मार्क्सवादी नेत्यांनी आदरांजली वाहिलेला समर्पित संघ प्रचारक

    25-Sep-2023   
Total Views |
Article On RSS Pracharak P P Mukundan passes away at 77

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक पीपी मुकुंदन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे आयोजित सभेमध्ये केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मार्क्सवादी नेते आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सी. दिवाकरन यांच्यासह भाजप आणि संघ पररिवारातील नेते उपस्थित होते. आपल्या लोकसंग्राहक वृत्तीने संघाचा एक प्रचारक समाजाच्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी चांगल्या प्रकारे कसे संबंध ठेऊ शकतो, हे या श्रद्धांजली सभेतील उपस्थित नेत्यांवरून दिसून आले.

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान पीपी मुकुंदन यांना श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले की, “आपल्या तत्त्वासाठी ते जगले. सर्व विचारसरणीच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यापासून, ज्या तत्त्वज्ञानावर पीपी मुकुंदन यांची श्रद्धा होती, त्या तत्त्वज्ञानाने त्यांना कधी रोखले नाही,” असे ते म्हणाले. या सभेस उपस्थित राहिलेले केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, “दिवंगत पीपी मुकुंदन हे अनुकरणीय नेते होते. संघटनेमध्ये कसे कार्य करायचे असते, ते त्यांनी दाखवून दिले. शासनाने बोलविलेल्या एका बैठकीत ते कसे कृतिशील असत आणि कन्नूर जिल्ह्यात संघर्ष निर्माण झाला असताना शांतता प्रस्थापित करण्यासाठी, कशी सहकार्याची भूमिका घेत, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रचंड मतभेद असतानाही विरोधी पक्षांच्या नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध ठेवण्यात, ते सफल झाले होते. ते समर्पित नेते होते. संघटनेच्या कार्यकर्त्यांपुढे ते एक आदर्श होते. त्यांनी केलेल्या आत्मत्यागाबद्दल ते सदैव स्मरणात राहतील,“ असे विजयन म्हणाले.

माजी मंत्री आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सी. दिवाकरन म्हणाले की, “संघामध्ये पीपी मुकुंदन यांच्यासारखे लोक असतील, तर संघ मला आवडेल. या प्रसंगी दिवाकरन यांनी पीपी मुकुंदन यांचे बोलणे इतके चांगले असे की, विरोधकही त्यामुळे प्रभावित होत,” असे सांगितले. तिरुवनंतपुरम येथे एका साम्यवादी व्यक्तीच्या जागेवर शाखा लागत असे. पण, नंतर त्याने तेथे शाखा लावण्यास विरोध केला. पीपी मुकुंदन यांनी त्या कुटुंबास आपल्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित केले आणि त्या साम्यवादी व्यक्तीचा शाखा लावण्यास होणारा विरोध मावळला. त्याच्या पत्नीनेही शाखा लावण्यास मनाई करू नका, असे आपल्या पतीस सांगितले. आपल्या विरुद्ध असलेल्या विचारसरणीच्या लोकांवर त्यांचा प्रभाव कसा पडत होता, याचे उदाहरण एका साम्यवादी नेत्यानेच दिले.

भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी, पीपी मुकुंदन यांच्या निधनाने भाजपची अपार हानी झाल्याचे सांगितले. कोणतेही पद किंवा अधिकार नसताना त्यांनी जो आदर आणि लोकप्रियता मिळविली, ती आश्चर्यकारक होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरांमध्येही त्यांनी आदराचे स्थान मिळविले होते, असे ते म्हणाले. या सभेत संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य एस सेतुमाधवन, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते ओ. राजगोपाल, संयुक्त लोकशाही आघाडीचे निमंत्रक एम. एम. हसन, केरळचे मंत्री अंतोनीराजू, कम्युनिस्ट मार्क्सिस्ट पार्टीचे सरचिटणीस सी. पी. जॉन आदी नेत्यांनीही आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या शोकसंदेशात, कठोर परिश्रम करणार्‍या आणि साधी राहणी असलेल्या पीपी मुकुंदन यांना आदरांजली वाहिली.

कॅनडा : ‘हिंदू फोरम’ची संरक्षण देण्याची मागणी

बंदी घालण्यात आलेल्या ‘सीख्ज फॉर जस्टीस’ या संघटनेचा म्होरक्या असलेल्या गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडामध्ये राहणार्‍या हिंदूंना देश सोडून जाण्याची दिलेली धमकी लक्षात घेऊन कॅनडातील विविध हिंदू संघटनांनी राजकारणी आणि कॅनडा सरकारकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे. कॅनडामधील हिंदू लोकसंख्येला खलिस्तानी अतिरेकी तत्त्वांपासून संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र देशाच्या सार्वजनिक सुरक्षाविषयक मंत्र्यांना पाठविले आहे. ‘हिंदू फोरम कॅनडा’ने हे पत्र लिहिले आहे. कॅनडामध्ये राहणार्‍या हिंदूंनी शक्य तितक्या लवकर देश सोडून जावे, अशी धमकी पन्नू याने दिली आहे. मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये, जी धमकी देण्यात आली आहे, त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हा मुद्दा सरकारने अत्यंत गांभीर्याने घ्यावा. कारण, या धमकीचा कॅनडाच्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर थेट परिणाम होणार आहे, असे फोरमने म्हटले आहे. याप्रकरणी कॅनडाचे प्रशासन निर्णायक कृती करतील, अशी अपेक्षा ‘हिंदू फोरम’ने व्यक्त केली आहे.

...अन् जयराम रमेश नवीन संसद भवनावर घसरले!

आपल्याला कोणतीही चांगली गोष्ट करता आली नाही, तर गप्प बसण्यात शहाणपणा असतो. पण, राजकारणातील जयराम रमेश यांच्यासारख्या नेत्यांना स्वस्थ बसवत नाही, हेच खरे! संसदेची नवी भव्य वास्तू अल्प काळात उभारल्याबद्दल केंद्र सरकारचे कौतुक करणे दूरच; पण त्या वास्तूला जयराम रमेश यांनी नावे ठेवली आहेत. अल्प काळात एवढी भव्य वास्तू उभारून त्यामध्ये संसदेचे विशेष अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. अशा या वास्तूबद्दल जयराम रमेश काय म्हणतात की, “ही इमारत म्हणजे ‘मोदी मल्टिफ्लेक्स’ आहे, ‘मोदी मेरिएट’ आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे. जयराम रमेश एवढ्यावरच थांबले नाहीत. २०२४ मध्ये नवी राजवट सत्तेवर आल्यावर या वास्तूचा अधिक चांगल्या कामांसाठी उपयोग केला जाईल. या वास्तूमध्ये संसद अधिवेशन भरणार नाही, असेच त्यांनी आपल्या बोलण्यातून स्पष्ट केले. संसदेमध्ये उपस्थित सदस्यांना पाहण्यासाठी दुर्बिणीचा वापर करावा लागेल, असे मत जयराम रमेश यांनी व्यक्त केले. “नव्या वास्तूमध्ये तुम्ही जर चुकला, तर तुम्हाला तुमचा मार्ग सापडणे कठीण आहे,” अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे. जयराम रमेश यांच्या या वक्तव्यावर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कडाडून टीका केली आहे. अशी टीका करून जयराम रमेश यांनी १४० कोटी जनतेचा अपमान केला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. संसदेची वास्तू अपुरी असल्याने पर्यायी वास्तू उभारण्याची गरज असल्याचे काँग्रेसची राजवट असतानाच स्पष्ट झाले होते. भाजपची राजवट आल्यानंतर अल्पकाळात ही सुंदर वास्तू सरकारने उभी करून दाखविली. पण, या वास्तूचे कौतुक करण्याऐवजी नाके मुरडण्यात जयराम रमेश आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी धन्यता मानली! काँग्रेस नेत्यांची कोती मानसिकताच यातून दिसून आली!

स्वित्झर्लंड पार्लमेंटची ‘हिजाबबंदी’स मान्यता

इराणसारखे कट्टर मुस्लीम देश हिजाबची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कठोर कायदे अमलात आणत असतानाच, युरोपमधील स्वित्झर्लंड या देशाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने हिजाबला बंदी घालण्याच्या बाजूने आपला निर्णय दिला आहे. १५१ विरुद्ध २९ मतांनी कनिष्ठ सभागृहाने हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे हिजाब, बुरखा घालण्याची सक्ती मुस्लीम महिलांवर आता करण्यात येणार नाही. या कायद्याचे उल्लंघन करणार्‍यास एक हजार फ्रँक ( सुमारे १ हजार,१०० डॉलर) इतका दंड ठोठविण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी नाक, चेहरा, डोळे झाकणारे आवरण घेण्यावर या कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे. त्या देशात मुस्लीम समाजाची लोकसंख्या पाच टक्के आहे. त्या देशाची लोकसंख्या ८६ लाख आहे.

९८६९०२०७३२
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.