ओबीसींच्या मागण्यांवर आज महत्त्वपूर्ण बैठक!

    29-Sep-2023
Total Views |

OBC


मुंबई :
ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात आज २९ सप्टेंबर रोजी महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी २ वाजता ही बैठक बोलवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
 
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपले उपोषण सोडले. मात्र, दुसरीकडे मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे.
 
त्यामुळे हे दोन्ही समाज आमनेसामने आले आहेत. त्यासाठी गेल्या १९ दिवसांपासून चंद्रपूर येथे ओबीसी समाजाकडून आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र न देण्याचे लेखी आश्वासन देण्याची मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात येत आहे.
 
यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. बबनराव तायवाडे, आशिष देशमुख, अशोक जीवतोडे यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. आजच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यास ओबीसी नेते राज्यभरातील आंदोलन मागे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.