अ‍ॅड. नरसूबाई : चले निरंतर साधना

    05-Sep-2023   
Total Views |
Article On Adv. Narsubai Gadwalkar

हिंदू धर्माची पताका डौलाने फडकत राहावी, यासाठी खारीचा वाटा उचलणार्‍या आणि संघर्ष करणार्‍या सोलापूरच्या अ‍ॅड. नरसूबाई गदवालकर. त्यांच्या विचारसंघर्षाचा घेतलेला मागोवा...

शाळेत असताना हिची आई संडास साफ करते, म्हणत काही मुलंमुली नरसूबाईंना चिडवत. त्या रडत घरी येत. तेव्हा, लक्ष्मीबाई म्हणत, ”पुढे तुला हे काम करायचं नसेल, तर मग शिकशील तरच यातून सुटशील.” आजी आणि आई नरसूबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहित करायच्या. त्याच नरसूबाई २०१२ साली सोलापूरमध्ये भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. जातीविषमता विरोधात, लिंगभेद विरोधात आणि मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी अ‍ॅड. नरसूबाई नागनाथ गदवालकर कार्य करतात. बालसंरक्षण कायदा, घरगुती हिंसाचार तसेच संविधानामध्ये महिला, बाल आणि मागासवर्गीय समाजाला दिलेले अधिकार, याविषयी जनजागृती करतात. नरसूबाई प्रामुख्याने ओळखल्या जातात, त्या निडरपणे धर्मांतराविरोधात आवाज उठवण्यासाठी.

गदवालकर कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशातले. कामधंद्यानिमित्त हे कुटुंब सोलापूरमध्ये स्थायिक झाले. सफाई कर्मचारी असलेल्या वडिलांच्या जागेवर नागनाथ कामाला लागले, तर त्यांची पत्नी लक्ष्मीबाई या परिसरातील सार्वजनिक शौचालय साफ करण्याचे काम करत. त्यांना चार अपत्ये. त्यापैकी एक नरसूबाई. गदवालकर कुटुंबाचे वातावरण धार्मिक. कुटुंब देवधर्म जीवापाड जपायचे. मिशनरींच्या धर्मांतराच्या जाळ्यात फसून अनेक भोळेभाबडे समाजबांधव धर्मांतरित झाले. पण, गदवालकर कुटुंब धर्मांतराच्या विरोधातच ठामपणे उभे राहिले. आपले देवधर्म सोडून नरकात जायचे का, असा त्यांचा प्रश्न. आपल्या देवाधर्माचे रक्षण प्राणपणाने करायचे, हा धडा नरसूबाईंना लहानपणीच मिळाला. असो. दहावीला नरसूबाई गणितामध्ये अनुत्तीर्ण झाल्या. मुलगी नापास झाली, तसेच १५ वर्षे म्हणजे थोराड वय झाले म्हणून नरसूबाईंचे लग्न करायला हवे, असे घरातल्यांनी ठरवले.

मात्र, नरसूबाईंना शिकायचे होते. कारण, ‘पुढे जाऊन आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलायचीअसेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही,’ हे आईचे वाक्य त्यांच्या मनावर कोरले होते. पण, वडील आणि काकांच्यासमोर बोलणार कसे? नरसूबाईंनी आजी आणि आईकडे हट्ट केला. पुन्हा परीक्षा देईन. पास होईन, शिकेन, काहीतरी बनेन, असा विश्वास दर्शवला. शेवटी घरातल्यांनी परवानगी दिली आणि नरसूबाईंचे लग्न टळले. त्यांनी पुन्हा सर्व विषय घेऊन दहावीची परीक्षा दिली. त्या उत्तीर्ण झाल्या. आपण निर्णय घेतला आणि यशस्वी झालो, यामुळे नरसूबाईंचा विश्वास दुणावला. त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याचवेळी सामाजिक कार्यही सुरू केले. समाजाच्या मुलांसाठी वस्तीमध्ये विनाशुल्क खासगी शिकवणी सुरू केली. घरगुती हिंसा किंवा इतर अन्याय-अत्याचाराविरोधात मुलीमहिलांना सहकार्य करणे सुरू केले. समाजकार्य करत करत त्या पदवीधर झाल्या.

त्याचवेळी परिसरात निवडणुका लागल्या. मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षण लागले. त्यात सुशिक्षित सामाजिक कार्यकर्ता म्हणून नरसूबाईंना तिकीट मिळाले. मात्र, घरातल्यांनी विरोध केला. मुलगी राजकारणात गेली. तिच्याशी लग्न कोण करेल, असा त्यांना प्रश्न पडला. पण, नरसूबाईंनी विचार केला की, नगरसेविका झाले, तर समाजासाठी काही ठोस काम करू शकेन. आरक्षणामुळे का होईना, पण त्या नगरसेविका झाल्या. त्याचवेळी काही लोकांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली. दगड फेकणार्‍यांचे म्हणणे होते, ”मूळच्या आंध्र प्रदेशांच्या मादिगा समाजाची नरसूबाई इथल्या प्रस्थापित मागासवर्गीयांना हरवून निवडून कशी आली?” आपल्याच समाजाशी बांधिलकी सांगणारे समाजबांधवही जातीभेद करतात, हे पाहून नरसूबाई यांनी ठरवले की, समाज म्हणून सर्व एकत्र आले, तरच समाजाचे भले होणार. याच काळात त्यांचा परिचय ‘धर्म जागरण मंचा’च्या चंद्रकात गडेकर आणि हेमंत हरहरे यांच्याशी झाला. समाजाच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी त्यांना आणखीन बळ मिळाले.

नगरसेविका झाल्यानंतर नरसूबाई यांचा विवाह मुलग अडाकूल यांच्याशी झाला. नरसूबाईंचे दीर आणि जाऊबाई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला. श्रद्धा आणि रूढी रितीरिवाज यावरून नरसूबाई आणि त्यांच्या जाऊबाईंमध्ये मतभिन्नता होतीच. वाद विकोपाला जाऊ नये म्हणून मग नरसूबाई आणि मुलग दोघे वेगळे राहू लागले. अशातच एक दिवशी मोठे दीर नरसूबाईंकडे आले आणि म्हणू लागले, ”मला मदत करा. माझी पत्नी म्हणते की, तिच्या स्वप्नात येशू देव आले आणि ते म्हणतात, आपले घर पास्टरला दे. ती ऐकायला तयार नाही.” नरसूबाई आणि त्यांचे पती, तसेच समाजाचे काही लोक दिराच्या घरी गेले. दोन्ही बाजूंनी चर्चा झाल्या. काही दिवसांनी नरसूबाईंना कळले की, त्यांच्या दिरावर, पतीवर आणि त्यांच्यावरही जाऊबाईने ‘४९८ कलमा’द्वारे पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला होता. धर्मांतरण आणि त्यातून होणारे शोषण, फसवूणक याविरोधात आवाज उठवला म्हणून नरसूबाई यांना त्यांच्या धर्मांतरणविरोधी कार्यापासून दूर करण्याचा प्रयत्न होता तो.

 मात्र, नरसूबाई हिंमत हारल्या नाहीत. त्यानंतरही धर्मांतरणाविरोधातले जनजागरण त्या जोमाने करीत आहेत. सोलापूरमधील मागासवर्गीय समाजाला एकत्रित करत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या अहोरात्र कार्य करतात. नरसूबाई म्हणतात की, “समाजातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे. तसेच, धर्मांतरण कमी व्हावे म्हणून मी आयुष्यभर काम करेन. ही माझी समाजसाधना आहे.” चले निरंतर साधना...

९५९४९६९६३८


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.