भारतीय कृषीक्षेत्रातील मानाचे पान "डॉ. एम. एस. स्वामीनाथन"

    29-Sep-2023
Total Views |
m s swaminathan
 
भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना केंद्र सरकारने नुकतेच भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. त्यानिमित्ताने भारतातील कृषी क्षेत्राची दिशा आणि दशा परिवर्तनात अनन्यसाधारण भूमिका निभावणार्‍या डॉ. स्वामिनाथन यांच्या अविस्मरणीय योगदानाचा आढावा घेणारा हा लेख...

 डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान आजच्या काळात खऱ्या अर्थाने अधोरेखित होते. त्यांनी विकसित केलेल्या तांदूळ आणि गव्हाच्या सुधारित जातींनी देशातील शेतीचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला. सबंध जगात अन्न सुरक्षेसारखा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बनला असताना त्यांनी कृषी क्षेत्रात केलेले नवनवीन प्रयोग सद्यस्थितीत उपयुक्त ठरत आहे. एकंदरीत, भारतातील हरित क्रांतीचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. स्वामीनाथन यांचे कार्य येणाऱ्या नव्या शास्त्रज्ञांना मार्गदर्शक ठरणार आहेत.

डॉ. एम. एस. म्हणजेच डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी केरळमधील कुंभकोणम येथे झाला. स्वामीनाथन यांचं बालपण स्वातंत्र्यसेनानी कुटुंबात गेलं. त्यांचे वडील सांबशिवन स्वामीनाथन हे एक सर्जन आणि महात्मा गांधी यांचे अनुयायी, त्याचबरोबर तत्कालीन आंदोलनात सक्रिय होते. लहानपणापासून त्यांच्या घरात देशासाठी काहीतरी करायचं याकरिता प्रोत्साहन देणारं वातावरण होतं. याच वातावरणात डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांची जडणघडण होत राहिली. डॉ. स्वामीनाथन यांना खरंतर वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. परंतु, १९४३ च्या बंगालच्या दुष्काळात त्यावेळी ३० लाख लोकं उपासमारीने मरण पावली. याच घटनेने डॉ. स्वामीनाथन यांचा विचार बदलला आणि त्यांनी कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा विडा उचलला. डॉ. स्वामीनाथन आयपीएस परीक्षा उत्तीर्ण असले तरी नेहमीच कृषी अभ्यासाला प्राधान्य दिले. कारण त्यांच्या मनात भारताला अन्न संकटातून बाहेर काढण्याचे आणि दुष्काळ आणि उपासमारीच्या संकटातून वाचवण्याचे मोठे ध्येय होते. आपल्या मेहनतीमुळे त्यांनी कृषी क्षेत्रात असे काही केले की जग बघतच राहिले. ज्या भारतात दुष्काळ सामान्य होता, तिथे 'हरितक्रांती' लागू झाल्यामुळे भारत कृषीक्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करू लागला.

famous-agricultural-scientist-Dr-M-S-Swaminathan

१९५० च्या दशकात भारतीय कृषी संशोधन संस्थेत तरुण शास्त्रज्ञ म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या नव्याने विकसित केलेल्या मेक्सिकन बौना गव्हाच्या जातीबद्दल जाणून घेतले. यानंतर त्यांना भारतात बोलावण्यात आले. दोन्ही शास्त्रज्ञांनी गव्हाचे वाण विकसित करण्यासाठी शेजारी काम केले जे जास्त धान्य उत्पन्न देतील. या वैज्ञानिक प्रगतीमध्ये सहभागी होण्याव्यतिरिक्त, स्वामीनाथन यांनी भारतीय शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी नवीन पद्धती देखील तयार केल्या. जास्त उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या जाती, खते आणि अधिक कार्यक्षम शेती तंत्र यांचा वापर करून उत्पादनात प्रभावीपणे वाढ करण्यावर डॉ. स्वामीनाथन यांनी भर दिला.

famous-agricultural-scientist-Dr-M-S-Swaminathan

१९४३ सालच्या बंगालचा दुष्काळानंतर दोन दशकांनी १९६४-६५ दरम्यान देशात अन्न संकट कायम आहे. मान्सून कमकुवत झाला आणि मग दुष्काळ जवळ येऊ लागला. हा तो काळ होता जेव्हा आपल्याला अमेरिकेच्या पीएल-४८० करारानुसार कमी दर्जाचा लाल गहू खाण्यास भाग पाडले गेले. तसेच, दरम्यान, १९६५ मध्ये पाकिस्तानशी युद्ध सुरू झाले होते. युद्ध थांबवले नाही तर गहू मिळणार नाही, अशी धमकी अमेरिका भारताला देत होती. आम्ही अमेरिकेतून गहू मागवत होतो. परंतु, वास्तव हचे की, भारतात गव्हाच्या अनेक जाती होत्या. पण या जातींचे देठ बरेच लांब होते. जे रेनफेड अर्थात सिंचन कमी किंवा पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रासाठी होते. पण मेक्सिकोहून आणलेल्या बटू जातीच्या बिया आल्यावर संकटाचा हा काळ बदलू लागला. आणि याच बटू जातीस शेतात आणून हरितक्रांती घडवण्याचे श्रेय डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना जाते.

एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन

डॉ. स्वामीनाथन यांनी आपले उदात्त ध्येय टिकवून ठेवण्यासाठी आणि चिरस्थायी प्रभाव निर्माण करण्यासाठी, स्वामीनाथन यांनी एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भूक आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी अथक प्रयत्न सुरू ठेवले. याच फाउंडेशनच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात आशेचा किरण म्हणून काम करतानाच ही संस्था शेतकऱ्यांना ज्ञान आणि नाविन्यपूर्ण कृषी तंत्राने सक्षम करण्याचे काम करत आहे. याचबरोबर. डॉ. स्वामीनाथन यांनी आपल्या कारकिर्दीत प्रशासनातील अनेक पदे भूषवली. त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक (१९६१-७२) 'ICAR' चे महासंचालक आणि भारत सरकारच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव (१९७२-७९), कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या. (१९७९-८०). त्यांनी सदस्य (विज्ञान आणि कृषी), नियोजन आयोग (१९८०-८२), आणि आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था, फिलिपिन्स (१९८२-८८) चे महासंचालक म्हणूनही काम केले. त्यानंतर भारत सरकारने सन २००४ साली स्वामीनाथन यांची राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

भारतीय शेतकऱ्यांना आशेचा किरण ठरलेला 'स्वामीनाथन आयोग'

दरम्यान, भारतातील शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमध्ये तत्सम संकटाचा शोध घेण्यासाठी एक आयोग स्थापन करण्यात आला होता. आयोगाने २००६ मध्ये भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या शिफारशींमध्ये असे सुचवले की, किमान विक्री किंमत (एमएसपी) उत्पादनाच्या भारित सरासरी खर्चापेक्षा किमान ५० टक्के जास्त असावी, असे स्वामीनाथन आयोगात स्पष्ट करण्यात आले.

famous-agricultural-scientist-Dr-M-S-Swaminathan

डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारत सरकारने विविध पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. डॉ. स्वामीनाथन यांना भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले. त्याचबरोबर, १९७१ साली रॅमन मॅगसेसे पुरस्कार, १९८६ साली 'अल्बर्ट आईनस्टाईन विश्व विज्ञान पुरस्कारा'सह एच के फिरोदिया पुरस्कार, लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार आणि इंदिरा गांधी पुरस्कारांनी गौरवित डॉ. स्वामीनाथन यांच्या कार्यकतृत्वाची दखल घेण्यात आली. आणि आता त्यांना भारत सरकार कडुन भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या महान कृषीशास्त्रज्ञ आणि भारतीय हरित क्रांतीचे अध्वर्यू डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या कार्यकतृत्वास सलाम!