गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज

१० हजार कर्मचार्‍यांचा फौजफाटा; ७१ नियंत्रण कक्षांसह १९८ कृत्रिम तलाव

    27-Sep-2023
Total Views |

ganpati visarjan

मुंबई : गेल्या दहा दिवसांपासून भक्तांकडे विराजमान असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा क्षण जवळ आला असून, गुरुवार, दि. २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणरायाला भावपूर्णनिरोप देण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे.
मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोईसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिकेचे सुमारे दहा हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोईसुविधांसह सुसज्ज आहेत.

यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण १९८ कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था आहे, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.
श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना सुविधा व्हावी,विसर्जनस्थळी एकाच वेळी गर्दी होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा विकसित केली आहे. ‘मायबीएमसी’ व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट या ८९९९-२२-८९९९ क्रमांकावरील चॅटबॉटमध्ये यंदा आपल्या नजीकचे गणेश मंडळ व मूर्ती विसर्जनस्थळ शोधण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मत्स्यदंशापासून बचावाचे आवाहन

ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. या पार्श्वभूमीवर विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे.

अनंत चतुर्दशीला भरती आणि ओहोटी

यंदा अनंत चतुर्दशी दिवशी गुरुवार, दि. २८ सप्टेंबर रोजी समुद्रात सकाळी ११ वाजता ४.५६ मीटरची भरती, सायंकाळी ५.०८ वाजता ०.७३ मीटरची ओहोटी, रात्री ११.२४ वाजता ४.४८ मीटर उंचीची भरती असेल. यानंतर, शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर रोजी पहाटे ५.१५ मिनिटांनी ०.५६ मीटरची ओहोटी, सकाळी ११.३७ वाजता ४.७१ मीटरची भरती, सायंकाळी ५.४९ वाजता ०.३६ मीटरची ओहोटी असेल. या भरती तसेच ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणार्‍या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

चौपाटीच्या किनार्‍यांवर ४६८ स्टील प्लेट 

छोट्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी ४६ जर्मन तराफे

चौपाट्यांवर ७६४ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी

१५० निर्माल्य कलशांसह २८२ निर्माल्य वाहने

६० निरीक्षण मनोरे, ६८ स्वागत कक्ष

७५ प्रथमोपचार केंद्रांसह ६१ रुग्णवाहिका

‘बेस्ट’कडून १,०८३ फ्लडलाईट आणि २७ सर्चलाईट

नागरिकांच्या सोयीसाठी १२१ फिरती प्रसाधनगृहे

अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ