मुंबई: गणेश चतुर्थी हा आपल्या महाराष्ट्रीयांचा आवडता सण आहे. ज्या उत्साहात महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो, त्याच उत्साहात तो परदेशातही साजरा केला जातो. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पाच्या आगमनाची मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे. त्यानिमित्त मुंबईतील बाजारपेठ्या खुलल्या आहेत. मुंबईबाहेरील मोठ्या सार्वजनिक गणपतींच्या आगमन सोहळ्यानिमित्त गिरणगाव म्हणजे लालबाग-परळ-करीरोड भागात भाविकांची गर्दी वाढत आहे.
गणेशोत्सवानिमित्त घरगुती सजावट, बाप्पासाठी आकर्षक वस्त्रालंकार तसेच अन्य गोष्टींसाठी लालबाग मार्केट प्रसिद्ध आहे. परवडणार्या किमतीत विविध प्रकारच्या सजावटी तसेच अन्य गोष्टी सहज उपलब्ध होत असल्यामुळे लालबाग मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषकरून येथील जगप्रसिद्ध लालबागचा राजा या मानाच्या गणपतीसाठी काही दिवस आधीच गणेश भक्तांच्या आगमनाने परिसर भरून गेल्याचे चित्र आहे. देशाच्या विविध भागातून भाविक यावेळी दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. गौरी-गणपतीसह नवरात्रोत्सवातील देवीच्या मूर्ती सजवण्याचे दागिने या बाजारपेठेत उपलब्ध करून ठेवण्यात आले आहेत. दागिन्यांच्या किमतीही ग्राहकांना परवडणार्या आहेत.
एक फुटापासून दहा फुटापर्यंतच्या दागिन्यांची ऑर्डर देऊन त्यानुसार दागिने बनवूनही मिळतात. मोती, गोल्डन रंगाचे हिरे, खडे, झिकझॅक हिरे आदी प्रकारचे खडे दागिन्यांवरती पाहायला मिळतात. हुबेहूब मोगर्यासारखे दिसणारे हार असे उत्तम कलाकुसरीचा नमुना असलेले अनेक प्रकारचे हार येथील बाजारात उपलब्ध आहेत. अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवासाठी बाप्पाचे सिंहासनही वेगवेगळ्या आकारात, कलाकुसर करून येथील बाजारात बनवून मिळतात. ग्राहकांच्या परवडणार्या किमतीनुसार सामान असल्याने ग्राहक जास्त आकर्षित होतात. त्याचा आम्हाला बर्यापैकी फायदा होतो, असे येथील दुकानदारांचे म्हणणे आहे.