ठाणे : ठाणे जिल्ह्यामधून मध्य रेल्वेचे लोहमार्ग जात असून त्यांचा काही भाग हा ठाणे व कल्याण तालुक्यातून खाडी क्षेत्रातून जातो. या मार्गालगत होत असलेल्या अनधिकृत रेती उत्खननाबाबत पोलीस प्रशासनाने संबंधीत क्षेत्रामध्ये १९ नोव्हें पर्यत मनाई आदेश जारी केले आहेत.अवैध रेती उत्खनन व लोहमार्गास होत असलेल्या संभाव्य धोका लक्षात घेता अभियांत्रिक स्वरुपाच्या उपाययोजनेंतर्गत रेल्वे मार्गालगत गॅबियन बंधारे बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
मुंब्रा ते कल्याण दरम्यान खाडी किनारी रेल्वे ट्रॅकजवळ व कांदळवन क्षेत्रात होणाऱ्या अवैध रेती उत्खननाबाबत याचिकाकर्ते गणेश पाटील यांनी उच्च न्यायालयात क्रिमीनल रिट पिटीशन दाखल केली होती. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. त्यानुसार रेल्वे मार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कोणत्याही रेल्वे पुलाच्या व रस्ते पुलाच्या कोणत्याही बाजूने ६०० मीटर्स (२ हजार फूट) अंतराच्या आत वाळू - रेती उत्खनन होणार नाही, त्याकरीता १९ नोव्हेंबर पर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजेंद्र दाभाडे यांनी सांगितले.