नागपुर पाण्याखाली; चंद्रशेखर बावनकुळेंकडून परिस्थितीचा आढावा

    23-Sep-2023
Total Views |

nagpur

मुंबई :
नागपुरात शुक्रवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. एका रात्रीत ११० मिलीमीटर पाऊस झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे नागपूरकरांची दाणादाण उडाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शनिवारी सकाळी या पूर परिस्थितीची पाहणी केली असुन संध्याकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल, असे ते म्हणाले.

पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवले जात आहे. तसेच एसडीआरएफच्या आणि एनडीआरएफच्या तुकड्या सक्रिय झाल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. हे काम युद्धपातळीवर सुरु असुन आतापर्यंत १४० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अग्निशमन दलसुद्धा या मदत कार्यात सहभागी आहे.

नागपुरातील अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.