कर्ज मिळेल का कर्ज?

    06-Sep-2023   
Total Views |
Article On China's debt-trap diplomacy

एका करारानुसार, पाकिस्तानने म्यानमारला २०१९-२१ या काळात ‘जेजी-१७ थंडर मल्टी रोल फायटर जेट’ पुरवले होते. हे फायटर जेट विमान ‘पाकिस्तान एरोनॉटिकल कॉम्प्लेक्स‘ आणि चीनच्या‘चेंगडू एअरक्राफ्ट इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन’ या दोघांनी मिळून निर्माण होते. मागच्या काही दशकांचा मागोवा घेतला; तर जाणवते की, चीन जगभरातील अविकसित देशांमध्ये शस्त्रास्त्र आणि युद्धसामग्री निर्यात करतो.

मुख्यतः आफ्रिका खंडातील गरीब देशांमध्ये चीन हे साहित्य पुरवित असतो. युद्धसामग्री पुरविल्यानंतर काही दशकांतच, त्या देशांमध्ये अराजकता माजते आणि देशाची सत्ता पालटते. ती सत्ता चीनधार्जिणी असते. अमेरिका, रशिया आणि तेलसंपन्न मुस्लीम देशांपेक्षा आपण मोठे आहोत, हे चीनला दाखवायचे असते. चीन गरीब देशांवर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अतिक्रमणही करत असतो, तर म्यानमारचेही असेच.

तर म्यानमारला शस्त्रास्त्रांचा आणि युद्धकुशल विमानांचा पुरवठा करण्यात चीनने पुढाकार घेतला. त्यासाठी सहकारी म्हणून पाकिस्तानला घेतले. पाकिस्तानकरवी चीनने ‘जेजी-१७ थंडर मल्टी रोल फायटर जेट’ म्यानमारला विकले. मात्र, आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानी सेना प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर म्यानमारच्या ‘जुंटा’ सैन्याचे नेते जनरल मिन आंग लांइग भयंकर चिडले आहेत. कारण, चीन आणि पाकिस्तान या दोघांनी मिळून बनवलेली आणि पाकिस्तानने म्यानमारला विकलेले, हे फायटर जेट चांगली कामगिरी करू शकले नाहीत. ११ फायटर जेट खराब झाले.

म्यानमारने यासंदर्भात पाकिस्तानकडे तक्रारींचा तगादा लावला. जेट दुरुस्तीसाठी पाकिस्तानने त्यांचे अभियंते म्यानमारमध्ये पाठवले. बिघाड असलेल्या फायटर जेट विमानांमध्ये ते काहीही दुरुस्ती करू शकले नाहीत. ते हात हलवत परतले. (आता पाकिस्तानचे अभियंते पाकिस्तानसारखेच असणार ना?) यामुळे तर म्यानमारचे सैन्य आणखीनच खवळले. त्यांनी चीनकडेच मागणी केली की, हे फायटर जेट तत्काळ दुरुस्त करून द्या. पण, चीनही टाळाटाळ करीत आहे. विशेष म्हणजे, चीनने पाकिस्तानसोबत बनवलेले हे फायटर जेट चीनच्या सैनिकी सामग्रीमध्ये समाविष्ट नाहीत, बरं का! याचाच अर्थ स्पष्ट आहे की, फायटर जेट निकृष्ट दर्जाचे आहेत. ही माहिती असल्यामुळेच चीनने हे जेट त्यांच्या सैन्य सामग्रीमध्ये समाविष्ट केले नाहीत.

असो. या सगळ्या प्रकारावरून पाकिस्तानची पुन्हा जगभर नाचक्की झाली. भारतापासून मोठ्या तोर्‍यात वेगळा झालेला पाकिस्तान आता भारताच्या पायाच्या धुळीबरोबरही सामना करण्यास असमर्थ आहे. पण, तरीही दिखावा करण्यामध्ये पाकिस्तान कुठेही कमी पडत नाही. याच्याकडे कर्ज माग, त्याच्याकडे कर्ज माग, देशातली स्थावर संपत्ती विक यांवरच पाकिस्तानची गुजराण सुरू आहे. आता नवे काय? तर सौदी अरब पाकिस्तानमध्ये २५ अरब डॉलर्सची गुंतवणूक करणार, असे पाकिस्तानने जाहीर केले. सौदी अरब आपला मित्र आहे आणि आपलाच शुभचिंतक आहे, हे दाखवण्यासाठी पाकिस्तानची ही खेळी आहे का? असे प्रथमदर्शनी तरी वाटते. कारण, ‘जी २०’ निमित्त सौदी अरबचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान भारताचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी जगभरात आपला दबदबा प्रस्थापित केला.

भारताचा ध्वज आणखीन उंच केला, हे पाकिस्तानला चांगलेच माहिती आहे. सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांची भारताशी आणि मुख्यतः पंतप्रधान मोदींशी जवळीक झाली तर? हा प्रश्नच पाकिस्तानला छळतो. त्यामुळे भारताच्या दौर्‍यापूर्वी किंवा दौर्‍यानंतर तरी राजकुमार मोहम्मद बिन सलमानने पाकिस्तानला भेट द्यावी, यासाठी पाकिस्तान जंग-जंग पछाडत आहे. भारतामध्ये दौरा केला म्हणून काय झाले? सौदी अरब पाकिस्तानचाच समर्थक आहे, हे जगजाहीर करण्यासाठी सौदी अरब २५ अरब डॉलर कर्ज देणार, हे पाकिस्तान सांगत आहे. मिठापीठाला महाग झालेला पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मुद्रा कोशाकडेही कर्जाची मागणी करतो. भारत सूर्यावर जाण्याचे स्वप्न पाहातो, तर पाकिस्तानपुढे एकच स्वप्न आहे की, कुठून किती कर्ज मिळेल? काय करावे, ज्याची त्याची लायकी!!

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.