शशांक मणी लिखित पुस्तकाचे प्रकाशन

"मिडल ऑफ डायमंड इंडिया" मध्ये राष्ट्रीय पुनर्जागरणाची गाथा

    29-Sep-2023
Total Views |
 
Shashank Mani
 
 
 
शशांक मणी लिखित पुस्तकाचे प्रकाशन
 
 
'मिडल ऑफ डायमंड इंडिया' मध्ये राष्ट्रीय पुनर्जागरणाची गाथा 
 
 
मोहित सोमण
 
 
मुंबई : जागृती यात्रा व जागृती एंटरप्राइज सेंटर - पूर्वांचल (जेईसीपी) चे संस्थापक श्री शशांक मणी लिखित नवे पुस्तक मिडल ऑफ डायमंड इंडिया या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अलीकडेच पार पडला. हे पुस्तक 'आत्मनिर्भरता' आणि 'मेक इन इंडिया'  या संकल्पनांना एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाते. भारताच्या छोट्या-छोट्या शहरांमध्ये घडवून आणण्याचे कौशल्य आहे, जे आजवर दुर्लक्षित राहिले आहे,  या कौशल्याचा समावेश करण्याच्या संकल्पनेवर हे पुस्तक आधारित आहे. अमृत काळामध्ये छोट्या शहरांमधील उद्यमितेला प्रोत्साहन दिले गेल्यास आत्मनिर्भर भारत वास्तवात साकारला जाऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी लेखकाने खऱ्या आयुष्यातील प्रसंग आणि अनुभव नमूद केले आहेत.
 
 
 
श्री शशांक मणी यांनी यावेळी पुस्तकाबाबत भाष्य करताना सांगितले की, "संकल्पनेच्या दृष्टिकोनातून या पुस्तकात तीन घटक आहेत - मिडल ऑफ द डायमंड इंडिया, उद्यमिता आणि एक नवी आधुनिकता जी पुनर्जागरणाची ज्योत पेटवेल. मिडल ऑफ द डायमंड घोषित करते की प्रह्लादचा पिरॅमिड कालबाह्य झाला आहे. ८०० मिलियन ना श्रीमंत आहेत ना गरीब आणि ते मिडल ऑफ द डायमंड आहेत. हा भारत उदयास येत आहे आणि त्याला सक्षम बनवले पाहिजे. या भारताने फक्त उत्पादनांचा उपभोग घेणे आणि मत देण्यापुरते मर्यादित न राहता, निर्मिती व उभारणी केली पाहिजे. यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि वर्ग, जात, पंथ या सर्वांमधून एक नवा भारत उदयास येऊ शकतो."
 
 
पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने 'मिडल ऑफ डायमंड इंडिया'वर एका पॅनल चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गज कॅपिटलचे एमडी श्री. गोपाळ जैन, सीमेन्स लिमिटेडचे एमडी (इंडिया) श्री. सुनील माथूर, लोवे लिंटासचे माजी सीईओ श्री. विराट टंडन सहभागी झाले होते. बजाज ऑटोचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. मधुर बजाज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
 
 
भारताचा मध्य म्हणजेच द्वितीय व तृतीय श्रेणीतील जिल्ह्यांमधील नागरिक, हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात कुशल, निपुण भाग असून देखील दुर्लक्षित राहिला आहे, त्यांचा समावेश करून घेण्याची क्रांतिकारी संकल्पना मिडल ऑफ डायमंड इंडिया पुस्तकात प्रस्तुत करण्यात आली आहे. या पुस्तकात भारताच्या मध्यातील अशांच्या लपून राहिलेल्या कहाण्या सांगितल्या गेल्या आहेत जे त्यांचे ठिकाण आणि भाषेमुळे दुर्लक्षिले गेले होते. भारताच्या क्रांतिकारी भूतकाळाचा, येथील संस्कृती, नागरिक, नवोन्मेषक आणि भारताचे सत्त्व यांचा अभ्यास करून या पुस्तकात या हिऱ्याच्या आकाराच्या भारतावर प्रकाश टाकण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात स्थापित करण्यात आलेल्या उद्यम इकोसिस्टिमचे उदाहरण देत हे पुस्तक देशातील छोटी शहरे व जिल्ह्यांमधील उद्योजक जीवनशक्तीला जागे करून निर्माण करण्यात आलेल्या आधुनिक भारताची ओळख करून देते. अमृत काळातील येत्या २५ वर्षांमध्ये राष्ट्रीय पुनर्जागरणाची ज्योत पेटवण्यासाठी उद्यमितेचा वापर करून बनयान क्रांतीचा प्रस्ताव हे पुस्तक मांडते.