मुंबई : "निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी!" असे म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला गुरुवारी सर्व भाविकांनी अगदी जड अंतःकरणाने निरोप दिला. मुंबईच्या समुद्रकिनारी झालेली भाविकांची गर्दी, बाप्पाला निरोप देताना पाणावलेले भाविकांचे डोळे आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषाने दुमदुमलेली मुंबापुरी म्हणजे मुंबईतील अनंत चतुर्दशीचे खरे वर्णन.
१० दिवसांचा पाहुणा म्हणून दरवर्षी आपला लाडका बाप्पा आपल्या घरी येतो. गणेशोत्सवातील हे दहा दिवस म्हणजे गणेशभक्तांसाठी एक वेगळीच पर्वणी असते. मात्र गणेश चतुर्थी दिवशी ज्या बाप्पाचे अगदी वाजत गाजत स्वागत केले जाते त्याच बाप्पाला अनंत चतुर्दशी दिवशी निरोप देताना प्रत्येक भक्ताच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. यंदाही गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाला भाविकांनी निरोप दिला.
वरुणराजाची हजेरी
गणेश विसर्जनासाठी मुंबईमध्ये वरुणराजाने देखील हजेरी लावल्याचे दिसून आले. मुंबईत दुपारी साडेतीनच्या सुमारास ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटांसह तुफान पाऊस कोसळला. तर अंधेरी, गोरेगाव, दादरसह गिरगाव चौपाटी परिसरात पावसाचा जोर पाहण्यात आला.
विसर्जनाला गालबोट
मुंबईत गणेश विसर्जनाकरिता सर्वच चौपाट्यांवर मोठी गर्दी उसळते. या अनुषंगाने मुंबई महापालिका आणि इतर यंत्रणांकडून गणेश भक्तांच्या गर्दीचे नियोजन करण्यासोबतच विसर्जनासाठी मदत करण्याकरिता स्वयंसेवकांची नियुक्ती देखील करण्यात आली होती. यावेळी जुहू चौपाटी येथे झालेल्या एका दुर्घटनेमुळे विसर्जनाला गालबोट लागले. मुंबईत दुपारच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला आणि त्याच दरम्यान वीज कोसळली होती. यात १६ वर्षीय हसन युसूफ शेख या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पालिकेची तयारी
- गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे १० हजार कर्मचारी कार्यरत होते.
- गणेश भक्तांच्या सोयीसाठी ७१ नियंत्रण कक्षांची स्थापना.
- घरगुती आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी १९८ कृत्रिम तलावांची व्यवस्था.
लालबागचा राजा म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक राजाच्या दर्शनासाठी येत असतात. गुरुवारी ११.३० च्या सुमारास निघालेल्या लालबागच्या राजाचे तब्बल २२ तासांनी अर्थात शुक्रवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास गिरगाव चौपाटीत विसर्जन झाले. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. मात्र सकाळी समुद्राला ओहोटी असल्यामुळे राजासह अनेक गणपती रांगेतच उभे होते.