सुमंगल ते श्रीकृष्ण-जीवन!

    06-Sep-2023
Total Views |
Article Lord Shri Krishna Janmashtami

थोर महापुरुषांच्या शृंखलेत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आणि योगेश्वर श्रीकृष्ण ही दोन नावे उच्चारली वा ऐकली की प्रत्येकाची मान श्रद्धेने झुकल्याशिवाय राहत नाही. या दोन्ही महापुरुषांच्या जीवनाचे उद्दिष्ट समाज व राष्ट्राची नवनिर्मिती करून सर्वत्र मानवतेची दिव्य पताका फडकावणे हेच होते. या दोन्ही सत्पुरुषांनी आपापल्या युगात जे महत्तम कार्य केले आहे,ते युगानुयुगे समग्र मानवसमूहाला प्रेरणा देत राहील. आज गोपाळकाल्यानिमित्त ही कृष्णमहती...

श्रीकृष्णांच्या पावन सच्चरित्रावर दृष्टिक्षेप टाकल्यास आपणांस असे निदर्शनास येते की, त्यांनी तत्कालीन दुरवस्थेला सुव्यवस्थेत रूपांतरित करण्यात मनसा, वाचा, कर्मणा महनीय योगदान दिले आहे. आपल्या जन्माची पवित्र अभिलाषा व्यक्त करताना ते स्वतःच म्हणतात-

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
म्हणजेच जेव्हा जेव्हा या भूतलावर धर्म नाहीसा होऊन अधर्माचे प्रस्थ वाढू लागेल, तेव्हा तेव्हा मी जन्म घेऊ इच्छितो. पण, आपला हा जन्म कशासाठी? तर ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।’ हा जन्म एक दोन वेळा नव्हे,तर निरनिराळ्या युगांमध्ये! केवढी ही सत्यस्थापनेची आणि असत्याचा नायनाट करण्याची पवित्र आकांक्षा!

अगदी बालपणापासून जीवनाच्या अंतापर्यंत श्रीकृष्ण हे प्रगतीच्या पथावर अग्रेसर राहिले. राजा व प्रजा या दोन्हींना धर्ममार्गावर आणण्याकरिता त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. म्हणूनच ते सदोदित कर्तव्य बोध करीत राहिले. धर्म-कर्मावर त्यांची नितांत श्रद्धा होती. वेद-विद्येचा प्रकाश व ज्ञानाबरोबरच ते ज्ञान स्वतःच्या जीवनी उतरवण्यात श्रीकृष्ण हे खर्‍या अर्थाने यशस्वी ठरले. याच ज्ञानाच्या बळावर प्रजाजनांना सन्मार्गावर आणण्याकरिता ते अहर्निश प्रयत्नशील होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीला समजून निष्पक्ष भावनेने सर्वांना सत्य बाबी पटवून देण्यात श्रीकृष्णांनी कधीही कसर सोडली नाही.

योगेश्वरांच्या समग्र जीवनावर प्रकाश टाकला, तर त्यांचे पवित्र जीवन हे भारतीय इतिहासाच्या आकाश मंडळातील नक्षत्राप्रमाणे जाज्वल्य असे भासते. अत्यंत प्रतिकूल अवस्थेत कारागृहामध्ये जन्म झाला. मथुरेत गोपाळांच्या सहवासात बालपण घालविले. व्यायामाने शरीर अगदी धष्टपुष्ट बनविले. दुष्ट राजा कंसाचा अंत करून ते राज्य आपल्या आजोबांना प्रदान केले. पुढे गुरुकुलीय शिक्षण घेण्यासाठी उज्जैन येथे दाखल झाले. येथील महर्षी सांदिपनींच्या आश्रमात जाऊन ब्रह्मचर्यपूर्वक वेद-वेदांगाचे अध्ययन केले. तेथे ही कठोर ब्रह्मचर्य पालन, परिश्रम व सुयोग्य दिनचर्येतून अध्ययनासोबतच श्रद्धेने गोमातेची सेवा केली. यज्ञाकरिता समिधा वेचल्या. सुदामासारख्या धनहीश मित्राशी प्रेमाचे नाते जोडले. आपला अध्ययनकाळ संपल्यानंतरही पुढील आयुष्य वैदिक परंपरेला अनुसरून चक्रवर्ती साम्राज्य निर्माण करण्यासाठी वाहिले. त्यांच्याच बुद्धी सामर्थ्याने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर धनुर्धारी अर्जुनाला कौरवांशी लढण्याकरिता बळ मिळाले.

योगेश्वर कृष्ण यांचे समग्र जीवन वेदोक्त धर्माच्या पालनात नेहमीच अग्रभागी राहिले. आपल्या अप्रतिम बुद्धितेजाने, प्रखंड ज्ञानप्रतिभेने, प्रभावशाली व्यक्तिमत्वाने, प्रचंड धैर्यबल आणि योगमय जीवनाने त्यांनी इतरांना प्रभावित केल्याचे आपणास महाभारताच्या विविध प्रसंगातून दिसून येते. राजसूय यज्ञाच्या वेळी सर्वात अगोदर कोणाचा सन्मान करावा, असा प्रश्न धर्मराज युधिष्ठिराने पितामह भीष्मांकडे केला. तेव्हा, पितामहांनी सर्वांत अगोदर श्रीकृष्णांचेच नाव घेतले. त्यावेळी पितामह भीष्म म्हणतात-
वेदवेदाङ्गं विज्ञानं बलं चाप्यधिकं तथा।
नृणां लोके हि कोऽन्योस्ति विशिष्ट: केशवादृते॥
दानं दाक्ष्यं श्रुतं शौर्यं ह्रीकीर्तिर्बुद्धिरुत्तमा। सन्नति: श्रीर्धृतिस्तुष्टि: पुष्टिश्च नियताच्युते॥
अर्थात, श्रीकृष्ण हे वेदवेदांगाच्या ज्ञानात व शारीरिक बळात अतुलनीय आहेत. तसेच दान, कौशल्य, शिक्षण, शौर्य, शिष्टता, यश, बुद्धी, नम्रता, धैर्य, आत्मसंतुष्टी इत्यादी बाबतीत हजारो पटीने मोठे आहेत. अशा केशवांना सोडून अन्य कोणास प्रथम पुजनाकरिता निवडावे? यावरून आपणांस लक्षात येते की, राजसूय यज्ञप्रसंगी इतरही ऋषी, मुनी, आचार्य, शूरवीर राजे व आचारशील विद्वान लोक उपस्थित असतानाही कृष्णांचेच नाव अग्रणी ठरले.

इतकेच काय तर जेव्हा युद्धाविषयीचा संधी प्रस्ताव घेऊन श्रीकृष्ण दुर्योधनाकडे निघाले, तेव्हा धर्मराज युधिष्ठिराने जे काही म्हटले, त्याविषयी महर्षी वेदव्यास म्हणतात-

यो वै कामान्न भयान्न लोभान्नार्थकारणात्। अन्यायमनुवर्तेत स्थिरबुद्धिरलोलुप:॥
धर्मज्ञो धृतिमान् प्राज्ञ: सर्वभूतेषु केशव:।
सम्परिष्वज्य कौन्तेय: सन्देष्टुमुपचक्रमे॥(महाभारत उद्योगपर्व)
म्हणजेच श्रीकृष्ण हे कधीही अन्यायाच्या पक्षाचे अनुसरण करणार नाहीत. कारण, ते न्यायमार्गापासून विचलित करणार्‍या आकांक्षा, भय, लोभ, स्वार्थ इत्यादींपासून ते खूपच अलिप्त आहेत. त्याचबरोबर सध्याच्या काळात सर्व मनुष्यांमध्ये श्रीकृष्ण हेच खर्‍या अर्थाने सर्वात मोठे धर्मात्मा, धैर्यवान व विद्वान आहेत, अशा या याप्रसंगी श्रीकृष्णांचे आलिंगन देऊन धर्मात्मा युधिष्ठिराने त्यांस आपला संदेश देण्यास सुरुवात केली.

श्रीकृष्णांच्या जीवनात सच्चारित्र्याला अढळ स्थान व तितकेच महत्त्व होते. आयुष्यभर त्यांनी मर्यादांचे पालन करून आपल्या निष्कलंक व उदात्त जीवनाचा आदर्श सर्वांपर्यंत समोर ठेवला, जो की आजही तेजोमय दीपस्तंभाप्रमाणे आम्हां सर्वांना उत्तम प्रकारे जगण्यास प्रेरणा देतो आहे. दुर्दैवाने काही पुराणांमध्ये कृष्णांवर नाना प्रकारचे दोषारोपण करून त्यांच्या तेजस्वी व नक्षत्रासमान पवित्र जीवनाला दूषित करण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळते. विशेष करून भागवत ग्रंथांमध्ये श्रीकृष्णांवर दही, दूध व लोणी चोरणारा, गोपिकांशी असभ्यवर्तन करणारा, त्यांची वस्त्रे चोरणारा कृष्ण म्हणून उल्लेख आढळतो. हा एक प्रकारे त्यांच्या धवल जीवनाला कलंकित करण्याचा प्रयत्न बर्‍याच वर्षांपासून सुरू आहे. वास्तविक पाहता, कृष्णांनी असे कोणतेही अनिष्ट कार्य केलेले नाही. खर्‍या अर्थाने त्यांचे जीवन तर शुद्ध सरितेप्रमाणे पवित्र होते. त्यांचा रुक्मिणीशी विवाह झाला होता.

जवळपास १२ वर्षे घनघोर ब्रह्मचर्याचे पालन करून अपार तपश्चर्येनंतर रुक्मिणी व कृष्णांनी प्रद्युम्न नावाच्या सुपुत्राला जन्म दिला होता. जो की साक्षात्कृष्णासारखाच तेजस्वी होता. निरनिराळ्या कथाकल्पनांतून वर्णिल्या जाणार्‍या राधेशी तर त्यांचा काहीही संबंध नाही. कारण, ब्रह्मवैवर्त पुराणानुसार राधा ही त्यांची नात्याने मामी होती. आजही महाराष्ट्रामध्ये गवळणींचे रस्ते अडविणारा गोपाळ म्हणून कृष्णांचा उल्लेख केला जातो इतकेच काय? तर अशा आशयांच्या कविता, गाणी व लेखपण लिहिले जातात. तसेच भजन-कीर्तनाच्या माध्यमातूनही योगेश्वर कृष्णाच्या सर्वोत्तम चरित्रावर अशा चुकीच्या पद्धतीने चिखलफेक केली जाते. खर्‍या अर्थाने हा त्या महापुरुषांचा अवमान नव्हे काय? म्हणून योगेश्वर श्रीकृष्णांचे आदर्श असे सुप्रेरक व उदात्त जीवन चरित्र सर्वांसमोर आले पाहिजे. हेच त्या योगेश्वरांच्या पवित्र जीवनाचे पूजन आणि त्यांच्याप्रती सद्भावनांची अंजली ठरेल. अशा थोर महात्म्याविषयी १९व्या शतकातील सुप्रसिद्ध वेदज्ञ समाजसुधारक महर्षी दयानंद आपल्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात म्हणतात-

“पाहा! महाभारतामध्ये श्रीकृष्णचंद्रांचा इतिहास अतिशय उत्तम प्रतीचा आहे. त्यांचे गुण, कर्म, स्वभाव व चरित्र आप्त पुरुषांप्रमाणे आहे. त्यांच्या या आदर्श चरित्रात अधर्माचरण कुठेही सापडत नाही. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांनी कोणतेही वाईट कर्म किंवा अयोग्य आचरण केले, असे लिहिलेले दिसत नाही.”
 
अशा दिव्य युगपुरुषाचे पवित्र जीवन व त्यांनी केलेल्या सर्वोत्तम कार्याचे अनुकरण समग्र विश्वाच्या नवनिर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. भारताला पुन्हा एकदा गुरुस्थानी पोहोचवायचे असेल, तर योगेश्वरांच्या आदर्श कार्यांचे व त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेत प्रतिपादित केलेल्या तत्त्वज्ञानाचे अनुसरण करणे, यातच श्रीकृष्णजन्माष्टमीची सार्थकता सिद्ध होते आणि हीच खर्‍या अर्थाने काळाची गरज देखील!

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
९४२०३३०१७८