सौदीतले ना‘पाक’ चोर!

    29-Sep-2023   
Total Views |
Saudi Arabia's stern message to Pakistan

मक्का येथील पवित्र मशीद अल-हरम येथे आलेल्या श्रद्धाळूंच्या वस्तू चोरणे, खिसा कापणे, मौल्यवान वस्तू चोरणे अशा घटना घडत होत्या. सौदी अरेबियामध्ये चोरी करणे, हे हराम मानले जाते असे म्हणतात; तसेच भीक मागणेही हरामच. बरं मक्केच्या पवित्र मशिदीच्या इथे अल्लाला मानणारे आणि अस्मानी किताबानुसार जगणारे-मरणारे येणारच. मग ही चोरी होते कशी आणि करते कोण? सौदी अरेबियाच्या दृष्टीने ही अत्यंत वाईट गोष्ट होती. त्यामुळे सौदी अरेबिया प्रशासनाने चोरांना पकडण्यासाठी चांगलेच जाळे टाकले. त्यामुळेच मशिदीजवळ खिसा कापणार्‍या चोरांना पकडण्यात सौदी प्रशासनाला यश आले.

अनेक चोर या मशिदीभोवती चोरी करून मजेत जगत होते. या चोरांना पकडल्यावर त्यांची चौकशी सुरू केली. चोरी करणे इस्लाममध्ये हराम आहे. सच्चा मुस्लीम असे करूच शकत नाही. मग हे कोण असतील? तर चौकशी केल्यानंतर कळले की, हे तर सगळेच पाकिस्तानी मुस्लीम होते. इस्लाम पाळण्यासाठी, अल्लाचे राज्य आणण्यासाठी वेगळा झालेला पाकिस्तान. तिथल्या जन्माने कट्टर मुसलमानांनी सौदी अरेबियामध्ये येऊन चोरी करावी, तेही इस्लामच्या दृष्टीने पवित्र असलेल्या मशिदीजवळ, तेही आपल्याच मुस्लीम श्रद्धाळू बांधवांना लुटावे? यामुळे सौदी अरेबियाने संतप्त होत पाकिस्तानला सुनावले आहे की, सौदी अरेबियामध्ये येण्यास उत्सुक असलेल्यांना व्हिसा देण्याआधी लोकांची योग्य चौकशी करा. हजला जायचे आहे, असे दाखवत पाकिस्तानचे लोक हज कोट्यातून सौदी अरेबियामध्ये दाखल होतात. ते इथे येऊन चोरी करतात, चोरी नाही केली, तर भीक मागतात.

सौदीमध्ये भीक मागणे हा गुन्हा आहे. सौदी अरेबियाने म्हटले आहे की, सौदी अरेबियामधील जवळ-जवळ सगळेच तुरूंग सौदीमध्ये येऊन भीक मागणार्‍या किंवा चोरी करणार्‍या पाकिस्तानी नागरिकांनी भरून गेले आहेत; तसेच त्याहीपुढे जाऊन यावर पाकिस्तानचे म्हणणे काय असावे? पाकिस्तानने सौदी अरेबियाच्या म्हणण्याला दुजोरा दिला. पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे की, पाकिस्तानमध्ये अकुशल कामगार भरपूर आहेत. ज्यांना कसलेच काम जमत नाही, ज्यांच्याकडे कसलेच कौशल्य नाही, त्यामुळे हज कोट्यातून असे लोक सौदीला जातात आणि चोर्‍या करतात, तर पाकिस्तानमध्ये किती निर्लज्जता असावी, याचे उत्तम उदारहण म्हणजे, यावर पाकिस्तानने सौदी अरेबियाकडेच गरिबीचे रडगाणे गायले. पाकिस्तान सध्या बिकट परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे सौदी अरेबियाने पाकिस्तानला आर्थिक साहाय्य करावे. चीनच्या सोबत मिळून सौदी अरेबियाने ११ अब्ज डॉलर्स कर्ज द्यावे, अशी पाकिस्तानने सौदी अरेबियाकडे विनवणी केली.

सौदी अरेबियाने पाकिस्तान्यांना चोर, भिकारी म्हटले, तरीही पाकिस्तानला अजिबात लाज नाही. तसेही पाकिस्तानचा जन्मच ’वेगळे व्हायचे आहे’ अशी भीक मागूनच झाला. ती भीक मिळवण्यासाठी, या पाकिस्तान समर्थकांनी हिंसा आणि दंगा माजवत लाखो निष्पापांना देशोधडीला लावले, तेव्हा कुठे भिकेत मिळालेला पाकिस्तान जन्माला आला. पाकिस्तानची ही भीक मागण्याची मानसिकता अनुभवायची असेल, तर समाजमाध्यमांवरील पाकिस्तानी नागरिकांचे व्हिडिओ पाहावेत. फुकटचे खाद्यपदार्थ खाण्यासाठी किंवा छोट्याशा फुकटच्या मौजमजेसाठी कशाप्रकारे फसवणूक केली, कसे खोटे बोललो, चोरी केली, अशा फुशारक्या मारणारे रिल्स हे पाकिस्तानी लोक बनवत असतात.

बरं, विमानामध्ये खोटे बोलून लोकांकडून पैशांची भीक कुणी मागू शकतो का? यावर कुणाचा विश्वास बसेल का? पण, तसेही झाले. नुकतेच एका विमानात एका माणसाने सगळ्या प्रवाशांकडून भीक मागितली. अर्थात, तो भिकारी प्रवासी ‘भिकिस्तान’ नावाने प्रसिद्ध झालेल्या पाकिस्तानचा नागरिक होता, तर तो विमानात भीक मागणारा माणूस पाकिस्तानी होता. तो म्हणत होता की, “मला पैसे द्या, त्या पैशांतून पाकिस्तानमध्ये मदरसा बांधणार आहे.” विमानात भीक मागणारा माणूस मिळालेल्या भिकेतून पाकिस्तानमध्ये कुठे, कधी, केव्हा मदरसा बांधेल याबद्दल खात्री नाही, अशी ही ‘पाकिस्तानी भीकगाथा.’ चोरी किंवा भीक, लबाडी किंवा दहशतवाद यांवरच पाकिस्तान जीवंत आहे. एखाद्या देशाची बेईज्जती तरी किती व्हावी? त्याचे उत्तुंग परिमाण म्हणून पाकिस्तानकडे पाहू शकतो.

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.