जागर पर्यावरणजागृतीचा...

    27-Sep-2023   
Total Views |
Article On Wildlife Photographer Gajanan Shetye

पर्यावरणाची आवड जोपासून त्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणार्‍या नॅचरलिस्ट आणि वन्यजीव छायाचित्रकार गजानन शेट्ये यांचा हा प्रवास...

जनजागृती करणार्‍या आणि संशोधकांनाही प्रसंगी मार्ग दाखवणार्‍या पर्यावरणरक्षकांचे महत्त्व हे वादातीत म्हणावे लागेल. अशाचप्रकारे पर्यावरण क्षेत्रात जनजागृतीचे काम गेली अनेक वर्षं सातत्याने करणार्‍या गजानन शेट्ये यांचा जन्म गोव्यातील केरी गावचा. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यातील खाण्याळे हे त्यांचं मूळ गाव. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षण भायरीलवाडा येथील सरकारी शाळेत झालं, तर पुढे महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी बाहेरून परीक्षा देत पूर्ण केले. शाळेत असल्यापासूनच विविध स्पर्धा तसेच कार्यक्रमांमध्ये उत्साहाने ते सहभाग घ्यायचे. क्रीडा, सांस्कृतिक अशा अनेक विषयांमध्ये त्यांना रस होता, त्याचबरोबर त्यात गतीही होती. या कलागुणांमुळे शाळेतूनच त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध होऊ लागलं.

पाचवीत असताना त्यांच्या शाळेची शैक्षणिक सहल निसर्ग पर्यटनासाठी गेली होती आणि तेथील वातावरण पाहून प्रभावित झाल्यामुळे बालवयातच त्यांची पर्यावरणाशी नाळ जोडली गेली. गोव्यात राजेंद्र केरकर हे विवेकानंद पर्यावरण जनजागृती समूह (विवेकानंद एनव्हायर्नमेंटल अव्हेअरनेस ब्रिगेड) चालवतात. २००३ पासून जनजागृतीचे मोलाचे कार्य करीत असलेल्या संस्थेमध्ये गजानन २००८ साली काम करू लागले. विविध शाळा, महाविद्यालये किंवा स्थानिक छोट्यामोठ्या संस्थांमध्ये जाऊन पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचे काम ते आजही तितक्याच नेटाने करतात. विविध पद्धतीने कला, नेचर ट्रेल्स यांच्या आयोजनामुळे त्यांनी केलेली जनजागृती अधिक परिणामकारक ठरते. त्याचबरोबर सायकल रॅली, प्रेझेंटेशन आणि पथनाट्यांमार्फतही ते पर्यावरणाशी निगडित विविध विषय अगदी सोप्या भाषेत उपस्थितांना समजावून सांगतात.

गजानन शेट्ये यांनी ‘बीए’ पदवी संपादित केली. खरं तर एखाद्या विषयाची आवड असली, तर त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी त्याअनुसारच शिक्षण असायला हवे, असे गरजेचे नाही. पराकोटीची आवड आणि मनस्वी छंद माणसाला कुठेही घेऊन जाऊ शकतो, हेच गजानन सांगतात.

हवामान आणि वातावरणीय बदलांसारख्या संवेदनशील विषयांवर जनजागृती ही गरजेचीच. म्हणून प्लास्टिकबंदी, जलप्रदूषण यांसारखे अनेकविध विषय घेऊन ते विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करतात. शालेय मुलांना पथनाट्यासारख्या इतर अनेक छोट्यामोठ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेत, जनजागृती केल्यामुळे अनेक भागांमध्ये त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्याचबरोबर गजानन गोव्यासह महाराष्ट्रातही सर्पबचावाचे काम करतात. एखाद्या ठिकाणी आढळलेल्या सापाला न मारता, त्याच्या बचावासाठी गेली काही वर्षं ते सर्पमित्र म्हणूनही सक्रियपणे कार्यरत आहेत.

महाराष्ट्रातील आंबोलीतही गजानन नॅचरलिस्ट म्हणून काम करीत आहेत. ‘मृगया एक्सपीडिशन’ या संस्थेबरोबर गजानन पूर्णवेळ नॅचरलिस्ट म्हणून काम पाहतात. या संस्थेमार्फत विविध भागांत विद्यार्थ्यांच्या तसेच संशोधक आणि विविध गटातील पर्यटकांसाठी अभ्यास सहलींचे आयोजन केले जाते. पक्ष्यांशी निगडित वेगवेगळी चर्चासत्रे, बर्डवॉचिंग ट्रेल्स यांनाही पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. याचबरोबर गजानन यांना स्वतः वन्यजीव छायाचित्रणाची आवड आहेच. गजानन यांनी टिपलेल्या अनेक छायाचित्रांना विविध प्रतिष्ठित संस्थांतर्फे सन्मानित देखील करण्यात आले आहे. त्यापैकी एक म्हणजे पोस्टकार्डवर वापरण्यात येणार्‍या स्टॅम्प्समध्ये गजानन यांच्या छायाचित्रांची निवड करण्यात आली. त्यांच्या पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञान लक्षात घेता, अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये त्यांची मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. गोव्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये गजानन यांचा सत्कारदेखील करण्यात आला आहे.

ट्रेल्ससाठी येणार्‍या पर्यटक आणि पर्यावरणप्रेमींचेही अनेक रंजक किस्से ते सांगतात. काही वन्यजीव छायाचित्रकार, तर काही संशोधक ट्रेल्ससाठी आल्यानंतर त्यांच्याकडून अधिवासाला धोका पोहोचेल, अशा घटनाही घडल्या आहेत. काही छायाचित्रकारांनी हा पर्यावरणीय हस्तक्षेप टाळण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे नैसर्गिक अधिवासाला धक्का पोहोचू न देता ही मंडळी काम करू शकतात, तर काहींचा मात्र अनुत्सुकतेमुळे तसे करण्याकडे कल दिसत नाही. अशावेळी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून ट्रेलचे आयोजन करावे लागते, असे गजानन सांगतात.

अशाप्रकारे जनजागृतीच्या कार्यात झोकून काम करणार्‍या आणि नॅचरलिस्ट म्हणूनच पर्यावरणासाठी झटणार्‍या गजानन यांना फिल्डवर राहून काम करायला खूप आवडते. जंगल आणि पक्षीनिरीक्षण करीत काम करण्यातच त्यांचा आनंद दडलेला आहे. “अनेकदा एखादा पक्षी किंवा प्राणी मी पाहिलेला असला तरी कधी फिल्डवर तो दिसला, तरी तो न्याहाळत बसण्यात जो आनंद आहे, तो कशातही नाही, असे ते सांगतात. मी तासन्तास पुन्हा त्याचे छायाचित्र काढण्यात घालवतो, तोच माझा आनंद आहे,” असं ते म्हणतात. जनजागृतीचा मोठा वाटा उचलून आजची पिढी सुज्ञ करणार्‍या गजानन शेट्ये यांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.