गणपती आणि बाबासाहेबांच्या विचारांचा समाज...

    30-Sep-2023   
Total Views |
Article On Dr Babasaheb Ambedkar Thoughts

गणेशोत्सवामध्ये घरी गणपती आणला म्हणून बौद्ध समाजाच्या भगिनीला काही लोकांनी जाब विचारल्याची घटना नुकतीच घडली. त्या महिलेने म्हटले की, “आपण पूर्वी देवाला मानायचो. मी देवही मानते आणि बुद्धही मानते. बाबासाहेबांनाही मानते.” यावर ते लोक म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध चवीला मानू नका.” समतावादी सहिष्णू समाजाचे स्वप्न बघणारे आणि धार्मिक उन्माद, कट्टरतेला विरोध करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. नेरूळमधल्या या घटनेविषयी समाजमन काय म्हणते, वास्तव काय आहे? याबद्दल मागोवा घेणारा हा लेख...

तिने घरात गणेशोत्सव साजरा केला म्हणून तिला जाब विचारायला, काही लोक झुंडीने तिच्या घरी धडकले. तिने अक्षम्य अपराध केला, या थाटात तिची चौकशी सुरू केली. यावर ती म्हणाली की,”तिच्याा मुलीच्या इच्छेखातर तिने घरी गणेशोत्सव साजरा केला. आमच्या गावी आम्ही सगळं करतो, देवधर्म पाळतो. मी महार आहे. पूर्वी आपण सगळे देवधर्म करायचो. मी दहा दिवस गणपती घरात ठेवणार.” यावर त्या झुंडीतल्या लोकांनी बहिष्कार घालण्याची धमकी दिली. ’मुलीचे लग्न कोणत्या पद्धतीने करणार?’ अशी सूचक विचारणा केली. यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होतो की, खरंच घरी गणपती बसवणे, हा गुन्हा आहे का? पण, हे काही नवीन नाही. भाऊ कदमसारख्या प्रसिद्ध व्यक्तीसोबतही हेच घडले होते.

अंबरनाथ येथेही जगताप नावाच्या कुटुंबासोबत असेच घडले होते. या घटनेवरून रमेश हरळकर या सामाजिक कार्यकर्त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी उभे आयुष्य सफाई कामगार आणि समाजाच्या समस्यांसाठी खर्ची घातले. पाश्चात्य देशांनीही रमेश यांना सामाजिक कार्यासाठी सन्मानित केले. मात्र, याच रमेश यांनी हिंदुत्ववादी संस्थेकडून सन्मान स्वीकारला, म्हणून अशाच झुंडीने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. त्यामुळे आयुष्यभर नातीगोती समाजात वावरणारी, त्यांची पत्नी खचून गेली. मुंबई सोडून ती गावी राजापूरला गेली. बहिष्काराचे लोण तिथेही पोहोचले. हे सगळे असहय्य होऊन शेवटी तिला हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराचा झटका आला असताना, तिला शेजारापाजार्‍यांनी पाहिले होते. ती कोसळली, तडफडली. पण, ते मदतीला आले नाहीत. का? तर झुंडीने हरळकर कुटुंबावर बहिष्कार टाका, असा आदेश दिला होता. शेवटी तडफडून ती मेली. हरळकरांच्या पत्नीचा एक प्रकारे खूनच झाला म्हणायचा. परमेश्वरा! हे कोण लोक आहेत?

असो. या झुंडशाहीचे म्हणणे असते की, ”बौद्ध धर्मीय व्यक्तीने बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा पाळायला हव्यात. त्यामुळे बौद्ध व्यक्तीने हिंदूंचे देव पूजणे चुकीचे आहे.” पण, तसे जर असेल, तर सगळा समाज २२ प्रतिज्ञांचे तंतोतंत पालन करतो का? वस्तीपातळीवर काय दृश्य आहे? समाजातील अनेक मुलींचे पती व्यसनाधीन होऊन मृत पावतात आणि या मुली वयाच्या ३५ ते ४०व्या वर्षी विधवा होतात. ती मुलांसाठी कष्टाचा डोंगर उपसते. पण, अनेकदा तिचा मुलगाही वयाच्या १५-१६व्या वर्षी व्यसनाच्या जाळ्यात अडकतो.जबाबदारी पडली की, तो सुधरेल म्हणून ती त्या व्यसनाधीन मुलाचे लग्न लावून देते. पुढे काय होते? व्यसनाने दुर्धर आजारांना बळी पडून ४०व्या वर्षापर्यंत या मुलाचाही मृत्यू होतो. त्यालाही एक-दोन लेकरं असतात. लेकरांसाठी मग सासू-सुना दोघी पुन्हा कष्टाचे डोंगर उपसत यंत्र बनतात. पिढ्यान्पिढ्या हेच चित्र! लिहितानाही डोळ्यात अश्रू आहेत.

कारण, अशा आयाबाया दररोज पाहते. अट्टल व्यसनी पुरुषाला ही झुंड एकदा तरी जाब विचारते का, व्यसन करून आणि घरातल्या अश्राप पत्नीला छळून तू धम्माविरोधात जगत आहेस! धम्माने शारीरिक आणि शाब्दिक हिंसा, द्वेष-मत्सराचा त्याग करायला सांगितला. मात्र, अनेकदा समाजातील तरूणांना हिंसेसाठी चिथावले जाते. त्यांच्या मनात इतरांबद्दल द्वेष बिंबवला जातो. त्यामुळे काही युवक हिंसा करतात. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात. या युवकांना बळीचा बकरा बनवणारे सुखात राहतात आणि या युवकांवर गुन्हेगारीचा शिक्का बसतो. मग या युवकांना आणि त्यांना चिथावणार्‍यांना हे झुंडीचे लोक सांगतात की, तुम्ही हिंसा द्वेष करून धम्माचा अपमान केलात, आता तुमच्यावर बहिष्कार टाकतो. नाही. हे झुंडीचे लोक, अशावेळी त्यांना तथागतांचा धम्म सांगत नाहीत.

पूर्वी हिंदू धर्मात कर्मकांडाचे स्तोम माजले होते. प्रत्यक्ष बाबासाहेबांना काळाराम मंदिरात त्यावेळीच्या पूजार्‍यांनी प्रवेश नाकारला होता. पण, काळ बदलला. काही वर्षांपूर्वीच काळाराम मंदिराच्या त्याच पूजार्‍यांच्या वंशजाने सामाजिक समरसतेच्या माध्यमातून काळाराम मंदिरात आलेल्या अनुसूचित जाती बांधवाची माफी मागितली. पूर्वजांनी चूक केली, हे मान्य केले. पूर्वी मागासवर्गीय समाजबांधवांना देवळात जाण्यासही बंदी होती. हा अमानुष गुन्हाच होता. पण, आज परिस्थितीत बदल झाला. कित्येक मागासवर्गीय समाजबांधव घरातच देव आणत आहेत. हा खरे तर डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाचा विचारांचा विजय आहे. मुळात देव, श्रद्धा की अंधश्रद्धा हा विषयच नाही. विषय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये समता, बंधुता, सर्वधर्मसमभाव आणि मुख्यत: व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असताना तुम्ही अमूकच करा, तमूकच करा, असे दुसर्‍यांवर सक्तीने थोपवणारे हे लोक कोण? उघड-उघड बहिष्कार घालण्याची धमकी देणार्‍या, या लोकांना बाबासाहेबांनी सांगितलेल्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची जाण तरी आहे का? स्वतंत्र भारतात कुणी कुणावर कोणत्याही कारणाने बहिष्कार घालू शकत नाही.

नेरूळमध्ये घरी गणपती बसवणार्‍या, त्या ताईंना जाब विचारणारे ते लोक पाहून दारूल-उल- देवबंद आणि खाप पंचायतची आठवण झाली. त्यांच्यासारखेच कट्टरतावादी बनत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांच्या मानवतावादी विचारांशी फारकत घेत जर कुणी कुणावर आदेश निर्बंध वगैरे लादत असतील, तर संविधानानुसार, अशा लोकांना सजा व्हायला हवी. असल्या लोकांसाठी म्हणावेसे वाटते, बाबा, तुम्ही म्हणालात मनुष्य धर्मासाठी नाही, तर धर्म मनुष्यासाठी आहे. पण, तुमच्या नावावर आपल्याच बांधवांवर हुकूमत गाजवणारे लोक आता हुकूमशाही बहिष्काराची हत्यारं पाजळत, कत्तल करत आहेत तुमच्या विचारांची! बाबा, तू त्यांना कळला नसशीलच आणि नाहीच!


मंगलमैत्री आणि करुणेनेच जग जिंकू शकता!

आमच्या एका बौद्ध भगिनीने घरात गणपती बसवलाच, तर ते तिचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. पण, यामुळे जर आमच्या समाजबांधवांना ते आवडले नसेल, तर आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. खरंच आपण तरी बौद्ध धम्माचे पालन करीत २२ प्रतिज्ञानुसार जगतो का? भावांनो, तथागतांनी सांगितलेली मंगलमैत्री आणि करुणेनेच आपण जग जिंकू शकता.
-नितीन मोरे, अध्यक्ष, जयभिम आर्मी


मगच बाबासाहेबांचे नाव लावण्यास आपण लायक!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभाव जपणारे संविधान दिले. माणूस धर्मासाठी नाही, तर धर्म माणसासाठी आहे, असे ते म्हणत. या पार्श्वभूमीवर घरी गणपती बसवला म्हणून आपल्याच समाजभगिनीला जाब विचारणार्‍यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना अपमानित केले आहे. मला वाटते की, आपसातले हे सर्व वाद टाळून आपण मनापासून एकत्र असलेल्या समाजाची रचना केली पाहिजे, तरच बाबासाहेबांचे नाव लावण्यास आपण लायक आहोत.
- शेखर लाड, खजिनदार, महाराष्ट्र राज्य हिंदू खाटिक मागासवर्गीय साामजिक संस्था


गणपती बसवला म्हणून जाब विचारणारेच अपराधी!

समता, स्वातंत्र्य आणि बंधुता, दया, करुणा हा आमच्या बौद्ध धम्माचा पाया आहे. महिलेला जाब विचारायला गेलेले लोक यांपैकी कोणती संकल्पना तिथे मांडत होते? त्या महिलेने घरी गणपती बसवला म्हणून तिला जाब विचारायला गेलेले लोकच अपराधी आहेत. कारण, तेच बाबासाहेबांचा खरा विज्ञानवादी धर्म समाजात पोहोचवण्यास असमर्थ ठरले.
- रमेश हरळकर, सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत


...हे तर डॉ. बाबासाहेबांच्या विचारांविरोधात काम

प्रत्येकाला स्वतःचे अधिकार आहेत. कुणीही कुणावरही स्वतःचे मत लादू नये. भूतकाळामध्ये आम्हा सर्व मागासवर्गीयांवर पिढ्यान्पिढ्या अन्याय झाला. मात्र, बाबासाहेबांनी अभूतपूर्व संघर्ष, समन्वय केला. आता समाज बदलला. त्यामुळे शिकलेल्या समाजाने धर्माचे अवडंबर माजवू नये.घरात गणपती आणणार्‍या महिलेची गणेशपूजनाची इच्छा होती, तर तिच्या इच्छेचा अपमान करण्याचा अधिकार कुणाला नाही. तसे करणारे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांविरोधात काम करतात.
- धनंजय वायंगणकर, रोहिदास समाज कार्यकता, वसुधा चॅरिटेबल ट्रस्ट, संस्थापक


...तरच डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातला समाज उभा राहू शकेल!

घरी गणपती आणले म्हणून काही लोक, त्या कुटुंबावर बहिष्कर टाकण्याची धमकी देतानाच व्हिडिओ पाहिला. ही घटना निंदनीय आहे आणि या घटनेचा मी निषेध करतो. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला उपासना करण्याचे आणि सन्मानाने जगण्याचे स्वातंत्र्य दिले, त्याचा मी आदर करतो. संघटित होऊन बहिष्कार टाकणे, हा गुन्हा आहे. अशा प्रकारे धमकी देणार्‍यांविरोधात कारवाई व्हायला हवी. अशा प्रवृत्तींना आळा बसणे गरजेचे आहे, तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला समाज उभा राहू शकेल.
- राजेंद्र होनमाने, सामाजिक कार्यकर्ता


आवडीनुसार धर्म, श्रद्धा बाळगण्याचे सगळ्यांना स्वातंत्र्य

ती ताई गणपतीला मानत नसेल आणि लेकीने सांगितला म्हणून घरात देव बसवत असेल, तर हे चुकीचेच आहे. मला वाटते की, आपण जो कोणता धर्म मानतो, त्याच्याशी एकनिष्ठ असायला हवे; तसेच आपल्या आवडीनुसार धर्म, श्रद्धा बाळगण्याचे स्वातंत्र्य सगळ्या भारतीयांना आहे. संविधानाने दिलेल्या या हक्काचा भंग कुणीही करू नये.
स्मिता कवडे, अध्यक्ष सिद्धी महिला कल्याणकारी संस्था


जाब विचारणार्‍यांना संविधानाने दिलेला हक्क सांगण्यास ती कमी पडली!

मी बौद्ध धर्मीय असून, बाबासाहेबांनी दिलेलाा धम्म मनापासून जगते. त्यामुळेच घरात गणपती बसवणार्‍या महिलेच्या श्रद्धा, स्वातंत्र्यालाही मानते. ती म्हणाली की, मैत्रिणींच्या संगतीमुळे मुलीने घरी गणपती आणावा, असा हट्ट केला म्हणून घरी गणपती आणला. पण, याचा अर्थ असा होतो की, उद्या जर मैत्रिणी मुस्लीम किंवा ख्रिश्चन असतील तर? तिला जाब विचारणार्‍या लोकांना संविधानाने दिलेला हक्क सांगण्यास ती कमी पडली.
भिमकन्या, शुभांगी जाधव, अध्यक्ष, क्रांती संघर्ष महिला मंडळ


...हे तर बाबासाहेब आणि अण्णाभाऊंच्या मूल्यांच्या विरोधात!

ज्या समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांसाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजन्म संघर्ष केला, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी याच मूल्यांसाठी आपल्या लेखणीमधून सातत्याने आवाज उठवला, ती मूल्ये भारतीय नागरिकांच्या जीवनात संरक्षित करणे गरजेचे आहे. त्या महिलेने घरी गणपती बसवला म्हणून त्यांना विरोध करणे हे या मूल्यांच्या विरोधात आहे. अशा प्रकारच्या प्रवृत्तींमुळेच संविधानाने प्रदान केलेल्या हक्कांवर गदा येत आहे.
ज्योती साठे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य अभ्यासक, अध्यक्ष, दिशा ज्योत फाऊंडेशन

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.