शून्यातून विश्व निर्माण करताना...

    25-Sep-2023   
Total Views |
Article On Dr. Dashrath Bhosle

 स्वतः सकट हजारो लोकांच्या आयुष्यात शिक्षणाचा आणि सर्वच सकारात्मक प्रगतीचा दीप प्रज्ज्वलित करणारे पुण्याचे डॉ. दशरथ भोसले यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...

१९८० साली अक्कलकोट येथे दशरथ भोसले शिकायला होते. त्यांचे मूळ गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मुन्नर. त्यांची आई सुभद्रा दिवसभर कष्ट करायची. काम आटपून उशिरा झोपल्यानंतर एक-दोन तास झोपली की, पुन्हा रात्री दोन-अडीच वाजता ती उठायची. दशरथ यांच्यासाठी भाकरी बनवायची. दररोज मुन्नरहून अक्कलकोटसाठी पहाटे ४ वाजता एकच एसटी यायची. सुभद्राबाई त्या एसटीमध्ये भाकरी ड्रायव्हरच्या सिटखाली ठेवायच्या, तर ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या लेकराला उपवास घडू नये, म्हणून तिची धडपड. एकेदिवशी अशीच भाकरी पाठवली. त्या भाकरीसोबत मीठ टाकून उकडलेले एक वांगे होते. ते पाहून दशरथ यांना रडू कोसळले. आईने घरातले शेवटचे उरलेले एक वांगे दशरथ यांना भाकरीसोबत पाठवले होते. याचा अर्थ आईला आज कोरडी भाकरी खावी लागेल. त्याचवेळी दशरथ यांनी ठरवले की, ही परिस्थिती पालटण्यासाठी आपण शिकायचे.

आज तेच दशरथ पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. पुण्यात त्यांच्या एक-दोन नव्हे, तर आठ प्रख्यात शाळा आहेत आणि तीन महाविद्यालये आहेत. ‘सुभद्रास नर्सरी भोसले पब्लिक इंटरनॅशनल स्कूल, पुणे’ अर्थात ‘एसएनबीपी’ हे पुण्याच्या शैक्षणिक वर्तुळातले आघाडीचे नाव. या शिक्षणसंस्थेत तब्बल १ हजार, ५०० शैक्षणिक कर्मचारी कार्यरत आहेत. जवळजवळ तीन लाख विद्यार्थी त्यांच्या शिक्षणसंस्थेतून शिकून बाहेर पडले, तर सध्या २५ हजार विद्यार्थी त्यांच्या शिक्षणसंस्थेत विद्यार्जन करीत आहेत. त्यांच्या संस्थेचे एक आंतरराष्ट्रीय स्तराचे हॉकीचे मैदानही आहे. ते गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करतात. गरीब कुटुंबांनी सक्षम व्हावे, यासाठी ते मदत करतात. कोरडी भाकरी भिजलेल्या आसवांसोबत खाणारे दशरथ आज एमएससी, एमफिल आणि पीएचडी मिळवून ‘डॉ. दशरथ भोसले’ म्हणून पुण्यामध्ये नावलौकिक मिळवून आहेत.

डॉ. दशरथ भोसले यांच्या आयुष्याचा वेध घेऊया. गोंधळी समाजाचे कल्लाप्पा आणि सुभद्रा भोसलेे हे दाम्पत्य मूळचे मुन्नर या खेडेगावाचे. त्यांना नऊ अपत्ये. त्यापैकी एक दशरथ. दशरथ लहानपणापासूनच हुशार. पण, घरी अठराविश्व दारिद्य्र. दशरथ यांना आई सांगे की,”लेका, तू शिक, कष्ट कर, तरच काहीतरी बदल होईल.” माध्यमिक शिक्षण घेत असताना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसतिगृहात शिकू लागले. तिथले कुलकर्णी मास्तर दररोज विद्यार्थ्यांशी शिक्षणाचे, नीतिमत्तेचेे मूल्य, समाज आणि देशनिष्ठा याबद्दल संवाद साधत.

या वसतिगृहाच्या परिसरात एकदा अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण होते. तेव्हा कुलकर्णी मास्तर सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन तिथे गेले होते. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांची सुसंस्कृतता, भाषणशैली आणि लोकांचे त्यांच्यावरचे प्रेम पाहून दशरथ भारावले. आपणही असेच चांगले काहीतरी करावे, असे त्यांच्या मनात आले आणि शिक्षण घेण्याची लालसा वाढली. कष्ट करून ते शिकू लागले. वह्या, पुस्तकं घ्यायला पैसे नसायचे. त्यामुळे वाचनालयात अभ्यास करायचा. रात्रभर त्या अभ्यासाची उजळणी पाटीवर करायचे. कारण, वह्या आणि पेन, पेन्सिल घेणे परवडत नव्हते. विज्ञान शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुण्याच्या महाविद्यालयात कामाला लागले.

त्यांनी खासगी शिकवणी सुरू केली. दशरथ यांनी नर्सरी काढण्याचा विचार केला. नेमका तेव्हाच महाराष्ट्र सरकारने स्वयंसेवी संस्थांना शिक्षणासाठी अटीशर्तींसह भूखंड देण्याची जाहिरात काढली. दशरथ यांनी त्यासाठी अर्ज केला. तीन वर्षे पुणे ते मुंबई फाईलचा ते पाठपुरावा करीत राहिले. पण, काम काही होत नव्हते. मंत्रालयात नेहमीच दिसणार्‍या एका माणसाने दशरथ यांना सांगितले की, अमूक एक मंत्री आहेत, त्यांना ७५ हजार रुपये दिलेस, तर तुझ्या शाळेसाठी जागा तत्काळ मिळेल. उद्या पहाटे ४.३० वाजता भेटतील. पैसे घेऊन ये. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही.

दशरथ पुण्याला परतले. त्याच संध्याकाळी कर्ज काढले. पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवले. कसेबसे ७५ हजार जमवले आणि ते रात्री पुणे स्थानकावरला आले. फलाटावर पोहोचताच दिसले की, गाडी सुटली होती. मंत्रिमहोदय पहाटे ४.३० वाजताच भेटतात, हे आठवून ते चालती गाडी पकडू लागले आणि खाली पडले. लोकांनी त्यांना वाचवले. त्याही परिस्थितीत ते उठले आणि कसेबसे मुंबईला पोहोचले. तो माणूस तिथे भेटला. साहेबांना पैसे देऊन येतो, तू इथे मंत्रालयाच्या गेटजवळ थांब म्हणाला. दशरथ तिथे पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत उभे राहिले. तो काही आलाच नाही. सगळीकडे चौकशी केल्यावर कळले की, तो भामटा होता. अनेकांना त्याने लुटले होते.

कर्ज आणि फसवणूक यांमुळे त्यांना कधी नव्हे, ते असाहाय्य वाटले. अशा प्रसंगी त्यांची आई म्हणाली की, ”परत प्रयत्न कर. असं हातावर हात ठेवून कसे चालेल?” आईचे म्हणणे ऐकून दशरथ पुन्हा त्या फाईलीचा पाठपुरावा करू लागले. समाजातील सज्जनशक्तीने त्यांना साथ दिली. शेवटी शाळेसाठीची ती जागा त्यांना मिळाली. आज त्या एका शाळेपासून ११ शैक्षणिक वास्तू निर्माण झाल्या. आईची माया, प्रेम, प्रेरणा याची जाण असलेल्या दशरथ यांनी आईच्या नावे एक मंदिर बांधले. ते म्हणतात की, “मी यापुढेही सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटा सोप्या व्हाव्यात, यासाठी काम करीत राहणार,“ असे दशरथ यांचे म्हणणे आहे. डॉ. दशरथ यांचे आयुष्य म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करू इच्छिणार्‍यांसाठी खरोखरीच एक प्रेरणेचा स्रोत आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.