मुंबई : भारताने घेतलेल्या खलिस्तान विरोधी भूमिकेमुळे दहशतवादी चांगलेच संतापले आहेत. यातूनच त्यांनी भारतीयांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. अशीच एक घटना ब्रिटनमधील स्कॉटलंड येथे घडली आहे. स्कॉटलंड येथे शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी एका भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी मनाई करण्यात आली.
ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी हे अल्बर्ट ड्राइव्हवर असलेल्या ग्लासगो गुरुद्वाराजवळ आले होते. यावेळी एका कट्टरपंथी ब्रिटीश शीख कार्यकर्त्यांच्या गटाने त्यांना घेरले आणि गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास मनाई केली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात भारतीय उच्चायुक्त दोराईस्वामी यांना खलिस्तान समर्थकांनी गुरुद्वाराबाहेर घेरलेले दिसत आहे. तसेच त्यांना गुरुद्वारात जाण्यापासून रोखले जात आहे. त्यानंतर तिथे एक कार आली आणि दोराईस्वामी त्यात बसून निघून गेले.
या घटनेची माहिती देताना एका खलिस्तान समर्थक शीखाने सांगितले की, दोराईस्वामी यांनी अल्बर्ट ड्राइव्हवरील ग्लासगो गुरुद्वाराच्या समितीसोबत बैठकीची योजना आखली असल्याचे त्यांच्यापैकी काहींना कळले. त्यानंतर खलिस्तानी शिखांचा एक गट तेथे गेला आणि दोराईस्वामी यांना गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास मनाई केली. ब्रिटनमधील कोणत्याही गुरुद्वारामध्ये भारतीय अधिकाऱ्यांचे स्वागत केले जाणार नाही, असेही तो म्हणाला.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा आरोप केला आहे. त्यामुळे भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, आता या घटनेमुळे भारत आणि कॅनडामधील हा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.