डेहराडून : उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यातील श्रीनगरमध्ये बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. एका विशिष्ट समुदायातील तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याचा आरोप आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर संतप्त लोकांनी आरोपीला बेदम मारहाण केली. यानंतर त्याच्या तोंडाला काळे फासण्यात आले आणि मुंडण करून बाजारात त्याची परेड काढण्यात आली.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण टिहरी गढवाल जिल्ह्यातील कीर्तीनगर तहसीलमधील एका गावातील आहे. एका विशिष्ट समुदायातील तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून निर्जनस्थळी नेल्याचा आरोप आहे. यानंतर तिच्यावर बलात्कार झाला. यामुळे मुलगी गरोदर राहिली.
मुलीचे पोट वाढू लागल्यावर तिच्या आईने त्याचे कारण विचारले. यावर तिने आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले, मात्र आईने तिला फटकारले असता पीडित मुलीने घडलेली संपुर्ण हकीकत सांगितली. लोकांना ही बाब समजताच त्यांनी आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर त्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली.
संतप्त लोक इथेच थांबले नाहीत. आरोपीचे मुंडण करून चेहरा काळा करण्यात आला. यानंतर त्याला बराच वेळ बाजारपेठेत परेड करायला लावली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला अटक केली. याप्रकरणी कीर्तीनगरच्या एसडीएम सोनिया पंत सांगतात की, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
एसडीएमने असेही सांगितले की, पीडितेला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ती गर्भवती आहे. तथापि, गर्भधारणेच्या महिन्यांच्या संख्येची अद्याप पुष्टी झालेली नाही. आरोपी मूळचा बिहारचा आहे. तो परिसरात राहून लोकांची घरे बांधण्याचे काम करत असे.
पीडितेच्या मामाच्या तक्रारीच्या आधारे, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 376 आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एका अहवालानुसार, टिहरीचे एसएसपी नवनीत सिंग यांनी सांगितले की, आरोपी एका विशिष्ट समुदायाचा आहे.