नवी दिल्ली : चीनमधील हांगझाऊ येथे सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताने ऐतिहासिक कामगिरी करत टेनिस मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. टेनिस मिश्र दुहेरीकत भारताच्या रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले यांनी पहिल्या मानांकित चायनीज तैपेईच्या लियांग एन शुओ आणि त्सुंग हाओ हुआंग यांचा २-६, ६-३, १०-४ (सुपर टायब्रेक) अशा फरकाने ऐतिहासिक कामगिरी करत टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले आहे.
दरम्यान, या भारतीय जोडीने अंतिम सामन्यातील पहिला सेट गमावला होता. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले यांनी शानदार पुनरागमन करत अखेर सुपर टाय ब्रेकमध्ये सामना जिंकला. टेनिस मिश्र दुहेरी प्रकाराच्या अंतिम फेरीत रोहन-ऋतुजाने पहिल्या मानांकित चायनीज तैपेईच्या लियांग एन शुओ आणि त्सुंग हाओ हुआंग यांचा पराभव केला असून यंदाच्या आशियाई क्रीडास्पर्धेतील भारताचे हे ९वे सुवर्णपदक ठरले.