रसिका शिंदे-पॉल
मनोरंजन म्हणजे नाटक, चित्रपट आणि वेब मालिका. कामाच्या व्यापातून आठवड्याच्या शेवटी चांगला चित्रपट किंवा वेब मालिका पाहात वेळ घालवण्याची मजाच काही और आहे. पण, कामाच्या रगाड्यात बऱ्याचदा कोणता चित्रपट अथवा वेब मालिका प्रदर्शित झाली आहे हे लक्षात राहात नाही. यासाठीच आम्ही नवा सदर घेऊन आलो आहोत. तर नक्की हा सदर वाचा आणि आपला विकेंड आनंदात घालवा....
द वॅक्सिन वॉर
२०२० हे साल जरी ऐकले तरी डोळ्यांसमोर येतं करोनाच्या काळात जगात पसलेलं मृत्यूचं थैमान. एकीकडे माणसं आपला जीव गमावत होती तर दुसरीकडे शास्त्रज्ञ त्यांचा जीव कसा वाचेल या विचारात होते. करोनाच्या संकटापासून देशालाच नाही तर अवघ्या जगाला वाचवण्यासाठी आपल्या भारत देशाच्या शास्त्रज्ञांनी कोवॅक्सिन ही लस तयार केली होती. डॉ. भार्गवा यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शास्त्रज्ञांनी मिळून ही लस तयार केली होती. त्यासाठी त्यांनी कसे अथक प्रयत्न केले, त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याचे उत्तम सादरीकरण चित्रपटात करण्यात आले आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द वॅक्सिन वॉर’ हा चित्रपट खरं तर या सर्व भारतीय शास्त्रज्ञांचा बायोपिक आहे असेच म्हणावे लागेल.
प्रदर्शित
कलाकार - नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन, अनुपम खेर
फुकरे ३
‘फुकरे ३’ हा चित्रपट मैत्रीची गोष्ट सांगणारा असून या चित्रपटाचे याआधी २ भाग प्रदर्शित झाले आहेत. पुन्हा एकदा मैत्री आणि त्यातील धमाल मस्ती प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. दरम्यान, फुकरे चित्रपटाच्या पहिल्या भागात चूचा आणि हन्नीभाईची ओळख शाळेपासून होते. शाळेत ते पहिल्यापासूनच फेल होत असतात. आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात अनेक गोष्टी घडताना दिसतात. यावेली देखील या दोन्ही मित्रांना राजकारणाचा झटका लागणार आहे. ‘फुकरे ३’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदिप लांबा यांनी केले आहे.
प्रदर्शित
कलाकार - पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंह, पंकज त्रिपाठी, रिचा चड्ढा
चंद्रमुखी २
अभिनेत्री कंगना राणावत हिची प्रमुख भूमिका असलेला ‘चंद्रमुखी २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २००५ मध्ये आलेल्या ‘चंद्रमुखी’ या तमिळ चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. ‘चंद्रमुखी’ हा तमिळ सिनेमा २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या तमिळ भयपटाचे को पी. वासू यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले होते. २००४ मध्ये आलेल्या अपथमित्रा या कन्नड चित्रपटाचा हा रिमेक होता. आणि याच चित्रपटाचा हिंदीत २००७ मध्ये ‘भूल भुलैया’ या नावाने चित्रपट केला होता. ‘चंद्रमुखी २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पी. वासू यांनी केले आहे.
प्रदर्शित
कलाकार – कंगना राणावत, राघवा लॉरेन्स, राव रमेश, सथ्यराज
तीन अडकून सीताराम
हृषिकेश जोशी दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा तीन मित्रांची आहे. तीन कूल, बिनधास्त मित्र मजा करायला विदेशात जातात आणि तिथे त्यांच्याबरोबर एक अनपेक्षित घटना घडते. त्या रात्री पार्टीनंतर नेमकं काय घडले आणि हे तीन मित्र कसे अडकले? त्यांची ही मजा, सजा कशी बनली, हे २९ सप्टेंबरला प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळेल. या सगळ्या घटनेमुळे या तिघांची मैत्री टिकते की नाही? या जाळ्यात अडकलेले हे तीन सीताराम कसे बाहेर पडतील, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
कधी? – २९ सप्टेंबर २०२३
कलाकार - वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे, आनंद इंगळे, विजय निकम, समीर पाटील, हृषिकेश जोशी