मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर गेली आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात १६ आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवले होते. त्यानंतर ठाकरे गटाने सुनावणीला दिरंगाई होत असल्याचा आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दोन आठवड्याची मुदत दिली होती.
त्यानंतर आमदार अपात्रतेची सुनावणी ३ ऑक्टोबरला होणार होती. परंतु, आता कोर्टाने ही तारीख पुढे ढकलली आहे. त्यानुसार ६ ऑक्टोबरला ही सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीबाबत विधिमंडळाच्या वतीने दोन्ही गटांना वेळापत्रकाबाबत सूचित करण्यात आले आहे.
१३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत आमदार अपात्रता प्रकरणावर युक्तिवाद केला जाणार आहे. २३ नोव्हेंबरच्या सुनावणीनंतर पुढील दोन आठवड्यात अपात्रता प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे. याबाबतचा अंतिम निकाल कधी लागेल याबाबत अजून स्पष्ट करण्यात आले नाही.