ठाणे : गोकुळ नगर मध्ये यंदा गोकुळ दहीहंडीचा थरार ठाणेकरांना पाहायला मिळणार असुन या गोकुळ दहीहंडीत एकूण ५१ लाखांच्या बक्षीसांसाठी थर लागणार आहेत. भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आयोजित केलेल्या या प्रतिष्ठेच्या दहीहंडीत विविध गोविंदा पथके सहभागी होणार आहेत.
ठाण्यातील गोकुळ नगर परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव होणार आहे. भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या गोकुळ हंडीत एकूण ५१ लाखांची बक्षीसे असुन या दहीहंडीत ठाण्यातील स्थानिक गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र पारितोषिक आहेत.तर, मुंबईसह मुख्य खुल्या गटातील गोविंदा पथक यांच्यासाठी स्वतंत्र बक्षिसे असणार आहेत.सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकास बक्षिसे देण्यात येणार आहेत.
याशिवाय महिलांसाठीही बक्षीसे दिली जाणार आहेत. गोविंदांच्या सुरक्षेसाठी आयोजकांमार्फत विशेष काळजी घेण्यात आली असून वैद्यकीय उपचार देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या दहीहंडी उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.गोकुळ दहीहंडी उत्सवाला गोकुळ डेअरीचे चेअरमन व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.
या दहीहंडी उत्सवा दरम्यान सर्व गोविंदा पथकांसाठी दिवसभर मोफत अन्नदान उपक्रम कृष्णा पाटील यांच्यामार्फत राबविण्यात येणार असून सर्व गोविंदा पथक व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.नोंदणी अर्ज भरण्यासाठी 8383005005 तसेच 9152552575 या क्रमांकावर संपर्क करावा.
टेंभीनाक्याची मानाची दहीहंडी
धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तोच थरांचा थरार यंदा गुरूवार ७ सप्टेंबर रोजी टेंभीनाक्यावर पहायला मिळणार असून हा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे.मानाची समजली जाणाऱ्या या हंडीसाठी मुंबई व ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी २ लाख ५१ हजारांचे पारितोषिक दिले जाणार आहे.हा दहीहंडी महोत्सव यशस्वी करण्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपजिल्हाप्रमुख रमेश वैती, शहर संघटक अशोक वैती, हेमंत पवार,माजी नगरसेवक सुधीर कोकाटे आदी प्रयत्न करीत असल्याचे नरेश म्हस्के यांनी नमूद केले.