जेडीएसची रालोआवापसी

    25-Sep-2023   
Total Views |
Deve Gowdas JD(S) joins NDA alliance son Kumaraswamy

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा अध्यक्ष असलेल्या जनता दल सेक्युलरने अखेर भाजपसोबत युती केली. काँग्रेसच्या दावणीला बांधले जाण्यापेक्षा भाजपसोबत जाऊन सन्मानाने राजकारण करण्याचा साक्षात्कार जेडीएसला झाला. देवेगौडांचे पुत्र आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी नुकतीच दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर जेडीएसने भाजपसोबत जात एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. नवीन भारत मजबूत भारतासाठी एनडीएसोबत आल्याचे यावेळी जेडीएसने स्पष्ट केले. प्रादेशिक पक्ष वाचवायचा असेल, तर भाजपसोबत युती करणे गरजेचे आहे, असे याआधी देवेगौडांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले होते. दरम्यान, २०१९ साली लोकसभा निवडणुकीत कर्नाटकच्या २८ पैकी २५ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. एक अपक्ष भाजपच्या समर्थनावर निवडून आला, तर काँग्रेस आणि जेडीएसला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. काँग्रेसने २१, तर जेडीएसने सात जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र, लोकसभेत दोन्ही पक्षांचा पुरता फज्जा उडाला. आता भाजपसोबत युती झाल्यानंतर जेडीएसला २८ पैकी चार जागा मिळण्याची शक्यता आहे. मुळात हिंदूंसहित भाजपविरोधी गरळ ओकणार्‍या जेडीएसला भाजपच्या आधाराची गरज का पडली, हे जाणूून घेणे गरजेचे आहे. काँग्रेसच्या कुबड्यांवर कुमारस्वामी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले; परंतु सर्व काही कारभार काँग्रेसच्याच हाती होता. त्यामुळे वैतागलेल्या कुमारस्वामींनी राजीनामा दिला. त्यानंतर भाजप सत्तेत आले. काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपचा पराभव झाला. परंतु, सर्वाधिक फडका जेडीएसला बसला. या निवडणुकीत जेडीएसचे केवळ १९ आमदार निवडून आले. १९९९ नंतरची जेडीएसची ही सर्वात खराब कामगिरी होती. कर्नाटकातील सामना थेट काँग्रेस आणि भाजपमध्ये होत असल्याचे जेडीएस ओळखून आहे. त्यातच किंगमेकरची भूमिकाही मातीत मिळाली. त्यामुळे राजकीय अस्तित्व वाचविण्यासाठी जेडीएसला एका सहकार्‍याची गरज होती. काँग्रेसशी आधीच फारकत घेतल्याने भाजपसोबत जाण्याशिवाय जेडीएसला पर्याय नव्हता. या युतीमुळे भाजपला मात्र लोकसभेचा महाविजय साकारण्याच्या प्रवासात आणखी एक सोबती मिळाला.
 
उदयभान, भानावर या...

सुंभ जळाला तरी पीळ काही सुटत नाही, अशी काहीशी अवस्था सध्या काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची झालेली दिसते. हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष उदयभान यांची जीभ घसरली आणि त्यांनी नको ते अपशब्द तोंडातून काढले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासाठी अपशब्दांचा वापर केला. हरियाणातील एका कार्यक्रमात त्यांना महिला आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री खट्टर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. “उपर रं...वा राज कर रहा हैं, नीचे पं...वा राज कर रहा हैं। उसने जीते जी अपनी पत्नी को मार दिया। नीचे वाले को पता ही नहीं की क्या होता हैं घर-परिवार चलाना,” अशा शब्दांत उदयभान यांनी आपले कूसंस्कार सर्वांसमोर मांडले. उदयभान हे खासदार राहुल गांधी यांच्या अतिशय जवळचे मानले जातात, त्यामुळे असे धडे राहुल गांधींकडून शिकले का, असा सवाल उपस्थित होतो. ‘मोहब्बत की दुकान’ ठिकठिकाणी लावून प्रेम वाटण्याचे प्रकार करायचे आणि नेत्यांनी मात्र अतिशय गलिच्छ भाषेत टीका करायची. बरं पक्षाचे अध्यक्ष यांच्यावर काही कारवाई करतील का, असा प्रश्न विचारणेही गुन्हाच म्हणावा लागेल. कारण, मल्लिकार्जुन खर्गे यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केलेली आहे. त्यात तर त्यांची पीएचडीदेखील झालेली आहे. बरं घाणेरडी भाषा वापरल्यानंतर उदयभान यांना त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. या वक्तव्यासाठी उदयभान यांनी माफी मागणार नसल्याचे सांगितले. मी काहीही चुकीचे बोललो नाही, असे फक्त त्यांना वाटत असल्याने त्यांना माफी मागायची नाही. ‘मी काही खोट बोललो असेल, तर माझ्याविरोधात एफआयआर दाखल करा,न्यायालयात जा,’ असा उलटा सल्ला त्यांनी दिला. पंतप्रधान मोदी यांना जितक्या खालच्या पातळीवर बोलले तितके पंतप्रधान मोदी यशस्वी झाले. काँग्रेसमुक्त भारतासाठी सत्ताधारी नाहीत, तर असेच वाचाळवीर काँग्रेसवीर फार झालेत. उदयभान जरा भानावर या आणि आपण काय बोलतो, याचा पुन्हा अंदाज घ्या, अन्यथा, पुढील लोकसभेतही विरोधी पक्षनेता निवडता येणार नाही, इतकेच यश पदरात पडायचे!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.