प्रतिष्ठित एमी पुरस्काराच्या नामांकनांची घोषणा, भारतीय कलाकारांचीही लागली वर्णी

    27-Sep-2023
Total Views |

emmy awards 
 
मुंबई : आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२३ ची नामांकने अखेर जाहिर झाली आहेत. महत्वाची बाब म्हणजे या नामांकनांच्या यादीत हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलकारांची वर्णी लागली आहे. या यादीत २० देशांतील ५६ नामांकित लोकांचा १४ विविध श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. यात भारतातून शेफाली शाह, जिम सरभ आणि वीर दास यांच्या नावाचा समावेश असून ‘दिल्ली क्राइम २’ या वेब मालिकेसाठी शेफाली शाह हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
 
याशिवाय जिम सरभला सोनी लिव्हवरील रॉकेट बॉईज या वेब मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनय या श्रेणीत नामांकन मिळाले आहे तर, नेटफ्लिक्सवरील वीर दास: लँडिंग या शोसाठी वीर दासला नामांकन मिळाले आहे. वीर दासची स्पर्धा ही फ्रान्सचा ले फ्लॅम्बेउ, अर्जेंटिनाचा एल एनकार्गाडो आणि यूकेचा कॉमेडी शो डेरी गर्ल्स सीझन 3 यांच्यासोबत असणार आहे. याशिवाय दिग्दर्शक आणि निर्माती एकता कपूरला हिला देखील आंतरराष्ट्रीय एमी डायरेक्टरेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एमी पुरस्कार २०२३ चा हा सोहळा २० नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.