तानसेन आमचा गायनादर्श होय. त्यांच्याही दीपक रागाबद्दल आम्ही ऐकतो व ते सर्व खरे मानून त्यावर ग्रंथ रचतो व चित्रपटही तयार करतो. परंतु, या दीपक रागाचे स्वरुप काय? तो कसा गावा? गाण्यापूर्वी तो कसा सिद्ध करावा? त्याकरिता गायकाच्या जडसूक्ष्म शरीराची अवस्था काय असावी लागते, याबद्दल आम्हाला अणुस्फोटाइतकेच ज्ञान आहे. तरीपण आम्ही मियाँ तानसेनाची तोंडभर स्तुती करतो व त्याने दीपक राग म्हणून दिवे लावलेत, असे मनोमय मानतो व धन्य होतो.

राजा विक्रमादित्याबद्दल असे वर्णन आहे की, त्याला हातापायाने थोटा केल्यावर एका तेल्याला त्याची दया येऊन त्याने त्याला आपल्या तेलघाणीवर धोंड्याऐवजी वजन म्हणून बसविण्याकरिता पोसले. तेलघाणी चालू झाली. रात्र झाली. तेलघाणीचा कर्र-कर्र आवाज चालू होताच. राजा विक्रमादित्य आपल्या पूर्व जीवनाचा चित्रपट पाहत होता. आता तर तो हातपाय तोडलेला एक अपंग मांसगोळा बनला होता. तेलघाणीवर बसून-बसून तो थकला. रात्र झाली. त्याच्या मुखातून संगीताचे स्वर बाहेर पडू लागले. जीवन अतिशय दुःखमय व अवहेलनेने परिपूर्ण असताना राजा विक्रमादित्याच्या गळ्यातून श्री किंवा मारुहसारखे रागाचे स्वर निघायला पाहिजे होते. परंतु, विधियोग निराळाच होता. राजा विक्रमादित्याच्या गळ्यातून सूर निघू लागले. सर्व शहरात जागोजागी अवकाशात ज्योती पाजळू लागल्या. काय चमत्कार हा कोणाच्या तपोबलाने या ज्योती चमकताहेत? नागरिक शोध घेऊ लागले.

पण, बरेच गायक ठायी-ठायी गायन करीत होते. कित्येकांना वाटले की आपल्याच गायनाने हे दिवे लागले आहेत. गायकांचे गायन बंद पडले, पण ज्योती प्रखरच होत होत्या. याचा अर्थ इतरजनांच्या गायनाने हे दिवे लागले नव्हते. कोण हा महात्मा असावा की ज्याच्या तपोबलाने या शतज्योती पाजळल्या? उत्सुक जन गावात फिरायला लागले. तेल्याच्या घाणीवर एक हातपाय तोडलेला जीवंत गोळा गाणे म्हणत होता. इतरांना विचित्र व बेसूर वाटणारे ते गाणे! त्यात रस नाही की स्वर नाहीत. रसहीन व बेसूर गाणे आणि गाणारा कोण? तर इतरांना वाटणारा एक अट्टल बदमाष की ज्याने राजकुमारीचा कंठा चोरला म्हणून राजाने त्याचे हातपाय तोडले होते! लोक त्याला वेडावू लागले. “ए थोट्या, शहरात चमत्कार होत आहेत. अधांतरी दिवे लागत आहेत, भलत्या वेळेस हे काय वेडेवाकडे गाणे म्हणतोस. बंद कर तुझे रडणे.” राजा विक्रमादित्य भानावर आला. उत्तर देण्याकरिता त्याने गाणे बंद केले. तो काय, सार्‍या दीपज्योती निमाल्या. ‘शतसूर्य मालिकांच्या दीपावली निमाल्या’ काय? या थोट्याच्या, बदमाषाच्या गायनाने या दीपज्योती पाजळल्या होत्या?’ तेली गहिवरला, राजा धावत आला. सारे पौरजन विस्मयाने व आदराने नतमस्मक झाले. तो खरोखरीच राजा विक्रमादित्य होता. (क्रमश:)

योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७