रात्र थोडी सोंगे फार

    04-Sep-2023   
Total Views |
Article On INDIA Alliance Meeting Held In Mumbai

नुकतीच मुंबईत ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक पार पडली. ज्यात सहभागी नेत्यांनी एकमेकांचे गोडवे गाण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मात्र, तीन बैठका घेऊनही उद्धव ठाकरेंच्याच भाषेत सांगायचे झाल्यास, या आघाडीला ना आकार आला, ना उकार, ना आघाडीचा विचार समोर आला. अरविंद केजरीवाल यांनी तर, कोणत्याही पदासाठी नाही तर १४० कोटींच्या भारत देशाला वाचविण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी एकत्र आल्याचे म्हटले. देशाची चिंता सतावणार्‍या केजरीवालांना अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या पंजाबला वाचविण्यासाठी काहीही करायचे नाही. बाकीच्या नेत्यांची भाषणे बाकी असताना केजरीवाल अर्ध्यावर निघून गेले. नितीशबाबूंना तर मुदतपूर्व निवडणुका होण्याची भीती वाटतेय. आता समन्वयासाठी एक समिती नेमली; मात्र ती काय करेल, याचा अतापता नाही. एम. के. स्टॅलिन यांनी तर वेळ झाली म्हणून घड्याळ दाखवत अर्ध्यावर भाषण थांबवून पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. सीताराम येचुरींचे भाषण सुरू असताना लालू आणि त्यांचे तेजस्वी पुत्रही निघून गेले. राहुल गांधींच्या मधुर भाषणापर्यंत निम्मे व्यासपीठ तर रिकामेच झाले. ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ अशी घोषणा तर दिली. परंतु, एकमेकांची रटाळ भाषणं ऐकायलादेखील यांच्याच सहकार्‍यांना वेळ नाही. संयोजकपदाची निवड केली जाणार होती. आघाडीच्या बोधचिन्हाचेदेखील अनावरण केले जाणार होते. मात्र, यातील एकही गोष्ट झाली नाही. बाळासाहेब कधीही कोणत्या नेत्याला भेटायला त्याच्या घरी वा कार्यालयात गेले नाही. अगदी इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांसारखे बडे नेतेदेखील ‘मातोश्री’वर बाळासाहेबांना भेटण्यासाठी आले होते. उद्धव ठाकरे यांनी हा शिरस्ता कधीच मोडीत काढला. ठाकरेंनी आघाडीच्या नेत्यांचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत केले आणि वाकून नमस्कार केला. आपला कणा नेहमी ताठ ठेवा, असे सांगणार्‍या बाळासाहेबांच्या पुत्राने मात्र त्यांच्याच शब्द मोडीत काढला. ‘इंडिया’ आघाडी भाजपप्रणित ‘एनडीए’ला सहजरित्या हरवेल, असा गौप्यस्फोटही राहुलबाबांनी केला. त्यावर विश्वास किती ठेवायचा, हे येणार काळच ठरवेल. त्यात जागावाटपाचा मुद्दा अजून दूरच! असा सगळा गोंधळ, असमन्वय आणि अहंकारी भाव असणार्‍या नेत्यांची अवस्था म्हणूनच रात्र थोडी सोंगे फार अशीच म्हणावी लागेल.

चोरांच्या उलट्या बोंबा

मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत विरोधकांना मीडियाचा कळवळा आला होता की, मीडियाला त्यांना सूनवायचे होते, हेच समजले नाही. ही देश चालवण्याची पद्धत नाही. हळूहळू आपण हुकूमशाहीकडे चाललो आहोत. ‘मीडिया भाजपच्या बाजूने आहे, मला असे कधी-कधी दिसते, तुमच्या तोंडाला टाळे लावले आणि तुमचे हात बांधले गेले आहेत,’ असा साक्षात्कार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना झाला. नितीशबाबूंनीही मीडियावर तोंडसुख घेण्याची संधी दवडली नाही. “मीडियावर कब्जा केला गेलाय. विरोधकांच्या बातम्या कमी छापल्या जातात. आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्व मीडिया स्वतंत्र होईल. तेव्हा तुम्ही जे योग्य वाटेल. ते छापा. जे काम करीत नाही, त्यांचे कौतुक होत आहे,” असे नितीश यांनी हसतहसत म्हटले. राहुल गांधींनीही इंग्रजीत याविषयी भाष्य केलं. हे सगळं रडगाणं गात असताना ‘इंडिया’ आघाडीची पत्रकार परिषद सर्व मराठी आणि हिंदी वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह दाखविण्यात येत होती. जर मीडिया सरकारच्या बाजूने असता, तर ‘इंडिया’ आघाडीची पत्रकार परिषद दाखवली गेली नसती. परंतु, केवळ गावगप्पा मारायच्या आणि मूळ मुद्दा सोडून मीडियावर टीका करायची, असा प्रकार या बैठकीत पाहायला मिळाला. नितीशबाबूंचे बिहारमध्ये लंगडं सरकार आहे. मग तिथे मीडियावर अन्यायासाठी नितीश सरकारला जबाबदार धरायचे का? राजस्थान, छत्तीसगढ, बिहार या राज्यांतील होणारा अन्याय दाखवू नये, असे या नेत्यांना म्हणायचे आहे का? बाजूलाच उद्धव ठाकरे बसलेच होते. त्यांच्या पक्षाच्या मुखपत्रातून अर्थात ‘सामना’तून कशाप्रकारे राजकीय टीकाटिप्पणी केली गेली, हे खर्गे, नितीश यांनी मराठी येत नसल्यामुळे बहुदा वाचले नसावे. मागील महिन्यातच बिहारमध्ये एका पत्रकाराची हत्या करण्यात आली. ही गोष्ट नितीश यांना कशी बरी लक्षात राहिली नाही. मीडियाच्या स्वातंत्र्यावर आणीबाणीच्या काळात खर्‍या अर्थाने हल्ला झाला होता. आणीबाणीत माध्यमांवर केली गेलेली दडपशाही आणि अन्याय बोलून दाखविण्याचे धारिष्ट्य याठिकाणी एकही नेता करू शकला नाही. बोलणार तरी कसे म्हणा, आणीबाणीच्या जनक इंदिरा गांधी यांच्या सूनबाई आणि नातू व्यासपीठावर जे उपस्थित होते. अशा या चोरांच्या उलट्या बोंबा!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.