मोदी – बायडेन भेटीमध्ये व्हिसासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार

    05-Sep-2023
Total Views |
PM Modi to meet Biden

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गुरुवारी जी २० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येत आहेत. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर द्विपक्षीय बैठकीत चर्चा करणार आहेत.

बायडेन यांच्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देश छोट्या मॉड्यूलर अणुभट्ट्यांबाबत संभाव्य अणु करारावर स्वाक्षरी करू शकतात. याशिवाय ड्रोन डील आणि जेट इंजिनवरील संरक्षण करारासाठी अमेरिकन काँग्रेसच्या मंजुरीवरील प्रगतीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, दोन्ही देशांचे नेते युक्रेनला संयुक्त मानवतावादी मदत देण्यावरही चर्चा करतील.
 
यादरम्यान, भारत अमेरिकेतील भारतीयांसाठी अधिक सोपी व्हिसा व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल आणि एकमेकांच्या देशांमध्ये नवीन वाणिज्य दूतावास स्थापन करण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जो बायडेन यांच्या पहिल्या भारत भेटीसाठी प्रभावी संयुक्त निवेदन तयार करण्यासाठी भारतीय आणि अमेरिकन अधिकारी गेल्या काही आठवड्यांपासून सतत चर्चा करत आहेत.

दरम्यान, भारताने आतापर्यंत युक्रेनला सुमारे १०० टन मानवतावादी मदत पाठवली आहे, ज्यात आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे, ब्लँकेट, तंबू, अन्न यांचा समावेश आहे. अमेरिका आणि भारत आता युक्रेनला संयुक्त मदत देण्याची योजना आखत आहेत.