मुंबई : आगामी आयसीसी विश्वचषक २०२३ येत्या ५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या विश्वचषकासाठी भारत यंदा यजमानपद भूषविणार आहे. याचदरम्यान, आता समस्त क्रिकेट रसिकांना भारत आणि पाकिस्तान सामन्याची आतुरत आहे. भारत आणि पाक दरम्यान दि. १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे सामना होणार आहे.
याच सामन्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदने वादग्रस्त विधान केले. तो म्हणाला, भारतात आम्हाला हैदराबाद आणि अहमदाबाद येथे सपोर्ट मिळू शकेल. याच मागचं कारणदेखील त्याने सांगितले आहे. हैदराबाद आणि अहमदाबाद येथे मुस्लिम लोकसंख्या जास्त असल्यामुळे पाकिस्तानी संघाला मुस्लिम लोकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल असे वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आगामी विश्वचषकाच्या तोंडावर अशाप्रकारचे वकतव्य पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूने करणे भारतीय क्रिकेट रसिकांना पटलेले नाही. मुश्ताक अहमदने पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवरील संवादादरम्यान अशाप्रकारचं वकतव्य केले आहे.