२०२४ मध्ये शिंदे गटाचं कुणीही संसदेत नसणार - संजय राऊत

    27-Sep-2023
Total Views |

Sanjay Raut


मुंबई :
शिंदे गटाकडून महिला आरक्षणाच्या वेळी अनुपस्थित राहिलेल्या ठाकरे गटाच्या चार खासदारांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. २०२४ मध्ये शिंदे गटाची पाटी कोरी राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
२०२४ मध्ये शिंदे गटाचे कुणीही संसदेत नसणार, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. तसेच शिंदे गटाची पाटी कोरी असणार आणि मुख्यमंत्र्यांसह एकही आमदार, खासदार विधानसभेत दिसणार नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला आहे.
 
नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले. हे विधेयक प्रचंड बहुमताने मंजूरही करण्यात आले. मात्र, यावेळी ठाकरे गटाचे चार खासदार अनुपस्थित होते. यासंदर्भात खासदारांनी अद्याप कोणतीही माहिती लोकसभा सचिवालयाला दिली नाही.
 
त्यामुळे व्हिप नाकारल्याचे सांगत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, राजन विचारे, संजय उर्फ बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर या चार जणांना शिंदे गटाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.