मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे घडलेल्या दगडफेक आणि लाठीचार्ज प्रकरणात राज्य सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदरील प्रकाराची चौकशी होणार असल्याची घोषणा रविवारी केली आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.
लाठीचार्जच्या संपूर्ण प्रकरणाची अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करण्यात येणार असून चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही, आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
राजकीय पोळी कुणी भाजून घेतली ते लवकरच कळेल
मराठा समाजाच्या ज्यांनी कायम गळा घोटला तेच आज त्यांच्यासमोर गळा काढत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. काल जे जालन्यात जमले होते त्यापैकी अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी नक्की काय केले..? मराठा समाजाने काढलेल्या शांततापूर्ण मूक मोर्चांची 'मुका मोर्चा' अशी हेटाळणी कुणी केली..? जालना येथील आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सूरु असताना नक्की दगडफेक कुणी केली याचीही माहिती आता येत असून, मराठा आंदोलनाच्या अडून कुणी आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे तेही लवकरच कळेल असे यावेळी बोलताना सांगितले.
मराठा समाज हा अत्यंत संवेदनशील पण तितकाच संयमी समाज आहे. यापूर्वी लाखालाखांचे मोर्चे काढताना या समाजाने कधीही आपला संयम ढळू दिला नव्हता, त्यामुळे यापुढे देखील त्यांनी संयम बाळगावा असे आवाहन शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.
पोलीस अधिक्षकांवर गृह विभागाची कारवाई
दरम्यान, जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय गृहविभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. अपर पोलीस अधिक्षक आणि उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना देखील सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी
दरम्यान, शनिवारी आंदोलकांची भेट घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेले राष्ट्रवादीच्या पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आंदोलनकर्त्या मराठा समाजाच्या युवकांनी तीव्र घोषणाबाजी केली. ''ओ पवार साहेब, आमच्यासाठी 40 वर्षात काय केलं ? पवार साहेब मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही ? परत जा परत जा शरद पवार परत जा,'' या शब्दांत मराठा समाजाच्या युवकांनी शरद पवारांना जाब विचारला आहे.
देवेंद्र फडणवीसांची जरांगेंशी फोनवरुन चर्चा
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर चर्चेला निमंत्रण दिल्याचे फडणवीसांनी जरांगे यांना म्हटले आहे. "सदरील प्रकरणात जे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पोलिसांनी लाठीचार्ज टाळायला हवा होता. सरकार कधीच अशा कारवाईचे समर्थन करीत नाही आणि करणार सुद्धा नाही. जे गुन्हे चुकीच्या पद्धतीने दाखल केले असतील, ते परत घेतले जातील." असे आश्वासनही फडणवीसांनी यावेळी दिले आहे. तसेच अशा प्रकारचे प्रश्न चर्चेनेच प्रश्न सुटत असतात, त्यामुळे तुम्ही चर्चा करायला या. मुख्यमंत्र्यांनी स्वतः निमंत्रण दिले आहे. चर्चेतून मार्ग काढू," असे आवाहनही फडणवीसांनी केले आहे.