कांदाप्रश्नी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : पीयूष गोयल

अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजुरी

    29-Sep-2023
Total Views |
Union Cabinet Minister Piyush Goyal On Onion Crisis

नवी दिल्ली :
कांदा उत्पादन, खरेदी तसेच विक्री दराविषयी १४० कोटी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिल्याची माहिती राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक जिल्ह्यातील व्यापारांच्या समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढण्यासाठी, कृषी भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार, ‘नाफेड’ संस्थेचे अपर व्यवस्थापकीय संचालक एस.के.सिंग, ‘एनसीसीएफ’चे व्यवस्थापकीय संचालक नीस जोसेफ चंद्रा, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजा, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे आर्थिक सल्लागार डॉ. कामखेथेंग गुईटे उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापारांच्या समस्या सुरू आहेत. या समस्येच्या निदानासाठी केंद्रीय मंत्री गोयल यांच्यासमवेत मुंबई येथे बैठकाही पार पडल्या होत्या. यासंदर्भात कृषी भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महाराष्ट्र सदन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये, म्हणून ‘नाफेड’ तसेच ‘एनसीसीएफ’ या संस्थांनी प्रत्येकी एक-एक लाख टन कांदा आणखी खरेदी करण्याबाबत केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती मंत्री सत्तार यांनी यावेळी दिली. आता ४०० कोटी रुपयांची आणखी कांदा खरेदी करण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये गरीब शेतकर्‍यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, “कांदा उत्पादन शेतकरी व ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी व्यापारांनी लिलाव बंदीचा निर्णय मागे घेऊन तातडीने कांदा खरेदी केंद्र सुरू करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.