राष्ट्रसुरक्षेइतकीच महत्त्वाची असते ते नागरी सुरक्षा. जमाव आक्रमक होणे, हिंसक दंगली यांसारखे प्रसंग हे अनपेक्षितच. पण, अशावेळी आपल्या कुटुंबीयांच्या, समाजाच्या तसेच स्वसुरक्षेसाठीही तत्पर असणे तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, असे प्रसंग उद्भवू नये, ही विघ्नहर्त्याकडे प्रार्थना करुयाच. पण, त्याचबरोबर यदाकदाचित असा बिकट प्रसंग उद्भवलाच, तर नागरिकांनी नेमके काय करावे, यासंबंधीचे मार्गदर्शन करणारा हा लेख...
जातीय दंगली, हिंसक आंदोलनांच्या घटना भारतात कधीही, कुठेही उद्भवू शकतात. अनेक वेळा मोठा जमाव, इतर समाजाच्या घरांवर हल्ले करतो. त्या घरात राहणार्या लोकांना मोठ्या जमावापासून स्वतःचा बचाव करणे कठीण जाते. हिंसक जमाव मालमत्तेची नासधूस, जाळपोळ करतो आणि तेथे राहणार्या निष्पाप लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा हिंसक जमावापासून आपले, आपल्या कुटुंबीयांचे, मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत, हे सर्वसामान्य नागरिकांनी समजून घेणे ही काळाची गरज म्हणावी लागेल.
पोलीस येईपर्यंत नागरिकांनी स्वसंरक्षणासाछी कोणती पद्धत वापरली पाहिजे? हिंसक जमावापासून घरांचे संरक्षण करण्यासाठी आणि पोलीस येईपर्यंत संरक्षणासाठी अनेक उपाययोजना केल्या जाऊ शकतात. त्यासंदर्भातील काही पैलू खालीलप्रमाणे-
हिंसक जमाव हा शस्त्रधारी असू शकतो. दगडफेक, गावठी स्फोटके, सुरे, तलवारी, कुर्हाडी आणि इतर स्थानिक शस्त्रास्त्रे. जमावामधल्या काहींकडे परवाना किंवा विनापरवाना शस्त्रे, बंदुकासुद्धा असतात. बहुतेकवेळा जमावाचे नेतृत्व त्या भागातील गुंड मंडळी करतात. त्यांना एकत्र येण्याकरिता व्हॉट्सअॅप किंवा मोबाईलवरती चिथावणीखोर संदेश दिले जातात. ज्यामुळे अल्पावधीत युवक हिंसा करण्याकरिता एकत्र येऊ शकतात.
तणावग्रस्त परिस्थितीमध्ये जर अशा गुंडांच्या मोबाईलवर लक्ष ठेवता आले, तर त्यांना आधीच पकडता येईल. मोबाईलमधून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावू संदेश, चित्रे पाठवली जातात. ज्यामुळे जमाव हिंसेसाठी अधिक आक्रमक होतो.
हिंसक जमावाविरूद्ध वापरण्याची साधने
संशयास्पद व्यक्ती आणि जमावावर लक्ष ठेवणे आणि युक्तीचा वापर करून त्यांना घाबरवणे, संरक्षणाकरिता नॉन लिथल शस्त्रांचा वापर करणे असे काही उपाय करता येतील.
हिंसाचाराला सुरुवात कशी होते, तर आतापर्यंत असे बघितले गेले आहे की, हिंसक जमाव हळूहळू एकत्र येतो. मग त्यांची संख्या वाढते आणि अचानक हिंसाचाराला सुरुवात होते. त्यावेळेस तिथे असलेले पोलीस जनतेचे फारसे रक्षण करू शकत नाही. कारण, त्यांचे म्हणणे असते की, जमावाची संख्या खूपच जास्त होती. म्हणूनच जर हिंसक जमावापासून रक्षण करायचे असेल, तर हिंसेच्या वेळेला पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.त्याकरिता पोलिसांच्या ‘शीघ्र कृती दल’ या तणावग्रस्त भागांमध्ये तैनात करण्यात केल्या पाहिजेत. ‘एसआरपीएफ’ आणि अर्धसैनिक दलांना त्या भागात लवकरात लवकर पाचारण करावे.
प्रत्येक घराचे आणि किंवा सोसायटीचे रक्षण करण्याची पद्धत, त्या त्या घराच्या आणि सोसायटीच्या रचनेवरती अवलंबून असेल.म्हणून एखाद्या पोलीस किंवा अर्धसैनिक दलातील किंवा लष्करी अधिकार्यांकडून नेमके त्या जागेचे संरक्षण कसे करायचे, याचे विश्लेषण करून, अंमलबजावणी करण्याचा एक प्लॅन तयार केला जावा. मात्र, काही मुद्देजे सगळ्या प्रकारच्या घरांना आणि परिस्थितीला समान लागू असतील, ते खाली दिले आहेत.
घराचे आणि घरात राहणार्या माणसांचे नुकसान कमी करण्याकरिता तीन परिस्थितीमध्ये वेगवेगळे उपाय करता येईल.
तणावाची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी काय करावे?
जर तणाव जास्त निर्माण झाला असेल आणि हिंसक हल्ला होण्याची शक्यता वाढली असेल, तर बायका, मुले, आजारी व म्हातारी माणसे म्हणजे, कमजोर घटकांना घरातून दुसर्या नातेवाईकांच्या घरी सुरक्षितस्थळी पोहोचवावे. ज्यामुळे त्यांचे रक्षण होईल आणि घराच्या आत फक्त धडधाकट तरुण माणसे माणसांनीच राहावे. ज्यामुळे हल्ला झाल्यास चांगला प्रतिकार करता येईल. पोलिसांनी ड्रोन्सचा वापर करून जमावावर लक्ष ठेवावे, यांचे चित्रीकरण करावे. ज्यामुळे त्यानंतर हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल.
जमावाचा हल्ला होत असेल तर काय करावे?
नागरी संरक्षणाचे एक महत्त्वाचे तत्व आहे की, हिंसक जमावाला वेगवेगळ्या पद्धतीने लांब अंतरावरतीच घाबरवून थांबवणे. तरीही जमाव अजून जवळ आला, तर त्याच्यावर विविध ‘नॉन-लिथल वेपन्स’ म्हणजे कमी घातक शस्त्रांच्या मदतीने त्यांना काही वेळ थांबवणे, जोपर्यंत इतर नागरिक, पोलीस किंवा अर्धसैनिक दलांची मदत वस्तीचे रक्षण करायला तिथे पोहोचतील.
जेव्हा आजूबाजूच्या भागांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आपल्या गल्लीचे/मोहल्ल्याचे किंवा घराचे रक्षण करण्याकरिता एक टेहळणी पथक तयार करावे, जे आजूबाजूला लक्ष ठेवून संशयास्पद जमाव किंवा संशयास्पद व्यक्ती किंवा संशयास्पद कारवाई होत असेल, तर त्याची माहिती लगेचच सगळ्यांना देतील. ज्यामुळे हिंसा होण्याच्या आधीच त्यांना थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.
प्रत्येक घरामध्ये एक बॅटरी ऑपरेटेड मेगाफोन असणे गरजेचे आहे. ज्यामुळे मोठ्या आवाजात घोषणा करून किंवा आरडाओरडा करून हिंसक जमावाला घाबरविता येईल. त्यांना वाटेल की, या भागांमध्ये संरक्षणाकरिता पुष्कळ व्यक्ती उपस्थित आहेत.
गल्लीमध्ये एक-दोन घरांमध्ये पोलीस सायरनचा आवाज करणारे सायरन असतील आणि ते वाजवले, तर त्यामुळे हिंसक जमावाला असे वाटेल की पोलीस येत आहेत आणि ते हिंसाचार करण्याच्याऐवजी पळून जातील.
हिंसक जमावाच्या विरुद्ध केलेली आक्रमक कारवाई ही ‘नॉन-लिथल वेपन्स’ म्हणजे कमी घातक शस्त्रांच्या मदतीने केली जावी. यामध्ये गुलेरचा वापर, वॉटर कॅनन्स म्हणजे पाण्याचा वापर करणे, मिरची स्प्रे किंवा बाजारामध्ये मिळत असलेल्या शस्त्रांचा वापर करणे, ज्यामुळे हिंसक आंदोलक काही वेळ निष्क्रिय होतील.
आज अनेक ‘नॉन-लिथल वेपन्स’ बाजारात मिळतात, ज्याचा वापर आपण हिंसक जमावावरती करू शकतो. मात्र, या अशा ‘नॉन-लिथल’ शस्त्रांचा वापर हा दुरून करता आला पाहिजे, ज्यामुळे हिंसक जमावाशी समोरासमोर असा मुकाबला होणार नाही. कमी बोअर असलेली शस्त्रे आणि लायसन्स वेपन्सचा वापर फक्त स्वतःच्या संरक्षणाकरिताच करता येईल.
कारवाई ही देशाच्या कायद्याच्या आत बसलेली पाहिजे आणि कुठलीही बेकायदेशीर कारवाई केली जाऊ नये.
प्रतिबंधात्मक उपाय
प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे वेळोवेळी सेक्युरिटी ऑडिट करा आणि काही कमी असल्यास त्याला दूर करा.
- घरांच्या प्रवेशद्वारांवर मजबूत आणि सुरक्षित दरवाजे आणि खिडक्या बसवा. सुरक्षा प्रणाली स्थापित करा. यामध्ये सुरक्षा गार्ड, ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे आणि सुरक्षा भिंत किंवा फेन्स/तारेचे कुंपण यांचा समावेश असू शकतो.
- घराच्या आत आणि बाहेर सिक्युरिटी कॅमेरे बसवणे, जेणेकरून हिंसक जमावाच्या हालचाली रेकॉर्ड केल्या जाऊ शकतील.
- घरात एक मोठा पाण्याचा साठा ठेवा, जो आगीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
- घरात एक मोठा बॅटरी-चालित रेडिओ ठेवा, जेणेकरून तुम्ही बातम्या आणि संकटकालीन सूचना मिळू शकतात.
- घरात अग्निशमन यंत्र आणि इतर आवश्यक संसाधने ठेवणे. ज्यामुळे जमावाने आग लावण्याचा प्रयत्न केल्यास आज लगेच काबूमध्ये आणता येते.
- तुमच्या शेजार्यांशी संपर्क साधा आणि हिंसक जमावाच्या हल्ल्याच्या शक्यतेबद्दल त्यांच्याशी चर्चा करा. आपल्या समुदायातील इतर लोकांशी संबंध साधा. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही संपर्कात राहू शकता. आपापल्या भागामध्ये सुरक्षेकरिताव्हॉट्सअॅपचे ग्रुप तयार करा. ज्यामुळे एकमेकाला वेगवेगळ्या प्रकारचे साहाय्य करता येईल.
- जर तुम्हाला जमाव तुमच्यावर हल्ला करत असेल, तर तुमचे स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही घातक नसलेली पद्धती वापरू शकता. जर तुम्ही हिंसक जमावाच्या हल्ल्यात सापडले आणि स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. मात्र, प्रत्येक घर, गल्ली किंवा मोहल्ला याचे तज्ज्ञांकडून विश्लेषण केले जावे आणि मोहल्याचे रक्षण कसे करायचे याचा नेमका प्लांन बनवला जावा. ज्यामुळे कुठल्याही हिंसाचाराला तोंड देण्याकरिता आपण सदैव तयार असू.
(नि.) ब्रि. हेमंत महाजन