सहकार चळवळीत प्राण फुंकण्याचे श्रेय मोदींनाच : अमित शाह

लक्ष्मणराव इनामदार व्याख्यानमालेला शहांची उपस्थिती, राज्यपालांसह मुख्यमंत्री देखील हजर

    23-Sep-2023
Total Views |
Union Cooperative Minister Amit Shah
 
मुंबई : "जनतेच्या सहभागातून होणारी सहकाराची चळवळ यशस्वी होते याचे अमूल उद्योग समुह हे मोठे उदाहरण आहे. भारताचे सहकाराचे मॉडेल मानव केंद्रित असून मोदी सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेसह अर्थकारणाला मोठी गती दिली आहे. देशात कृषी विभागातून सहकार विषयाला वेगळे करत सहकार क्षेत्रात प्राण फुंकण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे," असे प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केले आहे.

मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारतीच्या माध्यमातून शनिवारी मुंबई विद्यापीठात लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमित शाह बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासह राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, चंद्रकांतदादा पाटील, दिलीप वळसे पाटील, सहकार भारतीचे राष्ट्रीय सरचिटणीस उदय जोशी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रविंद्र कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.
 
लक्ष्मणराव प्रेरक व्यक्तिमत्त्व - अमित शाह

अमित शाह म्हणाले की, "स्व. लक्ष्मणराव इनामदार उर्फ वकील साहेबांच्या नावाने असलेल्या या व्याख्यानमालेत बोलताना मला आनंद होत आहे. लक्ष्मणराव इनामदार हे एखाद्या परिसाप्रमाणे होते, जे केवळ लोखंडाजवळ जायचे आणि त्याला सोनं बनवायचे. आज गुजरातचे जीवन संपन्न असण्यात लक्ष्मणरावजींचे भक्कम योगदान आहे. कुठलाही इतिहास नसताना त्यांनी केलेले काम यामुळे देशातील सहकाराच्या क्षेत्रातील प्रमुख नेत्यांमध्ये नाव घेतलं जाते. सहकार भारतीच्या माध्यमातून ते जीवनाच्या अखेरचा क्षणापर्यंत सहकारासाठी काम करत होते. निस्वार्थ जीवन जगून सुगंधाची निर्मिती कशी करावी ते वकील साहेबांच्या आयुष्याकडे पाहून समजते. लक्ष्मणराव माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरक आहेत," असे गौरवोद्गार शहांनी काढले.
 
सर्वसहभागातून उत्पादन पुढे घेऊन जाणारे!

'भारताला सहकार चळवळ नवीन नाही. ६० च्या दशकानंतर सहकारात झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे आणि इतर वेगवान हालचालींमुळे सहकाराचे नुकसान झाले. लोकांच्या सहभागातून सहकार आवश्यक असुन मास प्रोडक्शन आणि प्रोडक्शन विथ मासेस अर्थात सर्वसहभागातून होणारे उत्पादन भारताला पुढे घेऊन जाईल," असे अमित शहांनी म्हटले आहे.

भारतात सहकाराच्या क्षेत्राचे नवनवीन प्रयोग केले जाणार आहेत. साखर कारखाने व इतर घटकांना।मदत देण्याचे काम केंद्र सरकारने केले असून त्यातून सहकाराला बळकटी दिली जात आहे. सहकार संदर्भहीन होत आहे हा गैरसमज डोक्यातून काढणे गरजेचे असून सहकार आणखी तेजाने उजळणार आहे," असा आत्मविश्वास देशाचे पाहिले सहकार मंत्री अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला.