इंडोनेशिया ते वाळवंटी देश

    27-Sep-2023   
Total Views |
TikTok Video Lutfiawati who identifies as Muslim

लीना लुतफीयावती हिने ‘टिकटॉक’वर नुकताच एक व्हिडिओ बनवला. त्यामध्ये तिने दाखवले होते की, अत्यंत श्रद्धाशील मनाने ती नमाज पढते. नमाज पढल्याशिवाय ती अन्नदेखील ग्रहण करीत नाही. अल्लाची प्रार्थना सर्वप्रथम त्यानंतर पोटपूजा, असे गोंडस चित्र प्रदर्शित करण्यासाठी तिने नमाज पढल्यानंतरच दिसायला चटपटीत असलेले भाजलेलं मांस खाल्ले. व्हिडिओ बनवताना तिची धार्मिकता, नमाज पढण्यविषयी तिची श्रद्धा तसेच त्यानंतर तिने ग्रहण केलेले अन्न, त्यामुळे या व्हिडिओला अनेक लाईक्स मिळाले. मात्र, याच व्हिडिओवरून या महिलेला दोन वर्षांचा तुरूंगवास ठोठावण्यात आला.

ही घटना इंडोनेशियाची. त्या महिलेला तुरूंगवास ठोठावला. त्याचे कारण म्हणजे, नमाज पढल्यानंतर ती जो अत्यंत चटपटीत आणि स्वादिष्ट दिसणारा अन्नपदार्थ खात होती, ते डुकराचे मांस होते. डुक्कर इस्लाममध्ये हराम. सर्वस्वी निषिद्ध. हराम असलेले काम केले म्हणून तिला दोन वर्षांची शिक्षा झाली. काय खावे, काय प्यावे, काय घालावे वगैरे-वगैरेंचे नियम अस्मानी किताबाने दिलेले असताना, त्या नियमांचे उल्लंघन तिने केले. इस्लामच्या नजरेतले केवढे मोठे घोर पाप तिने केले. बरं, लीना ही जन्मधर्माने मुस्लीमच. पण, तरीही लीनाच्या या कृत्यामुळे तिला ईशनिंदेच्या कायद्याखाली अटक झाली.

जगातली सगळ्यात मोठी मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये, हे काही नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी इंडोनेशियामध्ये जनतेसाठी धार्मिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. तिथे स्त्री आणि पुरूष दोघांनाही एकत्रितरित्या प्रार्थनेला आमंत्रित करण्यात आले. त्यावेळीही प्रार्थनेच्या आयोजकाला तुरूंगवास घडला होता. कारण, स्त्रियांनी आणि पुरुषांनी एकत्रित प्रार्थना करणे म्हणजेही हराम. धार्मिक नीती-कायद्याला मोडणे आहे. त्यामुळे हे पाप घडवून आणलेल्या आयोजकाला शिक्षा मिळाली, तर याच इंडोनेशियामध्ये मागे बौद्धधर्मीय चिनी नागरिकत्व असलेल्या वृद्ध महिलेलाही तुरूंगवास भोगावा लागला. याला कारण होते, तिने उच्चारलेले एक वाक्य.

बाजूच्या मशिदीमधल्या भोंग्यांनी खूप त्रास होतो, असे ती म्हणाली होती. मशिदीच्या भोंग्यांचा त्रास म्हणणे म्हणजेही ईशनिंदाच, असे म्हणून त्या वृद्धेस तुरूंगात डांबण्यात आले. हे सगळे का? या घटनांमधील ज्या व्यक्तींना ईशनिंदेसाठी तुरूंगवास भोगावा लागला. खरेच ते गुन्हेगार होते का? अर्थात, तुमच्या माझ्या मतांनी तिथे काही बदलणार नाही. मात्र, तरीही या तीनही व्यक्ती आणि ईशनिंदेच्या बळी ठरलेल्या त्यांच्यासारख्या हजारो व्यक्ती यांच्यासोबत जे काही घडले, त्याबद्दल न्याय-अन्यायाची चर्चा होणे गरजेचे आहे. असो. आपला भारत चंद्रावर पोहोचला. मात्र, जगभरातील काही देश अजूनही विज्ञान आणि मानवता यांपेक्षा तर्कहीन गोष्टींना महत्त्व देताना दिसतात. या परिक्षेपात इराण आणि अफगाणिस्तान आणि अपवाद वगळता एकंदरच वाळवंटी देशांची उदाहरणं खूप महत्त्वाची. या देशांत सगळ्याच बाबतीत प्रगतीला खिळ बसला.

पण, अविकसित, अप्रगत देशासाठी जनतेने सरकारला धारेवर धरू नये, म्हणून हे देशामधील सत्ताधारी लोक नवनवे फतवे काढून महिलांवर अत्याचाराचा कळस करतात. हा अत्याचार करीत असताना, या देशाचे प्रशासन त्यांच्या धर्माचा हवाला देतात. या धार्मिक दाखल्यांची जाहिरात करण्यासाठीही एक गट तयार असतोच. तो या असल्या देशांमध्ये महिला कशा धर्मविहीन वागतात, त्यामुळे कसे पाप वाढते, असे सांगत असतो. त्यांच्या या बोलण्यामध्येच, त्या देशातले बहुसंख्य लोक गुंतून पडतात. मग देशात दहशतवाद असू दे की गरिबी, त्याबद्दल या देशातले नागरिक चकार शब्द बोलत नाहीत. मात्र, महिलांनी हिजाब-बुरखा घातला पाहिजे आणि अमानवीयदृष्ट्या त्यांच्यावर घातलेले निर्बंध त्यांनी कटाक्षाने पाळले पाहिजे, यासाठी देशातले लोक अत्यंत सावध होतात. इंडोनेशियामध्येही सध्या हे सुरू आहे, असे दिसते.

गेल्याच महिन्यात या देशातले १२२ जण पकडले गेले. त्यात मजदूर, शिक्षक अगदी कामगारही होते. हे सगळे जण साडे सात लाख रुपयांच्या बदल्यात परदेशात जाऊन त्यांची एक किडनी विकण्यास तयार होते. गरिबी आणि लाचारीला कंटाळून या लोकांनी हा निर्णय घेतला. याबाबत तेथील फतवाकारांनी काही म्हटलेले आढळले नाही. पण, खरंच ईशनिंदेच्या नावाखाली माणसाच्या जगण्याला चिरडून टाकणार्‍या तर्कहीन कट्टरतेमुळे इंडोनेशिया-इराण-अफगाणिस्तान ते वाळवंटी देशातले सांस्कृतिक अंतर कमी होत चालले, हे नक्की.
९५९४९६९६३८


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.