नागपूर : पूरपरिस्थितीची पहाणी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाच्या ताफ्यापुढे आलेल्या व्यक्तीचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्या व्हीडिओची तोडमोड करुन अनेकांनी फडणवीसांनी नागरिकाला ओढत नेले, असा आरोप करण्यात आले. मात्र, या व्हीडिओमागील सत्य आता पुढे आले आहे. संबंधित व्यक्तीने स्वत:हून समोर येत या विषयातील वस्तूस्थिती आज जनतेसमोर कथन केली.
या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने म्हटले आहे की, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या भागात पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी नागरिकांशी ते चर्चा करीत असताना गर्दीमुळे सुरक्षारक्षक आणि पोलिस मला फडणवीसांपर्यंत पोहचू देत नव्हते. ही गोष्ट फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी माझा हात धरला आणि चल बाबा मी तुझ्या घरी येतो असे म्हणत मला ते माझ्या घरी पाहणी करायला घेऊन गेले."
भाजपने यानंतर विरोधकांवर निशाणा साधला आहे. भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हा व्हीडिओ ट्विट करत म्हटले आहे की, "आता स्वतः या नागरिकानेच वस्तूस्थिती समोर आणल्याने कालपासून कोल्हेकुई करणारे विरोधक आणि त्यांची भाडोत्री ट्रोलर्स मंडळी तोंडावर आपटली आहे. 'सत्य अस्वस्थ होईल पण पराभूत होत नाही' या उक्तीचे यानिमित्ताने प्रत्यंतर आले आहे. देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती देवमाणूस आहे, या देवमाणसावर केलेले खोटे जास्त काळ टिकत नाहीत, त्यांचे विरोधक तोंडघशी पडतात हा अनुभव देखील यानिमित्ताने आला असेल."