हैतीमधील हैवान...

    22-Sep-2023   
Total Views |
Womens bodies weaponized Haiti gangs use rape

भय, बदला आणि वस्तूरूपात विकण्यासाठी, वापरण्यासाठी इथे महिलांवर बलात्कार केला जातो. बलात्कारीत महिलेने आजन्म भीती अनुभवावी म्हणून तिला प्रचंड यातना दिल्या जातात. जेणेकरून तिचे दुःखयातना वेदना पाहून इतरांना भय वाटेल. झुंडीच्या रूपात घरात घुसून ते लोक स्त्रीवर अत्याचार करतात. मानसिक आणि शारीरिकरित्या पूर्णत: जखमी झालेल्या त्या महिलेला उपचारांची गरज असते. पण, बाहेर जाणार कसे? शहरातल्या ९० टक्के भागांवर गुंडांनी कब्जा केलेला. गुंडांच्या दहशतीमुळे सहसा घर परिसर सोडून कुणी बाहेर जात नाही.

उपचारांसाठी ही स्त्री घराबाहेर पडली तर वाटेत दोनदा-तीनदा तिच्यावर पुन्हा बलात्कार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दैव बलवत्तर असेल आणि कशीबशी ती डॉक्टरकडे पोहोचलीच, तर उपचारासाठी तिचा क्रमांक कधी लागेल याची शाश्वती नाही. कारण, तिच्यासारख्या शेकडो महिला आधीच तिथे उपचारांसाठी रांगा लावून उभ्या असतात. भयंकर! हे सगळे सध्याचे वास्तव आहे हैती या देशाची राजधानी पोर्ट-ओ-प्रिंसचे. कॅरेबियन देशांपैकी हैती हा एक असा देश, जो त्याच्या स्वातंत्र्यापासूनच हिंसा आणि अस्थिरतेच्या गर्तेत अडकला आहे. १८०४ साली फ्रान्सच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवलेला हा देश रोमन कॅथलिक धर्माचा अनुयायी.

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, या देशातील तब्बल ५० टक्के लोकसंख्या भूकबळीच्या उंबरठ्यावर आहे. एवढेच नाही तर जानेवारी ते जून या काळात या देशात दोन हजार हत्या झाल्या. एक हजारांपेक्षा जास्त लोकांचे अपहरण झाले. बलात्कार आणि हिंसेची तर गणतीच नाही. हे सगळे कोण करते? तर हैतीमध्ये संघटित गुन्हेगारी टोळ्या पूर्वीपासूनच सक्रिय होत्या. २०२१ साली हैतीचे राष्ट्रपती जोवेनेल मोईस यांचीही हत्या करण्यात आली.

राष्ट्रपतींचा खून झाल्यानंतर हैतीच्या अनेक टोळ्यांना सत्ताधारी होण्याचे स्वप्न पडू लागले. या टोळ्यांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी त्यांच्या स्पर्धक टोळ्यांचा खातमा करण्याचे ठरवले. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी या टोळ्या दुसर्‍या टोळीच्या कब्जामधील परिसरातील घरांमध्ये घुसून महिलांवर अत्याचार आणि पुरुषांचे खून पाडू लागल्या. इतकेच नाही तर जिथे जात तिथला परिसर जाळून टाकत. या सगळ्या प्रकारात हजारो निष्पाप लोक मृत्युमुखी पडले, लाखो लोक विस्थापित झाले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, हैतीची राजधारी पोर्ट-ओ-प्रिंस येथे अशा १५० टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्यांनी शहराच्या ९० टक्के भागाला ताब्यात घेतले.

या सगळ्यामध्ये शक्तीशाली असलेलीटोळी आहे. ‘जी ९’ आणि त्याचा प्रमुख आहे जिमी चेरीझेर उर्फ बारबेक्यु. तो पूर्वी पोलीसदलात होता. मात्र, जोवेनेलची हत्या झाल्यानंतर तोही गँगस्टर झाला. टोळीयुद्धाबद्दल प्रश्न उपस्थित केला की तो म्हणतो की, “आधी राष्ट्रपती जोवेनेल यांची हत्या का झाली याचे उत्तर द्या.” संयुक्त राष्ट्र संघाने जीमी चेरीझेरवर अनेक गुन्ह्यांबद्दल आरोपी ठरवले आहे. जिमीचे म्हणणे की, ”हैतीचे पंतप्रधान एरियल हेन्री हे निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी आहेत त्यांना सत्तेतून खाली खेचायचे आहे,” तर हैतीमधली सांघिक गुन्हेगारी, हिंसा संपवण्यासाठी, शांतीसेना पाठवावी, असे आवाहन एरियल हेन्री यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे मागेच केली आहे.

यावर नुकतेच अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, ”हैतीच्या नागरिकांना सुरक्षिततेसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.” याच परिक्षेपात संयुक्त राष्ट्रसंघ केनिया देशाची सैन्य तुकडी पाठवणार आहे. पण, हे सगळे इथेच संपत नाही, तर ”संयुक्त राष्ट्रसंघ किंवा परदेशातील कुणीही हैतीमध्ये आले, तर त्याच्याविरोधात हैतीच्या प्रत्येक घरातील नागरिक शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरतील. हैती प्रशासन आणि संयुक्त राष्ट्राने पाठवलेल्या सैन्यालाही सशस्त्र विरोध करतील,” अशी धमकी जिमी चेरीझेरने दिली आहे. प्रचंड सुरक्षारक्षकांच्या गराड्यात तो हैतीच्या रस्त्यावरून फिरून जनतेला आवाहन करत आहे. तो पुढे आणि त्यांच्यामागे ड्रम वाजवत, शस्त्र प्रदर्शन करत त्याच्या टोळीतील लोक.

हैतीचे हे हिंसक वास्तव पाहून वाटते की अमेरिकेतला एक गट सातत्याने भारतामध्ये अपवादात्मक परिस्थितीत घडलेल्या हिंसेबद्दल प्रश्न उपस्थित करत असतो. तो गट अमेरिकेपासून काहीशे किमी अंतरावरील हैतीमधल्या या प्रचंड हिंसेबद्दल बोलेल का?

९५९४९६९६३८

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.